धावते उगीच विचार

sonali navangul
sonali navangul

‘‘कलावंताला अभिव्यक्त व्हायला माध्यमाची अट नसते. अभिव्यक्त व्हायचं असेल तर कुणी कसलंही माध्यम निवडेल, कारण अभिव्यक्तीला साचा नसतो. अभिव्यक्त होत असताना ऐकणं हेही अभिव्यक्त होणच असतं. कारण कुणीतरी इथून बोलत असतं, त्या वेळी माझ्या मनात त्याविषयीची काही निर्मिती होत असते. लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण, ही शिक्षणाबद्दलची संकुचित भावना इंग्रजांनंतर निर्माण झाली. शिक्षण आणि शहाणपण यात जमीन-अस्मानाचं नातं असतं,’’ तारा भवाळकर बोलत होत्या. वाटलं, खरंचय, किती घोळ होतो आपला शिक्षण नि शहाणपण, बोलणं नि ऐकणं यातला सांधा जुळवण्यात. प्रतिष्ठा देण्यात. कुणाचं शिक्षण किती नि कुणाचं वाचन, बोलणं सरस यातून उरलेल्यांच्या मनात किती फसवी असुरक्षितता तयार होते. कुणी मन लावून ऐकत असेल, तर ती अभिव्यक्तीच हे रिचायला वेळ का लागतो. एक मित्र म्हणतो, ‘मी काही वाचत नाही, दोन ओळी वाचल्या की लक्ष हटतं माझं. सिनेमे बघताना झोप येते. असले भारी छंदच नाहीत मला. बोगस वाटतं यार!’ तेव्हा वाटतं, ‘वाचणारे, पाहणारे, काहीतरी थेट निर्मिती करत राहणारे महत्त्वाचे,’ अशी प्रतिष्ठा दिली गेल्यामुळं जे केवळ पाहतात, ऐकतात, काही घडू शकणाऱ्या गोष्टीचे अबोल सांधे बनतात, त्यांना ‘आपण काहीच नाहीये’ हा भ्रम तयार होतोय. लेफ्ट आउट वाटत राहातं. या लेफ्ट आऊट वाटण्यातून काय काय घडत असेल?
माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलेलं एकदा, की तिला मध्यमवर्गीय बुजबुजलेपणाचा फार त्रास व्हायचा की याला असं वागवायचं नि तमूक तसा आहे म्हणून त्याला तसं. या कोतेपणातून बाहेर पडण्यासाठी म्हणून तिनं ठरवलेलं की कामबिम सेट झाल्यावर लग्न करेन, तर मराठी माणसाशी अजिबातच करणार नाही. त्यामुळं विशिष्ट जगण्याचे जे पॅटर्न होऊन गेलेले असतात, ते असणार नाहीत व दोन वेगळ्या जगातली माणसं संस्कृती, शिस्त, वळण म्हणून एकमेकांवर काही लादणार नाहीत. ते जे व्यक्त होतील ती त्यांची निखळ अभिव्यक्ती असेल. त्यातून कलाबिला न निर्माण होऊदे, एकमेकांच्या कलानं वागण्याचा जाच तरी होणार नाही. भवाळकरबाई म्हणतात तसं हे शहाणपण पठडीबाज शिक्षणातून कुठं येतं? जगण्याच्या दबावातून, हिंसेतून, दांभिकतेतून हा निर्णय झाला की. मध्यमवर्गीय संस्कृतीचा गाभाच मुळात एकमेकांना घाबरून, घाबरवून, चौकटीत बसवायचं हा. तो तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडत असेल तर दाबून, कोंबून त्याला तिथं अडकवायचं. एकमेकांबद्दलची असूया, प्रेम, राग व त्यातून एकमेकाला काबूत ठेवण्यासाठी चांगलं काय नि आदर्श काय याचे पॅटर्न घडवले जातात. कुठलीही प्रतीकं नि प्रतिमा बनवण्या-मानण्यातून सुटलो, तर स्वत:ला खूप काही ऑफर करू शकू म्हणून अभिव्यक्तही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com