

आनंद परांजपे
anand@eximmanagementservices.com
जगाच्या नकाशावर, दळणवळण क्षेत्रामध्ये भारताला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले. वाढवण बंदर हे भारतातील सर्वांत मोठे कंटेनर बंदर होणार आहे. त्यामुळे देशाच्या सागरी व्यापार क्षेत्रात क्रांती होईल.
भारताचे धोरणात्मक स्थान, वाढती अर्थव्यवस्था आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प यामुळे जागतिक दळणवळण क्षेत्रामध्ये भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. आव्हाने असूनही, देशाने आपली दळणवळण क्षेत्रातील कामगिरी सातत्याने सुधारली आहे.
२०२३ मध्ये जागतिक बँकेच्या दळणवळण कार्य परिमाण तालिकेमध्ये (लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स-LPI) एकूण १३९ देशांमध्ये भारत ३८व्या क्रमांकावर होता. २०१४ मध्ये भारत ५४ व्या क्रमांकावर होता. म्हणजेच गेल्या १० वर्षांत आपल्या देशाने १६ स्थानांची आघाडी घेण्याची किमया साधली आहे. ‘प्रधानमंत्री गति शक्ती’ कार्यक्रमासारख्या सरकारी उपक्रमांसह, दळणवळण क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्याची भारताची वचनबद्धता, याला प्रामुख्याने जबाबदार आहे.