

अॅड.सुकृत देव - करसल्लागार
नव्या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांसाठी सुखावह ठरला आहे. अर्थसंकल्पात कमी उत्पन्न व मध्यम उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांसाठी फायद्याच्या घोषणा केल्याने, या करदात्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केंद्रीय अर्थसंकल्पात असे नमूद करण्यात आले आहे, की प्राप्तिकराच्या नव्या करप्रणालीनुसार, प्राप्तिकर सवलत रु. ७ लाखांवरून (आर्थिक वर्ष २०२४-२५) रु. १२ लाखांपर्यंत (आर्थिक वर्ष २०२५-२६) वाढविण्यात आली आहे. ही करसवलत सरसकट दिलेली नाही, तर टॅक्स रिबेट कलम ८७ए द्वारे दिली आहे, हे लक्षात असणे आवश्यक आहे. या करसवलतीमुळे, सर्वच करदात्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ (चालू वर्ष) व आर्थिक वर्ष २०२५-२६ (पुढचे वर्ष) साठी करनियोजन करणे खूप गरजेचे आहे.