esakal | मन मंदिरा...: मॅरेज मॅन्युएल
sakal

बोलून बातमी शोधा

मन मंदिरा...: मॅरेज मॅन्युएल

मन मंदिरा...: मॅरेज मॅन्युएल

sakal_logo
By
- डॉ. विद्याधर बापट

“A great marriage is not when the ‘perfect couple’ comes together. It is when an imperfect couple learns to enjoy their differences.” - Dave Meurer

आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याच्याबरोबर ती कशी चालते, कुठली काळजी घ्यावी, हे सगळं सांगणारी एक पुस्तिका, मॅन्युएल येते. नातं जोडताना ते कसं टिकेल, कसं बहरेल, त्यासाठी काय करावं हे सांगणारी कुठलीही पुस्तिका नसते. जोडीदाराला समजून घेत घेतंच संसार सुखी होऊ शकतो. त्यासाठी काही निश्चित अशा टिप्स आहेत. आपला जोडीदार सर्वार्थाने परिपूर्ण असलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे तो अट्टाहास नसावा. तसं कुणीच सर्वगुणसंपन्न असू शकत नाही.

प्रत्येकाची भावनिक वीण, मनाची धाटणी वेगवेगळी असते. ती ओळखणं, मान्य करणं  आणि त्यानुसार सुरवातीला जमवून घेण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं. नंतर सूर जसे जमत जातील, तशी समोरची व्यक्ती आणि आपणसुद्धा बदलत जातो. त्यासाठी वेळ द्यायला हवा. सुखी  लग्नामध्ये जोडीदाराकडून आपण किती सुख घेतोय यापेक्षा त्याला किती सुख देतोय, हा विचार सर्वात महत्वाचा.  हे सगळं साधण्यासाठी आपण आतून स्वस्थ असणं महत्वाचं. ते तसं नसेल तर त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणं, जरूर भासल्यास मदत घेणं फार महत्वाचं आहे. अन्यथा जोडीदाराला समजून घेणं ही गोष्ट अशक्य होऊन बसते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्वाच्या गोष्टी म्हणजे निर्व्यसनीपणा, शारीरिक सुख देण्या-घेण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता, जोडीदाराला योग्य तो आदर आणि सन्मान देणं, त्याच्या भावनांची कदर करणं, योग्य आर्थिक नियोजन, काळानुसार पुरुष श्रेष्ठत्वाच्या कल्पना बदलणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर, त्याला किंवा तिला व्यावसायिक मित्र किंवा मैत्रिणी असणारच हे मान्य करणं (विशिष्ट मर्यादेपर्यंत मैत्री), एकमेकांना वेळ देणं, जोडीदाराचा उत्कर्ष होण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, याबाबतीत अहंकार आडवा न येऊ देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोडीदारावर पूर्ण विश्वास असणं.

इगो किंवा अहंकार हा वैवाहिक जीवन उद्धवस्त करू शकतो. किंबहुना घटस्फोटासारख्या सध्याच्या गंभीर समस्येमागे हेच प्रमुख कारण आहे. आयुष्यातल्या किंवा संसारातल्या महत्वाच्या निर्णयामध्ये दोघांनीही सहभागी होणं महत्वाचं, त्याचबरोबर प्रत्येकवेळी माझाच निर्णय बरोबर तो मी लादणार हे चुकीचं आहे. दोघांमध्ये शांतपणे चर्चा व्हाव्यात. दुसऱ्याची बाजू ऐकून घायची तयारी हवी. मत मांडण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात दोघंही पतिपत्नी कमवत असतात. जर पत्नीचा पगार जास्त असेल तर तो भांडणाचा मुद्दा बनू नये. कारण यामागे केवळ अहंकार दुखावला जाणे हेच कारण असते. अर्थात पत्नीचीही वागण्याची पद्धत समजूतदारपणाची हवी.

दोघात निर्माण झालेले प्रेम असे मुद्दे निर्माणच होऊ देत नाहीत. सध्या ऑफिसमधील कामाचे प्रेशर वाढलेले असते. टार्गेट्स पूर्ण करायची असतात. वर्क फ्रॉम होममुळे सतत घरात असणं, समोर तेच तेच चेहरे, लहान सहान कारणांवरून चिडचिड, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हवं तेव्हा प्रत्यक्ष भेटता न येणं, त्यामुळे होणारी घुसमट, मुलांची ऑनलाईन शाळा, त्यांची मोबाईल ऍडिक्शन्स, ज्यांना ऑफिसमध्ये जावं लागतं त्यांना वाहतुकीसारखे इतर प्रश्न असतात. अशावेळी स्वस्थता हवी असते, हे दोघांनीही समजून घ्यायला हवे.

हे सगळं समजून घेतल्यावर भांडणं होणारच नाहीत असं नाही; पण पुरेसं प्रेम, विश्वास याचा पाया असेल तर समेट लवकर होईल. नात्यात कायमची कटुता निर्माण होणार नाही. आता महत्वाचे म्हणजे दोघांची शारीरिक तपासणी आणि दोन्ही व्यक्तिमत्व एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत हा मुद्दा? लग्नापूर्वी दोघांनीही रक्त व इतर शारीरिक तपासणी करून घेणे व कुठलाही निष्कर्ष एकमेकांपासून न लपवणे अतिशय महत्वाचे आहे. लग्नापूर्वी अनेकदा भेटणे व जोडीदाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे.

आपल्या कल्पना आणि अपेक्षा मोकळेपणाने सांगणे अत्यावश्यक. लग्नापूर्वी सर्वच बाबतीत तज्ज्ञांशी बोलणे महत्वाचे आहे. काही व्यक्तिमत्वे एकमेकांना पूरक नसू शकतात. काय काळजी घ्यावी किंवा कुठल्या सुधारणा करणे शक्य आहे  हे तज्ज्ञच सांगू शकतात. लग्न करताना बाह्य व्यक्तिमत्वापेक्षाही, ती व्यक्ती समजूतदार, आनंदी आणि शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टीने जबाबदार आहे की नाही हे महत्त्वाचे. व्यक्तीच्या ‘दिसण्या’पेक्षा ‘असणे’ महत्त्वाचे ठरते.

loading image
go to top