

RBI Customer Protection
esakal
दिलीप घाटे - dilipghate२@gmail.com
मोबाईल बँकिंग, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल कर्जामुळे आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड वाढला आहे; मात्र याचबरोबर ग्राहकांची दिशाभूल, लपविलेले शुल्क, चुकीच्या आर्थिक योजना विकणे आणि डिजिटल फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक अंतिम निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश डिजिटल बँकिंग अधिक पारदर्शक, जबाबदार आणि ग्राहकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, डिजिटल कर्ज, डिजिटल विमा आणि ऑनलाइन गुंतवणूक यांसारख्या सेवांमुळे आर्थिक व्यवहार घरबसल्या काही सेकंदांत पूर्ण होऊ लागले आहेत. बँकेच्या शाखेत जाणे, रांगेत उभे राहणे किंवा कागदपत्रांचा पसारा सांभाळणे, या अनेक गोष्टी आता भूतकाळात जमा होत आहेत. या बदलामुळे आर्थिक सर्वसमावेशनालाही मोठी चालना मिळाली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंतही बँकिंग सेवा पोहोचल्या आहेत. सरकारी अनुदाने, पेन्शन, शिष्यवृत्ती, थेट लाभ हस्तांतर आणि लघुउद्योजकांसाठी कर्जपुरवठा या सर्व प्रक्रियांमध्ये डिजिटल बँकिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचवेळी काही नवी आव्हानेही निर्माण झाली आहेत.