
ॲड. सायली गानू-दाबके
contact@lexonomix.com
आपला देश हा स्टार्ट-अप हब म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मेळ घालून उभारला जाणारा उद्योग म्हणजे स्टार्ट-अप अशी ढोबळ व्याख्या करता येईल. बुद्धिमान भारतीय तरुणाई नावीन्यपूर्ण ‘स्टार्ट-अप’ उभारत असून, सरकारनेही ‘स्टार्ट-अप इंडिया’ अभियान राबवून त्याला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात ‘स्टार्ट-अप’ हा शब्द चांगलाच रुजला आहे. अनेक स्टार्ट-अप कंपन्या चांगली कामगिरी करत असून, त्या बड्या कंपन्या बनल्या आहेत. काही स्टार्ट-अप मोठा गाजावाजा करून सुरू होतात. मात्र, पुढे ते बंद होतात. यामागे नेमकी काय कारणे असतात? याचा वेध घेण्याचा प्रयत्न.
पूर्वी नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाला ‘स्टार्ट-अप’ असे म्हटले जात नसे. आजकाल मात्र प्रत्येक नव्या व्यवसायाला ‘स्टार्ट-अप’ असे म्हटले जाते. माझी ‘स्टार्ट-अप’ कंपनी आहे, असे अभिमानाने सांगितले जाते. कोविड महासाथीच्या काळात अनेकांनी स्वतःचे विविध उद्योग-व्यवसाय सुरू केले, त्यातील अनेक यशस्वी झाले. कोविडनंतरच्या काळात स्टार्ट-अपचा जोर इतका होता, की सरकारनेदेखील त्याची दखल घेतली आणि २०२२ पासून १६ जानेवारी हा दिवस भारतात ‘स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. त्यापूर्वी १६ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने ‘स्टार्ट-अप इंडिया’ हा उपक्रमदेखील सुरू केला होता.