HDFC Bank : संयमाची परीक्षा

एचडीएफसी लि. व एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सर्वच नियामकांनी स्वीकारला खरा; पण प्रत्येक पावलावर नवा अडथळा निर्माण होत होता. ते सर्व अडथळे पार केल्यानंतर बँकेसाठी खरी लिटमस टेस्ट होती शेअर बाजाराच्या प्रतिसादाची...
share market hdfc bank two day drop in its shares than it earned investment option
share market hdfc bank two day drop in its shares than it earned investment optionSakal

- भूषण महाजन

एकापेक्षा एक मातब्बर मल्लांना लोळवून ‘महाराष्ट्र श्री’ झालेल्या पहिलवानाने नंतर त्याच मातीत स्वत: लोळण घ्यावी, तसेच काहीसे सध्या एचडीएफसी बँकेचे झाले आहे.

कोविड महासाथीच्या दरम्यान ७३८ रूपयांचा नीचांकी भाव दाखवलेला हा शेअर पुढे वधारला खरा; मात्र एक फेब्रुवारी २०२१ रोजी १४७६ रुपयांवर बंद भाव दाखवल्यानंतर आजही तो तिथेच घोटाळतो आहे. (शनिवारचा बंद भाव : रु. १४८०).

एचडीएफसी लि. व एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सर्वच नियामकांनी स्वीकारला खरा; पण प्रत्येक पावलावर नवा अडथळा निर्माण होत होता. ते सर्व अडथळे पार केल्यानंतर बँकेसाठी खरी लिटमस टेस्ट होती शेअर बाजाराच्या प्रतिसादाची,

तो काही मनाजोगा आला नाही आणि डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर परदेशी गुंतवणूकदारांचा संयम संपला, अन् विक्रीचा महापूर आला. यामुळे एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या आठवड्यात चर्चेत राहिला.

नेमके काय दुखणे आहे?

  • एचडीएफसी लि.ला पोटात सामावून घेतल्यावर एचडीएफसी बँकेला पहिला मोठा फटका बसला तो चालू आणि बचत खात्यांच्या ठेवींच्या (कासा) टक्केवारीचा. सहसा मोठ्या बँकांमध्ये चालू आणि बचत खात्यांवर अत्यल्प व्याज दिले जाते. या टक्केवारीचा बँकेच्या नफा क्षमतेवर मोठा परिणाम होतो. ही टक्केवारी ४५ वरून ४० टक्क्यांवर आली आहे.

  • बँकांच्या शेअरच्या मूल्यांकनात ‘नीम’

  • किंवा निव्वळ व्याज फरक अत्यंत महत्त्वाचा असतो. विलिनीकरणाआधी ४.१ टक्के असलेले ‘नीम’, वरील कारणामुळे गेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांवर घसरले आहे.

  • त्याखालोखाल दुसरा प्रश्न आहे मुदत ठेवींचा! एचडीएफसी लि.मध्ये घेतलेल्या ठेवी बँकेपेक्षा किंचित महाग होत्या, त्यात आता व्याजदरही वाढलेले आहेत. या सर्व ठेवींचे नूतनीकरण कमी व्याजाने होईल का? हा मुद्दा कळीचा आहे. त्यात गेल्या नऊ महिन्यांत १,८०,००० कोटी रुपयांच्याच ठेवी जमा झाल्या आहेत. दर तिमाहीला हा जोर कमी होत चालला आहे. ठेव संकलनात किमान १७ टक्के वाढ हवी असेल, तर चौथ्या तिमाहीत १.७ लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा होणे आवश्‍यक आहे, ते शक्य आहे का? हा मोठा प्रश्‍न आहे.

  • पुढील उत्कंठा आहे उद्योगांच्या कर्जवितरणात किती वाढ होईल याची! ‘नीम’मध्ये वाढ करायची असेल, तर अधिक व्याजाने कर्जवितरणही वाढण्याची गरज आहे.

  • बँकेचा नफा दरवर्षी वाढतो आहे; पण ही वृद्धी कमीकमी होत चालली आहे. एकेकाळी दरवर्षी ३० ते ३५ टक्के नफा वाढत असे, तो आता २० टक्क्यांच्या आसपास आला आहे. हे बाजाराला आवडत नाही. दरवर्षी नव्हे, तर दर तिमाहीला नफा वाढता राहिला, तर भावही वर जात राहतो. या बँकेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारी बँक असेल (उदा. आयसीआयसीआय बँक), तर एचडीएफसी बँकेसाठी अधिक पैसे का मोजा? हा विचार शेअरच्या विक्रीमागे नक्की आहे.

  • प्रत्येक फंडात एचडीएफसी बँक आहेच (काही अपवाद वगळता) आणि ‘टॉप होल्डिंग’ आहे. वरच्या भावात घेतलेला शेअर असला आणि भाव खाली आले, तर मूग गिळून थांबावे लागते. खालच्या भावात पुन्हा नवी खरेदी सहसा होत नाही. पुन्हा प्रत्येक भावात खरेदी केलेले गुंतवणूकदार भाव वाढल्यास विकायला येतात. तेव्हा ही अडथळ्यांची शर्यत पार करतच भाव वर जाऊ शकेल.

चांगली संधी कोणाला?

ज्या गुंतवणूकदारांच्या खात्यात हा शेअर नाही, त्यांना मात्र चांगली संधी चालून आली आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची चलत सरासरी रु. १४४१ आहे. भाव त्याखाली जाणे कठीण वाटते. तसेच व्यवसायवृद्धीसाठी बँकेने महत्त्वाकांक्षी शाखाविस्तार हाती घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांत २३०० नव्या शाखा सुरू झाल्या आहेत व याच आर्थिक वर्षात आणखी ६०० शाखा सुरू होतील. बँकेचे बाजारमूल्यांकन आता ‘प्रीमियम’ राहिलेले नाही. ते आता इतर कार्यक्षम खासगी बँकांच्या बरोबरीला आले आहे.

ज्यांनी शेअर याआधी विकला असेल, त्यांनी आता पुन्हा अभ्यासण्यासाठी घ्यायला हरकत नाही. जुन्या शेअरधारकांना थोडी अधिक कळ सोसावी लागेल. अत्यंत गौरवशाली इतिहास असलेली ही बँक पुढील दोन तिमाहीत पुन्हा उभारी घेईल, असे वाटते; तितका तरी संयम हवाच.

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय आपापल्या जबाबदारीवर आणि तज्ज्ञांच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com