
गुंतवणूकदार त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार केला, तर यामध्ये स्वतःच्या निवृत्तीसाठी रक्कम जमा करणे हा गुंतवणूकदारांचा मुख्य उद्देश असतो. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठीही गुंतवणूक केली जाते. मात्र, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भविष्यात किती रक्कम जमा करायची आहे, ते निश्चित करणे महत्त्वाचे असते. ते निश्चित केल्यानंतर, गुंतवणुकीचा कालावधी, अपेक्षित परतावा आणि गुंतवणूक क्षमता याआधारे एसआयपीची रक्कम ठरवावी लागते.