

Anti-Defection Law or Escape Route? Decoding the Two-Thirds Rule in 2026 Politics
Sakal
अलौकिक बुद्धिमत्ता तिने जे करायला पाहिजे तेच करते आणि हुशारी तिला जे शक्य असेल तेच करते. — ई. बुलवेअर लिट्न
देशात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याची स्वप्ने दाखवत आणि प्रस्थापित राजकारणापेक्षा आपण संपूर्णतः वेगळे आहोत, असे दाखवत सत्ता मिळविणाऱ्या पक्षसंघटनांत कालांतराने व्यक्तिस्तोम वाढते आणि पूर्णतः वेगळे असल्याचा त्यांचा दावाही फोल ठरतो. आम आदमी पक्षाच्या (आप) बाबतीत तसेच काहीसे झाले आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांच्या एकचालकानुवर्तित्वाला कंटाळून त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना रामराम ठोकला. अशा अधूनमधून होत राहिलेल्या गळतीतील सर्वांत मोठा धक्का म्हणून राघव चढ्ढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षांतराकडे पाहावे लागेल. याचे कारण चढ्ढा यांच्यासह सात राज्यसभा सदस्य पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत. ‘दोन तृतीयांश’चा नियम पाळून हे पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर त्याला आव्हान देता येणार नाही. पण प्रश्न आहे तो नीतिमूल्यांचा. त्याची चाड कोणालाच नाही. पक्ष सोडून जाणाऱ्यांना नाही आणि त्यांना पक्षात घेणाऱ्या भाजपलाही नाही. खरे तर पक्षांतरविरोधी कायदा झाला, तेव्हाच त्यात ही पळवाट का ठेवली, असा प्रश्न विचारला गेला होता. एखाद-दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या पक्षांतराबद्दल सदस्यत्व रद्द होण्याची शिक्षा आणि दोन-तृतीयांशपेक्षा अधिक व्यक्तींनी पक्ष सोडला की ती मात्र वैध पक्षफूट! एकच कृत्य; पण घाऊक प्रमाणात केले की चालते, हे कसे काय, अशी टीका हा कायदा झाला त्यावेळीच करण्यात आली होती आणि त्यात तथ्यही होते. तरीही तो कायदा तसाच केला गेला आणि राघव चढ्ढा यांच्यासारखे त्याचा फायदा उठवत आहेत.