पुणे - आर्थिकदृष्टया सक्षम बँकांबाबत रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सर्व आर्थिक निकषांची पूर्तता केल्याने इतिहासात प्रथमच रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेस पाचशे कोटी रुपयांचे दहा वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉण्ड वितरीत करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.
राज्य बँकेस मागील पाच वर्षांपासून सतत उच्चांकी नफा होत आहे. गेल्या तीन वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये ६०३ कोटी रुपये, २०२३ मध्ये ६०९ कोटी आणि २०२४ मध्ये ६१५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. राज्य बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण रिझर्व्ह बँकेच्या आदर्श प्रमाणाच्या आणि राष्ट्रीय मानांकनापेक्षा जास्त म्हणजे १६.३४ टक्के आहे.
प्रोव्हिजन कव्हरेज रेशोचे सरासरी राष्ट्रीय मानांकन ६७.५८ टक्के असताना राज्य बँकेचे हे प्रमाण ८३.२८ टक्के इतके सक्षम आहे. राज्य बँकेचा व्यवस्थापन खर्च सरासरी राष्ट्रीय मानांकनापेक्षा खूप कमी म्हणजे ०.५५ टक्के आहे (राष्ट्रीय मानांकन 0.98 टक्के).
राज्य बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय सरासरी राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट म्हणजे ७६.१५ कोटी इतका आहे (राष्ट्रीय मानांकन ३५.७४ कोटी), तर राज्य बँकेचा प्रति शाखा व्यवसाय हा सरासरी राष्ट्रीय मानांकनापेक्षा साडेचार पटीने म्हणजे १००४.६४ कोटी रुपये इतका आहे.
देशात सर्वांत जास्त म्हणजे पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नेटवर्थ असलेली राज्य बँक ही एकमेव सहकारी बँक आहे. या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन रिझर्व्ह बँकेने नुकतेच राज्य सहकारी बँकेस पाचशे कोटी रुपयांचे दहा वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉण्ड वितरीत करण्यास परवानगी दिली आहे.
या संदर्भात लवकरच राज्य बँकेतर्फे ऑफर प्रक्रिया सुरु होत असून, या मधील गुंतवणुकीसाठी कमीत कमी वैयक्तिक दहा हजार रुपये आणि संस्थात्मक ५० हजार रुपये इतकी मर्यादा ठेवण्यात येईल. ही गुंतवणूक राज्य बँकेच्या भांडवलात जमा होणार असल्याने राज्य बँकेचा स्वनिधी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
यामुळे राज्य बँक सहकारातील त्रिस्तरीय पतरचना आणखी मजबूत करणार असून, त्याचा फायदा समाजातील सर्व घटकाला होईल, असा विश्वास राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.