निर्देशांकांची पुन्हा घसरगुंडी; सेन्सेक्स एकोणसाठ हजारांखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

सलग आठ दिवस घसरण झाल्यानंतर काल एक दिवसाचा दिलासा मिळालेले भारतीय शेअर बाजार निर्देशांक आज जागतिक शेअर बाजारातील वातावरणामुळे पुन्हा पाउण टक्क्यांच्या आसपास घसरले.

Sensex : निर्देशांकांची पुन्हा घसरगुंडी; सेन्सेक्स एकोणसाठ हजारांखाली

मुंबई - सलग आठ दिवस घसरण झाल्यानंतर काल एक दिवसाचा दिलासा मिळालेले भारतीय शेअर बाजार निर्देशांक आज जागतिक शेअर बाजारातील वातावरणामुळे पुन्हा पाउण टक्क्यांच्या आसपास घसरले. सेन्सेक्स ५०१.७३ अंश घसरून एकोणसाठ हजारांखाली गेला तर निफ्टी १२९ अंश घसरला.

काल निर्देशांकांनी चांगली वाढ दर्शवल्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आज मुख्यतः अमेरिकी वातावरणामुळे जागतिक शेअर बाजारात चिंतेचे वातावरण पसरले. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी मध्ये सुरुवातच निराशाजनक झाली व नंतर दिवसभर विक्रीचा मारा आल्यामुळे निर्देशांक दडपणाखाली राहिले. दिवस अखेरीस सेन्सेक्स ५८,९०९.३५ अंशांवर तर निफ्टी १७,३२१.९० अंशावर स्थिरावला.

अमेरिकेतील चलनवाढ अजून काहीकाळतरी वाढलेलीच राहील असा तपशील समोर आल्यामुळे तेथील बॉण्ड च्या व्याजदरात वाढ झाली. अशा स्थितीत विकसनशील राष्ट्रांच्या शेअर बाजारांमधील पैसा पुन्हा अमेरिकेकडे जाण्याची चिन्हे आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनीही भारतात सतत सहाव्या दिवशी विक्री केली. मुंबईतील मालमत्तानोंदणी चांगली झाल्याच्या आकडेवारीमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी बांधकाम व्यवसाय क्षेत्र तेजीत होते. ते वगळता बहुतांश क्षेत्रे दडपणाखालीच होती.

मॅक्रोटेक डेव्हलपर ने आज १७ टक्के वाढ दाखवली, तर सनटेक ला देखील बांधकामाची अनेक कामे मिळाल्यामुळे त्या शेअरमध्येही चांगली वाढ झाली. वंदे भारत गाड्यानिर्मितीसाठी रेल विकास निगम चे टेंडर सर्वात कमी रकमेचे आल्यामुळे ते काम मिळण्याचे आशेने त्यांच्या शेअरच्या दरातही वाढ झाली. तर केंद्राने लार्सन अँड टुब्रो ला तीन प्रशिक्षण जहाज निर्मितीची कामे दिल्यामुळे तो शेअरही वाढला.

आज सेन्सेक्स मधील मारुती, ॲक्सिस बँक, टीसीएस हे शेअर दोन ते अडीच टक्के घसरले. तर महिंद्र आणि महिंद्र, इन्फोसिस, नेस्ले, टेक महिंद्र, भारती एअरटेल, टाटा मोटर, कोटक बँक या शेअरचे भावही एक ते दोन टक्का घसरले. निफ्टी मधील अदानी पोर्ट तीन टक्के वाढला तर कोल इंडिया, बीपीसीएल, अदानी एंटरप्राइज, हिरो मोटरकॉर्प हे शेअरही एक ते दोन टक्का वाढले.

आता लवकरच बाजाराला आशादायक वाटणाऱ्या कुठल्याही चांगल्या बातम्या आल्या नाहीत तर बाजार असाच वाटेलतसा वर-खाली भरकटत राहील. त्यातच परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळेही नकारात्मक भावना निर्माण होत आहे.

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.