
Gautam Adani : सुप्रीम कोर्टाचा आदेश अन् गौतम अदानींच ट्विट चर्चेत; म्हणाले...
Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे समूह स्वागत करतो.
अदानी अमेरिकास्थित शॉर्ट सेलर कंपनीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत असून, आता सत्य समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गौतम अदानी ट्विट करत म्हणाले, “अदानी समूह माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतो. सत्याचा विजय होईल,”
अदानी यांनी यापूर्वीही हिंडनबर्ग अहवाल नाकारला होता आणि असे म्हटले होते की, समूहाच्या शेअर्स घसरल्यामुळे शॉर्ट-सेलरला फायदा झाला आहे.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरील अनेक जनहित याचिकांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ला या समूहाने बाजाराच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? आणि स्टॉकमध्ये फेरफार केला आहे का? याची तपासणी करण्याचे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी तज्ञ समिती स्थापन केली आहे. सहा सदस्यीय समितीमध्ये ओपी भट्ट, न्यायमूर्ती केपी देवदत्त, केव्ही कामथ, नंदन निलेकणी, सोमशेखर सुंदरेसन यांचा समावेश असेल आणि या समितीचे नेतृत्व माजी न्यायमूर्ती एएम सप्रे करणार आहेत.
यापैकी एक याचिका वकील मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केली होती ज्यांनी सेबीला हिंडनबर्ग आणि संस्थापक नाथन अँडरसन यांच्याविरुद्ध चौकशी आणि एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मागितले होते.
अधिवक्ता विशाल तिवारी यांनी केलेल्या आणखी एका याचिकेत हिंडेनबर्ग अहवालाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली होती.
काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी केलेल्या याचिकेत अदानी समूहावर खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या कंपनीतील कथित किमतींवर केलेल्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.