
विशाखा बाग
gauribag7@gmail.com
‘व्हाय भारत मॅटर्स’ हे भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाल्यापासूनच ते वाचण्याची तीव्र इच्छा आणि उत्सुकता होती. या पुस्तकात भारताचा राजकीय इतिहास आणि भारताची सध्या आर्थिक सुबत्तेकडे होत असलेली वाटचाल सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. प्रामुख्याने मागच्या दहा वर्षांत राजकीय धुरंधर नीतीने परराष्ट्रांशी वाढविलेले हितसंबंध आणि या सर्वांमुळे सध्या जागतिक पटलावर भारताची सर्वार्थाने उंचावलेली प्रतिमा या सर्व गोष्टींचे मुद्देसूद आणि वास्तविक चित्रण विविध उदाहरणांच्या आधारे या पुस्तकामध्ये केलेले आहे.
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकातील एक वाखाणण्याजोगा वेगळा पैलू म्हणजे जयशंकर यांनी वेळोवेळी परराष्ट्रीय संबंध जोपासताना एकाच वेळी विविध धोरणात्मक निर्णय कसे घ्यावे लागतात, हे सांगितले आहे आणि हे निर्णय घेताना जयशंकर यांनी आपल्या पौराणिक आणि प्राग इतिहासातील वेगळ्या ऐतिहासिक महापुरुषांचे महत्त्व आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे दाखलेसुद्धा पुस्तकात अत्यंत विस्तृतरित्या मांडलेले आहेत. हजारो वर्षांपासून भारताच्या इतिहासात घालून दिलेले राजनीतीचे धडे आणि सद्यःस्थितीतील विविध निर्णय घेण्यापर्यंत त्याचा उपयोग कसा होतो, हे त्यांनी विषयाची योग्य प्रकारे सांगड घालून बाहेरच्या जगाला दाखवून दिले आहे. रामायण आणि महाभारतातील गोष्टींची आणि पात्रांची सध्याच्या भारतीय परराष्ट्र धोरणाशी उत्तम सांगड घातल्याने, एकप्रकारे रामायण आणि महाभारताचे महत्त्व आताच्या पिढीला आणि भारताबाहेरच्या जगातदेखील पोचविण्याचे काम या पुस्तकातून झाले आहे.