Credit Card : क्रेडिट कार्ड व्यवहारे अखंड असावे सावध!

देशातील आर्थिक व्यवहारांचे डिजिटायझेशन वेगाने होत आहे. पैसे काढण्यासाठी बँकेत जाणे आता जवळपास इतिहासजमा झाले आहे.
Credit Card
Credit Cardsakal

देशातील आर्थिक व्यवहारांचे डिजिटायझेशन वेगाने होत आहे. पैसे काढण्यासाठी बँकेत जाणे आता जवळपास इतिहासजमा झाले आहे. यूपीआय, एनएफटी, आरटीजीएस, डेबिट कार्ड याद्वारे पैशांचे व्यवहार २४ तास आणि ३६५ दिवस करणे शक्य झाले आहे. या डिजिटल आर्थिक व्यवहारांमधील एक उपयुक्त पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड.

अगदी ऐन मध्यरात्री अचानक पैसे देण्याची वेळ आल्यास आणि महत्त्वाचे म्हणजे बँक खात्यामध्ये आवश्यक रक्कम नसेल, तरीही क्रेडिट कार्डद्वारे तातडीने पैसे देता येतात. उदा. एखाद्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले, तर क्रेडिट कार्डद्वारे लगेच पैसे भरता येतात; खात्यात तेवढी शिल्लक नसेल तरीही. या कार्डद्वारे अनेक लाभही दिले जातात, त्यामुळे क्रेडिट कार्डची लोकप्रियता शिगेला पोहोचली असून, आज देशात सुमारे १० कोटी क्रेडिट कार्ड वापरात आहेत. क्रेडिट कार्डची देय रक्कम (क्रेडिट) काही काळासाठी बिनव्याजी असते आणि ती ठराविक मुदतीमध्ये दिली नाही, तर जबर व्याज आणि दंड पडतो, हे लक्षात ठेवावे .

क्रेडिट कार्डचा गैरवापर

ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून त्यावरून रक्कम परस्पर खर्च करण्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. काही दिवसांपासून खासगी क्षेत्रातील एका बँकेच्या क्रेडिट कार्डचा प्रचंड गैरवापर झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या बँकेने जारी केलेल्या क्रेडिट कार्डवर परदेशात गैरव्यवहार झाले आहेत.

एका ग्राहकाला, तर क्रेडिट कार्ड यायचे होते, तरी अमेरिकेत या कार्डवरून डॉलरमध्ये पैसे देण्यात आले. अशा अनेक ग्राहकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परदेशात विविध रकमांचे गैरव्यवहार तेथील स्थानिक चलनात (उदा. अमेरिकी, कॅनेडियन डॉलर) झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत आणि हे व्यवहार करण्यापूर्वी कोणताही ‘ओटीपी’ आलेला नाही. ग्राहकांना ‘ओटीपी’ आला नाही; तसेच क्रेडिट कार्डची सर्व माहिती ‘लीक’ झाली. याबाबत बँकेने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही; तसेच ग्राहकांनी तक्रारी करूनदेखील आठ ते दहा दिवस कार्ड ब्लॉक करण्यात बँक अपयशी ठरली. हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. यावरून धडा घेऊन ग्राहकांना खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

काय खबरदारी घ्यावी...

क्रेडिट कार्डच्या बँकेकडून येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवावे. कार्डवर एखादा व्यवहार झाल्यास बँकेकडून मेसेज आणि ई मेल येते. त्यात कोठे व्यवहार झाला आहे, रक्कम किती आहे आणि किती वाजता व्यवहार झाला याची माहिती असते. तुम्हीच तो व्यवहार केला आहे ना? नसेल, तर दिलेली लिंक अथवा नंबरवर लगेच संपर्क साधावा, असे या मेसेजमध्ये लिहीलेले असते. हा मेसेज प्राप्त होताच, ते पैसे आपण खर्च केले नसतील, तर तातडीने बँकेशी संपर्क साधणे अत्यावश्यक असते. यातून क्रेडिट कार्डच्या गैरव्यवहाराला आळा घालता येऊ शकतो.

हॉटेलमध्ये, पेट्रोल पंपावर, दुकानात बिल देताना क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी घेऊन गेले, तर त्याबद्दल बेफिकीर राहू नका. तुमच्या कार्डची सर्व माहिती स्किमिंगद्वारे चोरली जाण्याची आणि त्यावरून गैरव्यहार होण्याची शक्यता असते, त्यामुळे कार्ड तुमच्यासमोरच स्वाईप करून घ्या आणि पिन नंबर सावधपणे टाका. कोणालाही सहजपणे पिन नंबर दिसणार नाही, याची खबरदारी घ्या.

क्रेडिट कार्डचा पिन कार्डवर कोठेही लिहू नका. तो केवळ लक्षात ठेवावा. कार्ड हरवले, चालेनासे झाले, तर तातडीने बँकेशी संपर्क साधा आणि याबद्दलची ई मेल करा. तुमचा जवळचा मित्र, नातेवाईक किंवा अन्य कोणालाही आपले क्रेडिट कार्ड वापरण्यास देऊ नका. वाईटपणा आला, तरी चालेल. एकंदर काय, तर क्रेडिट कार्डच्या व्यवहारांबाबत अखंड असावे सावध !!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com