Share Market : निवडणूक निकालाचा शेअर बाजाराला दणका ; गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटींचे नुकसान, चार वर्षांतील सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला स्पष्ट बहुमत नसण्याचा कल दिसून आल्याने आज शेअर बाजारात भूकंप झाला. सोमवारी विक्रमी वाढ नोंदवणाऱ्या निर्देशांकांनी दुसऱ्याच दिवशी चार वर्षांतील एक दिवसातील सर्वांत मोठी घसरण नोंदवली.
Share Market
Share Market sakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला स्पष्ट बहुमत नसण्याचा कल दिसून आल्याने आज शेअर बाजारात भूकंप झाला. सोमवारी विक्रमी वाढ नोंदवणाऱ्या निर्देशांकांनी दुसऱ्याच दिवशी चार वर्षांतील एक दिवसातील सर्वांत मोठी घसरण नोंदवली. ‘सेन्सेक्स’ ४३८९ अंशांनी, तर ‘निफ्टी’ १३७९ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ३१ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. दोन्ही निर्देशांकांनी जवळपास सहा टक्के घसरण नोंदवली. अदानी समूहातील आठ कंपन्यांच्या शेअरला ‘लोअर सर्किट’ लागले.

मागील निवडणुकीत

२३ मे २०१९ : ‘सेन्सेक्स’ २९८ अंशांनी घसरून ३८,८११ अंशांवर स्थिरावला, तर ‘निफ्टी’ ८०.८५ अंशांनी घसरून ११,६५७ अंशांवर स्थिरावला. या दिवशी दिवसभरात ‘सेन्सेक्स’ने पहिल्यांदाच ४० हजारांचा टप्पा गाठला होता, तर ‘निफ्टी’ने त्या दिवशी १२,००० अंशांचा टप्पा ओलांडला होता.

‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ७२,०७९ या दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६२३४ अंशांनी किंवा ८.१५ टक्क्यांनी घसरण करून ७०,२३४ अंश ही जवळपास पाच महिन्यांच्या नीचांकी पातळी गाठली. निफ्टी दिवसभरात १९८२ अंश किंवा ८.५२ टक्क्यांनी घसरून २१,२८१ अंशावर आला. दिवसअखेर तो ५.९३ टक्क्यांनी घसरून २१,८८४ अंशांवर बंद झाला. यापूर्वी २३ मार्च २०२० रोजी कोविड-१९ च्या महासाथीमुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता, तेव्हा ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ जवळपास १३ टक्क्यांनी घसरले होते.

भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी ‘रालोआ’मधील भागीदारांवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी नफावसुली करण्यासाठी शेअर विक्रीवर भर दिला, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘सेन्सेक्स’वरील ३० कंपन्यांमधील ‘एनटीपीसी’ने १५ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली, तर स्टेट बँक ऑफ इंडिया १४ टक्क्यांहून अधिक, लार्सन अँड टुब्रोने १२ टक्क्यांहून अधिक आणि पॉवर ग्रिडने १२ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली. टाटा स्टील, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हरने सहा टक्क्यांनी झेप घेतली, तर नेस्ले तीन टक्क्यांनी वधारला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि सन फार्मा शेअर वाढले. एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. ‘बीएसई’वर तब्बल ३३४९ शेअर घसरले, तर ४८८ शेअर वधारले, तर ९७ शेअरचे भाव आहे तेच राहिले. २९२ शेअरनी ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली, तर १३९ शेअरनी त्यांच्या एका वर्षातील उच्चांक गाठला.

बाजारमूल्यात विक्रमी घसरण

‘बीएसई’वरील कंपन्यांचे बाजार भांडवल ३१,०७,८०६ कोटी रुपयांनी घसरून ३,९४,८३,७०५ कोटी रुपये (४.७३ लाख कोटी डॉलर) झाले. सोमवारी झालेल्या प्रचंड तेजीनंतर ‘बीएसई’वरील कंपन्यांचे बाजार भांडवल १३,७८६३० कोटींनी वाढून ४,२५,९१,५११ कोटी रुपयांच्या (५.१३ लाख कोटी डॉलर) सार्वकालिक शिखरावर पोहोचले होते. १६ मे २०१४ रोजी ‘बीएसई’वरील कंपन्यांचे बाजार भांडवल८०६३८१२ कोटी रुपये होते, तर २३ मे २०१९ रोजी ते १५०१७५७७ कोटी रुपये होते. दहा वर्षांत ‘बीएसई’वरील कंपन्यांचे बाजार भांडवल ३१४.१९ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

गुंतवणूकदारांची नफावसुली

मुंबई : सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याने आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिला, त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वीज, ऊर्जा, तेल व वायू आणि भांडवली वस्तूंच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली. बीएसई आणि एनएसईवरील बहुतांश शेअरचे भाव आज घसरले. अदानी समूहाच्या दहापैकी आठ कंपन्यांच्या शेअरना लोअर सर्किट लागले.

सेन्सेक्स आज ४३८९ अंशांनी, तर निफ्टी १३७९ अंशांनी कोसळला. ही गेल्या चार वर्षांतील एका दिवसात झालेली सर्वांत मोठी घसरण आहे. यापूर्वी २३ मार्च २०२० रोजी कोविड-१९ च्या महासाथीमुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता, तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १३ टक्क्यांनी घसरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com