
Will the Dollar Remain the King of Currencies?
E sakal
विक्रम अवसरीकर
vikram.awsarikar@gmail.com
पहिल्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश पौंड हे जगातील सर्वांत महत्त्वाचे चलन होते; पण दोन महायुद्धांमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. याच वेळी, अमेरिका युद्धांमध्ये सामील असली, तरी तिच्या भूमीवर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
उलट, युरोपला मदत करण्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात उत्पादन केले, ज्यामुळे तिची अर्थव्यवस्था मजबूत झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४४ मध्ये ब्रेटन वुड्स करार झाला. या करारानुसार, अमेरिकेने आपल्या डॉलरचे मूल्य सोन्याशी निश्चित केले (एक औंस सोन्यासाठी ३५ डॉलर) आणि इतर देशांनी त्यांची चलने डॉलरशी जोडली.
यामुळे डॉलर हे जगाचे ‘सुवर्ण-चलन’ बनले. या करारामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरचा वापर वाढला. इतर देशांना व्यापार करण्यासाठी आणि त्यांचे चलन स्थिर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर साठवून ठेवावे लागले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार, तिच्या आर्थिक बाजारपेठांची खोली आणि स्थिरता यामुळे डॉलरला जगभरात विश्वासार्हता मिळाली. ही विश्वासार्हता इतकी वाढली, की १९७१ मध्ये अमेरिकेने जेव्हा डॉलरला सोन्याशी जोडणे थांबवले (Nixon Shock), तेव्हाही त्याचे वर्चस्व कमी झाले नाही. डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे अमेरिकेला एक मोठा फायदा झाला, ज्याला ‘अवाजवी’ (Exorbitant Privilege) म्हणतात. यामुळे अमेरिकेला कमी व्याजदराने कर्ज मिळते, कारण जगभरातील देश अमेरिकेच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात; तसेच, अमेरिकेला आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याच चलनातून करण्याचा फायदा मिळतो, ज्यामुळे त्यांना परकी चलन साठवून ठेवण्याची गरज लागत नाही.