
भूषण ओक
चेन्नईस्थित सॅकसॉफ्ट ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी अनेकविध व्यवसायांसाठी डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याचे सॉफ्टवेअर, तोडगे पुरवण्याचे काम करते. कंपनीची जगभरात सोळा कार्यालये आहेत. आजच्या युगात प्रत्येक व्यवसायात सर्व प्रकारच्या व्यावसायिक प्रक्रिया संगणकामार्फत चालतात. हे डिजिटल परिवर्तन झपाट्याने होत आहे. या प्रक्रियेत पारंपरिक व्यवसाय प्रक्रिया, संस्कृती आणि ग्राहक अनुभव यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मूलभूत बदल घडवून आणण्यात येतो. प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून, स्वयंचलित प्रक्रियांचा वापर करून आणि नव्या डिजिटल साधनांचा अवलंब केल्याने व्यवसाय अधिक कार्यक्षम, लवचिक आणि ग्राहकाभिमुख बनतात. थोडक्यात, डिजिटल परिवर्तन म्हणजे व्यवसायाला आधुनिक डिजिटल युगाच्या गरजांनुसार रूपांतरित करणे आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवणे. त्यात ही कंपनी मोलाचे योगदान देत आहे.