
मेच्या पहिल्या आठवड्यात नागपूरला जाणार आहे म्हटल्यावर संगीतकार मित्र राहुल रानडे याने आधी वेड्यातच काढलं होतं; पण जायचं नक्की आहे म्हटल्यावर त्याने फर्माईश केली होती त्याच्या मित्राच्या आइस्क्रीम पार्लरला भेट देण्याची.
“ताज्या फळांचे तुकडे दातांखाली येणारं आंबा, सीताफळ, टेंडर कोकोनट नॅचरल आइस्क्रीम तुम्ही पुण्या-मुंबईत खाताच; पण आंबा-सीताफळ-संत्रं-टरबूज कोरून त्याच्या आत भरलेलं त्याच स्वादाचं आइस्क्रीम एकदा खाऊन पाहा. त्यासाठी माझ्या मित्राच्या ‘ऑरेंज एन ऑरेंज’ला अवश्य भेट द्या,” असं त्यानं आवर्जून बजावलं होतं.
त्यामुळे नागपूरला जाताच शोध घेतला ‘ऑरेंज एन ऑरेंज’चा... नावावरून खरं तर काहीच अंदाज आला नाही. त्यामुळे इंटरनेट धुंडाळलं आणि ‘ऑरेंज एन ऑरेंज’ची माहिती काढली. दीपक सिंग नावाच्या व्यक्तीने हा उद्योग सुरू केला आहे असं थोड्या संशोधनानंतर लक्षात आलं. नागपूरच्या त्रिमूर्तीनगर भागात हे पार्लर आहे, असं स्पष्ट होताच ड्रायव्हरला गाडी त्या दिशेने घेण्यास सांगितली आणि ‘जीपीएस’ने दिलेल्या चकव्यानंतर एकदाचं ते पार्लर सापडलं.