उंच इमारतींमागे दडलंय काय?

prof shahaji more
prof shahaji more

सध्या जगात सर्वत्र नागरी जीवनाच्या हव्यासापायी उंच इमारतींचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दोनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती १९३० मध्ये जगभरात फक्त सहा होत्या. २०१९ अखेर ही संख्या १५९८ होणार आहे. त्यात अनेक इमारती तीनशे मीटरहून अधिक उंच आहेत. यात अर्थातच चीन आघाडीवर आहे. गेल्या वर्षी जगात १४३ उंच इमारती बांधल्या गेल्या, त्यातील चीनमध्ये ८८ उभारल्या गेल्या. भारत याबाबतीत आघाडीवर नसला, तरी मुंबईत दोनशे व तीनशे मीटरहून अधिक उंचीच्या इमारती चाळीसहून अधिक आहेत, तर पुण्यात शंभर मीटरहून अधिक उंचीच्या इमारती सुमारे वीस आहेत.

आपण कौतुकाने ज्यांना टॉवर्स किंवा स्कायस्क्रॅपर्स म्हणतो व समृद्धी, संपन्नतेचे एक लक्षण मानतो, ते टॉवर्स आपल्या व सभोवतालच्या सजीव सृष्टीच्या अनारोग्याचे कारण आहे; तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाचेही एक कारण आहे. या उंच इमारतींसाठी फार मोठी किंमत-आर्थिक तर आलीच, शिवाय आरोग्याचीहीसुद्धा मोजावी लागणार आहे. शेजारी असणाऱ्या अनेक उंच इमारतींमुळे त्या इमारतींमध्ये व आसपास पुरेसा सूर्यप्रकाश पोहचू शकत नाही. जपान, स्वित्झर्लंड व अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये जमिनीवर पुरेसा व पुरेसा काळ सूर्यप्रकाश पडावा, याबद्दल काही नियम आहेत. युरोपमध्येही त्याविषयी काही नियम आहेत. ते अजून अमलात आलेले नाहीत. जर्मनीने मात्र ते स्वीकारले आहेत. इतरत्र मात्र या प्रकाशाबाबत ‘अंधार’च आहे किंवा प्रकाशाबद्दल काही नियम असू शकतात, याबाबत अज्ञान आहे. अनेक उंच इमारती सुयोग्य नियोजनाचा विचार करून उभारलेल्या असतातच असे नाही. सर्वांच्याच निरोगी व निकोप वाढीसाठी सूर्यप्रकाश हा गरजेचा व महत्त्वाचा आहे. केवळ मानवाच्याच नव्हे, तर अन्य प्राणी व वनस्पती, झाडे यांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. असे असूनही ‘प्रकाशाचा अधिकार’ (राईट टू लाइट) ही संकल्पना अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. आश्‍चर्याची बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘आरोग्यसंपन्न शहरे संकल्पने’ (हेल्दी सिटीज कन्सेप्टड) मध्ये वा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्‍वत विकासाच्या सतरा उद्दिष्टांमध्येही नैसर्गिक उजेडाच्या उपलब्धतेचा उल्लेखही नाही.

सूर्यप्रकाश, नैसर्गिक प्रकाश हा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्‍यक असतो. तो आपल्या शरीरातील अनेक मूलभूत जैविक प्रक्रियांना चालना देत असतो. आपले जैविक घड्याळ, आपली मनःस्थिती राखण्याचेही काम नैसर्गिक प्रकाशाकडून होत असते. औद्योगिक क्रांतीपूर्वी जनजीवन मोकळ्या हवेत व्यतीत होत असे. औद्योगिक क्रांतीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश आत यावा, म्हणून खिडक्‍या मोठ्या ठेवल्या जात. पुढे विजेचा शोध लागल्यानंतर विजेचे दिवे उपलब्ध झाले आणि माणसाने ‘रात्रीचा दिवस केला!’ आज वीज हा जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे; इतका की आज आपण नैसर्गिक प्रकाश व त्याचे महत्त्व विसरूनच गेलो आहोत.
युरोपातील आणि उत्तर अमेरिकेतील नागरिक सुमारे ९० टक्के वेळ बंद दाराआड (इनडोअर) व्यतीत करतात. कार्यालयांमध्येही कृत्रिम प्रकाशात बसतात, काम करतात. मुलेही शाळांमध्ये कृत्रिम प्रकाशात शिकतात. जेव्हा ते बाहेर पडतात, तेव्हा उंच इमारतींमुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाशाच्या प्रदीर्घ अभावामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहेत. १९६० पासून ‘ऱ्हस्वदृष्टिता’ (मायोपिया) हा नेत्ररोग वाढत चालला आहे व त्याचा संबंध नैसर्गिक प्रकाशाच्या कमतरतेशी जोडला जात आहे. जपान, तैवान, हाँगकाँग व सिंगापूरमधील ७०-८० टक्के नागरिक मायोपियाने ग्रस्त आहेत व २०५० पर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त असेल, असे शास्त्रज्ञ सांगतात. त्याचबरोबर सूर्यप्रकाशाअभावी जगातील एक अब्ज लोक ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने अर्थात मुडदूस व अन्य हाडांच्या विकारांनी त्रस्त आहेत. सूर्यप्रकाशामुळे व्याधी दूर होतात. बाहेरील औषधांमुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची भर पडत असली, तरी सूर्यप्रकाशामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची वाढलेली मात्रा ही औषधांमुळे वाढलेली मात्रा जेवढा वेळ शरीरात असते, त्याच्या दुप्पट काळ शरीरात राहते, शिवाय त्याचे औषधांप्रमाणे दुष्परिणामही होत नाहीत.

सूर्यप्रकाशाअभावी नैराश्‍य, सीझनल ॲफेक्‍टिव्ह डिसऑर्डर, सुप्त क्षयरोग इ. उद्‌भवतात. सूर्यप्रकाशामुळे या व्याधी दूर होतातच, शिवाय त्यामुळे इस्पितळांचा भारही कमी होतो.उंच इमारतींसाठी भरपूर ऊर्जा लागते. सात मजली इमारतीला जेवढी वीज लागते, त्याच्या अडीचपट वीस मजली इमारतींसाठी वीज लागते. अधिक ऊर्जा म्हणजे अधिक प्रदूषण, हे समीकरण आलेच, म्हणजेच वाढता पर्यावरणऱ्हास! सूर्यप्रकाशामुळे झाडांची, वनस्पतींचीही वाढ चांगली होते. त्यांच्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्‍साईड व अन्य प्रदूषक वायू शोषले जातात. सूर्यप्रकाश पुरेसा नसेल, तर प्रकाशसंश्‍लेषणात अडथळा येतो व वनस्पतींची वाढ खुंटते. त्यामुळे ‘प्रकाशाची उपलब्धता’ हा विषय जागतिक स्तरावर आरोग्य, जीवनमान या विषयाबरोबर चर्चिला गेला पाहिजे. नागरिकीकरणाविषयी, उंच इमारतींविषयींचे धोरण या दृष्टिकोनातून निश्‍चित केले पाहिजे. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असला, तरी महानगरातील उंच इमारतींची उभारणी नजीकच्या काळात चिंतेचा विषय बनू शकते. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com