Bajaj Finance Ltd : बजाज फायनान्स (शुक्रवारचा बंद भाव : रु. ६९३१)

‘बजाज फायनान्स’ ही ‘बजाज फिनसर्व्ह’ची उपकंपनी आहे. ही कंपनी लहान-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज (कन्झ्युमर ड्युरेबल लोन)देते
Bajaj Finance Ltd
Bajaj Finance Ltd Sakal

‘बजाज फायनान्स’ ही ‘बजाज फिनसर्व्ह’ची उपकंपनी आहे. ही कंपनी लहान-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज (कन्झ्युमर ड्युरेबल लोन)देते; तसेच वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज, लघू व्यवसाय कर्ज, रोख्यांवर कर्ज, व्यावसायिक कर्जवितरण व्यवसायात कार्यरत आहे.

फायदेशीर वाढीचा इतिहास असल्याने ही कंपनी बजाज समूहासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पारदर्शकतेच्या अभावामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘बजाज फायनान्स’ला ‘ईकॉम’ व ‘इन्स्टा ईएमआय कार्ड’ या दोन सुविधांद्वारे नव्या कर्जांना मंजुरी व वितरण थांबवण्याचे निर्देश दिले होते.

‘इन्स्टा ईएमआय कार्ड’ ग्राहकांना अतिरिक्त खर्चाशिवाय ग्राहकोपयोगी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीची मुभा देते, तर ‘इकॉम’द्वारे ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या प्लॅटफॉर्मवर कर्जाद्वारे ऑनलाइन खरेदीची सुविधा मिळते.

‘बजाज फायनान्स’कडे सप्टेंबर २०२३ च्या अखेरीस ‘ईएमआय’ कार्डसाठी सुमारे ४२ लाख वापरकर्ते होते. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे नव्या कर्जांवर सुमारे १० टक्के; तसेच चौथ्या तिमाहीतील नफ्यावरदेखील साधारण चार टक्के परिणाम झाला.

दरम्यान, दोन मे रोजी रिझर्व्ह बँकेने ‘ईकॉम’ व ‘इन्स्टा ईएमआय कार्ड’वरील निर्बंध उठवले आहेत. यामुळे कंपनी या दोन विभागांमध्ये कर्ज मंजुरी आणि वितरण पुन्हा सुरू करेल. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत असा दिलासा मिळणे हे कंपनीच्या व्यवस्थापन क्षमतेचे यश आहे.

मार्च तिमाहीतील कामगिरी

कंपनीने मार्च तिमाहीत ३,८२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिमाही निकालानुसार, कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. १४,९३२ कोटींवर पोहोचले आहे.

मागील वर्षीच्या याच कालावधीत ते ११,३६८ कोटी रुपये होते. कंपनी व्यवस्थापनानुसार, ‘आरबीआय’ने निर्बंध उठवल्याचा परिणाम आगामी काळात वाढीव ग्राहक संपादनासह, सुधारित उत्पन्नात होईल. भारतात कर्ज देण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या काही ठराविक कंपन्या ‘एनपीए’चे प्रमाण कमी ठेवत उच्च पुनर्गुंतवणूकदरासह प्रगती करत आहेत.

‘बजाज फायनान्स’ने प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत, कर्जवितरण क्षेत्रात गेल्या १० वर्षांमध्ये वेगाने प्रगती केली आहे. सध्या हा शेअर किमतीच्या दृष्टीने महाग वाटत असला, तरी दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com