
Nilesh Shah: Despite Volatility, India’s Long-Term Growth Story Stays Strong
e sakal
भू-राजकीय अस्थिरता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक, राजकीय धोरणे, त्यामुळे निर्माण होत असलेली अनिश्चितता यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसह देशांतर्गत अर्थव्यवस्थांवरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक भांडवली प्रवाह भारताकडे वळण्याची शक्यता आहे, तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी सकारात्मक परिस्थिती आहे. या अनुषंगाने शेअर बाजार, म्युच्युअल फंड आदी क्षेत्रांतील घडामोडींवर कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी खास ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेली ही मुलाखत.
प्रश्न : अमेरिकेचे वाढणारे कर्ज व राखीव चलनाचा दर्जा टिकवण्याची गरज यामुळे तेथे ‘कॅच-२२’सारखी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉलर कमकुवत झाला, तर उदयोन्मुख बाजारपेठांकडे (विशेषतः भारताकडे) अधिक भांडवल प्रवाहित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, भारतात जागतिक गुंतवणुकीचा प्रवाह कसा होईल?
शहा : अमेरिकेतील वाढते कर्ज आणि अनिश्चित धोरणात्मक वातावरणामुळे जागतिक भांडवली प्रवाहावर मोठा प्रभाव पडत आहे. प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर १० टक्क्यांनी कमजोर झाला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडे मोठ्या प्रमाणात अमेरिकी मालमत्ता आहेत. डॉलर आणखी घसरल्यास भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना भांडवली प्रवाह मिळण्याची शक्यता अधिक आहे. भारताची आर्थिक शिस्त, मजबूत ‘जीडीपी’ वाढ (पहिली तिमाही आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये ७.८ टक्के), वाढलेला सरकारी खर्च, निर्यातवाढ आणि औद्योगिक उत्पादन यामुळे भारत जागतिक वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून उदयास येत आहे. २००८ च्या सबप्राइम संकटापासून ते कोविडनंतरच्या काळात आपले कर्ज-जीडीपी प्रमाण कमी करणारा भारत हा एकमेव मोठा देश आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी १८ वर्षांनी भारताचे रेटिंग दर्जा (अपग्रेड) वाढविला आहे. देशांतर्गत मागणी, निर्यातक्षमता आणि पुनर्मूल्यांकनामुळे जागतिक भांडवली फेरवाटपाचा भारताला निश्चितच फायदा होणार आहे.