
प्रसाद भागवत - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
भांडवली बाजारातही एक, एक शब्दांचा, संज्ञांचाही एक ‘मोसम’ असतो. कधीकाळी ‘वायटूके’, मग ‘युरोझोन’, नंतर ‘सबप्राइम’ या शब्दांनी बाजाराला भेडसावले होते, तसाच सध्याचा शब्द आहे ‘टेरिफ’.
‘टेरिफ’ याचा सोपा अर्थ जकात. जागतिक व्यापारउदिमांत अमेरिकेने परदेशांत पाठविलेल्या वस्तूंवर हे देश मोठ्या प्रमाणात आयातशुल्क (टेरिफ) आकारून ती उत्पादने महाग करतात, त्यामुळे त्यांचा खप कमी होतो. या देशांकडून अमेरिकेत आलेल्या उत्पादनांवर कडक कर लावले जात नाहीत, त्यामुळे अमेरिकेकरिता निर्यात महाग आणि आयात वस्तु तुलनेने स्वस्त होतात आणि अमेरिकी व्यावसायिकांचे नुकसान होते, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशांतून आलेल्या वस्तूंवर ‘जशास तसे’ आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि आता व्यापारयुद्ध भडकणार, अशा शंकांनी जागतिक शेअर बाजार कोसळले.