मृत ताऱ्याची धूळ अंटार्क्‍टिकामध्ये

सुरेंद्र पाटसकर
शनिवार, 4 मे 2019

पृथ्वीची निर्मिती कशी झाली? आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली? याची अचूक माहिती मिळविण्याचे प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. या प्रयत्नातील दुवा शास्त्रज्ञांना नुकताच सापडला आहे.

पृथ्वीची निर्मिती कशी झाली? आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली? याची अचूक माहिती मिळविण्याचे प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. या प्रयत्नातील दुवा शास्त्रज्ञांना नुकताच सापडला आहे.

आ पली सूर्यमाला निर्माण होण्यापूर्वी अब्जावधी वर्षांपूर्वी एका ताऱ्याचा स्फोट झाला आणि तो मृत झाला. या मृत ताऱ्याचे काही कण अवकाशात इतस्ततः विखुरले. त्यातील काही कण एका एका उल्केवर जाऊन पडले. नंतर कधीतरी ही उल्का पृथ्वीवरील अंटार्क्‍टिका भागात पडली. हजारो वर्षे ती बर्फाखाली गोठली गेली. ही गोठली गेलेली उल्का आणि त्यावर साठल्या गेलेल्या मृत ताऱ्याच्या कणांचा (धुळीचा) शोध शास्त्रज्ञांना लागला आहे.

अरिझोना विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक पिएरे हॅनेकोर यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या संघाला उल्केमध्ये सामावलेले हे धूलिकण सापडले आहेत. त्यातील एक धूलिकण व्यवस्थितरीत्या मिळविण्यात त्यांना यश आले आहे. एलएपी- १४९ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. एका इंचाचा पंचवीस हजाराव्या भागाएवढा त्या धूलिकणाचा आकार आहे.

या धूलिकणाच्या अभ्यासातून आपली सूर्यमाला कशी तयार झाली, त्या वेळी कशी परिस्थिती होती, याची माहिती मिळू शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. त्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती नेचर ॲस्ट्रोनॉमी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ताऱ्याचा मृत्यू होत असतानाची स्थिती आणि तारकीय कणांची माहिती या धूलिकणाच्या माध्यमातून मिळू शकेल. मोठा स्फोट होऊन ताऱ्याचा मृत्यू होत असताना तयार झालेल्या कणांचे फारच थोडे अवशेष आतापर्यंत मिळाले आहेत, त्यातही असे कण पृथ्वीवर मिळणे जवळपास अशक्‍य आहे. अंटार्क्‍टिकामध्ये मिळालेल्या कणाचे महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे.

हॅनेकोर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ॲरिझोना विद्यापीठातील लुनार अँड प्लॅनेटरी लॅबरोटरीतील उपकरणाचा वापर करून या धूलिकणाचे पृथक्करण केले. तेव्हा या कणामध्ये कार्बनचे ‘सी-१३’ हे समस्थानिक विपुल प्रमाणात असल्याचे आढळून आले. तसेच, विविध प्रकारच्या सूक्ष्मदर्शकांतून त्याचे निरीक्षण केल्यानंतर ग्राफाईट आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून हे कण तयार झाल्याचे निष्पन्न झाले. ताऱ्याचा स्फोट झाल्यानंतरचे हे कण असावेत असा निष्कर्ष विविध मॉडेलच्या अभ्यासातून शास्त्रज्ञांनी काढला. परंतु, या एलएपी- १४९ या कणात पुरेसे अणू न सापडल्याने त्याचे वय निश्‍चित करणे शास्त्रज्ञांना शक्‍य झाले नाही. परंतु, त्या उल्केच्या वयाचा अभ्यास करून हे कण किमान ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचे असावेत, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. आपली सूर्यमाला होण्याच्या कालावधीच्या जवळ जाणारा हा कालावधी आहे. अशा प्रकारचे आणखी काही कण सापडण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे.
या कणाचे वय निश्‍चित करता आले तर आपल्या सूर्यमालेची आणि आकाशगंगेबाबतची अधिक माहिती आपल्याला मिळू शकेल. परंतु, ताऱ्याचा स्फोट होतानाचा पुरावा आपल्याला हातात आहे. हबल दुर्बिणीच्या साह्याने ताऱ्यांच्या स्फोटाची नोंद करण्यात आली आहे. त्याच प्रकारच्या स्फोटाचा हा पुरावा आहे, असे मत लुनार अँड प्लॅनेटरी लॅबरोटरीतील साहाय्यक प्राध्यापक टॉम झेगा यांनी व्यक्त केले.

एखाद्या जीवाश्‍माप्रमाणे हे धूलिकण उल्केमध्ये साठवले गेले. तारा मृत होत असताना तो आणखी एका मोठ्या ताऱ्याकडे खेचला गेला असावा, त्या वेळी झालेल्या टकरीतून प्रचंड ऊर्जा बाहेर सोडली गेली असावी; आणि मृत होणाऱ्या ताऱ्याचे कण अवकाशात फेकले गेले असावेत, असे मत झेगा यांनी व्यक्त केले. सूर्यमालेच्या उत्पत्तीचा शोधातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. पृथ्वीवर असलेली मूलद्रव्ये कशी तयार झाली असावीत, याचाही थोडाफार अंदाज यातून येऊ शकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surendra pataskar write antarctica and earth scitech article in editorial