कलेचं मूळ भाषा अन्‌ संस्कृतीत

आशित साबळे
शनिवार, 25 मे 2019

लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत असताना काही असे मित्र-मैत्रिणी भेटले, ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा जोतिराव फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, अण्णाभाऊ साठे ते कॉ. गोविंद पानसरे, डॉ. भारत पाटणकर आणि अनेक लेखकांचं साहित्य वाचनात आलं. पुरोगामी चळवळीला जवळून पाहू लागलो.

लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत असताना काही असे मित्र-मैत्रिणी भेटले, ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा जोतिराव फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, अण्णाभाऊ साठे ते कॉ. गोविंद पानसरे, डॉ. भारत पाटणकर आणि अनेक लेखकांचं साहित्य वाचनात आलं. पुरोगामी चळवळीला जवळून पाहू लागलो. लहानपणी लोकशाहीर विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांची गाणी ऐकून एकदम भारी वाटायचं. तेव्हापासूनच लक्षात आलं, की आपल्याला लोकसंगीत खूप आवडतंय. एका आंदोलनामध्ये संभाजी भगत यांना रस्त्यावर गाणं गाताना पाहिलं. जमाव त्यांना बघतो, ऐकतो आणि सगळे निघून जातात. तेव्हा मी ठरवलं की ही कला आणि या कलाकारांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण यावर अभ्यास करून हे सर्व व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करू आणि याचा माहितीपट बनवू.

मी वैयक्तिक विचार बाजूला ठेवून माहितीपटाचा एकूण आराखडा बनवला. दैववादी व पारंपरिक शाहिरीपासून सुरवात केली. शाहिरी या कलेचा एक हजार वर्षांपूर्वीचा संपूर्ण इतिहास समोर आणायचं ठरवलं. पारंपरिक शाहिरी, गोंधळ, लावणी, शिवकालीन शाहिरी, सत्यशोधक चळवळ, पेशवाई, तमाशा, ब्रिटिशकालीन राष्ट्रीय शाहिरी, आंबेडकरी जलसे, गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, लाल बावटा कलापथक, आधुनिक शाहिरी, कामगार रंगभूमी आणि विद्रोही शाहिरी असे अनेक आणि यापेक्षाही जास्त टप्पे माहितीपटात समाविष्ट केले. कॉलेजात असताना म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केलेलं हे संशोधन आणि माहितीपट बनवण्याचे प्रयत्न मी कॉलेजच्या अभ्यासाच्या जोडीनेच सुरू ठेवले. २०१४ मध्ये पदवीधर झालो आणि तीन वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये ‘शाहिरी’ या नावाचा माहितीपट पूर्ण केला. त्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना स्थानिक पातळीवर अनेकांनी मोठी मदत केली.   
कला ही आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी असते. तिच्यावर कोणाचंच कसलंच बंधन असू नये, असं माझं मत आहे. कोणत्याही कलेचं मूळ हे त्या लोकांच्या आणि त्यांच्या भाषा आणि संस्कृतीशी असलेल्या नात्यात असतं. त्यामुळे त्याचा गैरवापर करून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या कलेमुळे कोणा पीडिताचे प्रश्‍न सुटत असतील, तर ही क्रांतिकारी गोष्ट ठरेल. आपण म्हणतो, की साहित्य हा समाजाचा आरसा आहे. मला वाटतं की चित्रपटसुद्धा (लघुपट/माहितीपट किंवा व्यावसायिक चित्रपट) समाजाचा आरसा असले पाहिजेत. आजचे चित्रपट आपल्याला फक्त कल्पनाविश्‍वात रमवून ठेवतात. हे पाहून ठरवलं, की मी पुढे जाऊन असे चित्रपट बनवीन जे अर्थपूर्ण असतील. हॉलिवूडमध्ये ज्या काल्पनिक विज्ञानकथांवर चित्रपट बनवले जातात, ते तिथल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतून आलेले असतात. तेथील लोकांना नागरिक म्हणून आपल्या तुलनेत फार कमी समस्या आहेत. तिकडचे रस्ते चांगले आहेत, सर्वांना पुरेसं पाणी मिळतं, सुरक्षा यंत्रणा चांगलं काम करते, काहीही झालं तरी विमा असतो, त्याखेरीज सरकार आणि प्रशासन नागरिकांना पूर्ण मदत करते. त्यांनी विज्ञानात एवढी प्रगती केली आहे, की त्यावरचे चित्रपट तिकडे जास्त येतात. समस्या असतील त्या नातेसंबंधात, त्यावरसुद्धा अमाप सिनेमे आहेत. आपल्याकडे सगळ्याच मूलभूत प्रश्‍नांची ओरड.  
मला हे काम करताना वाचनाची खूपच मदत झाली. एक चित्रपट दिग्दर्शक होण्यासाठी तंत्रापेक्षाही सम्यक विचारांची गरज असते, हे मला उमगलं, जे वाचन आणि अनुभवातून येतं. माझं असं मत आहे, की प्रत्येकानं प्रायोगिक पातळीवर काम केल्यावर त्यात पुढे व्यावसायिक पद्धतीनं काम करायला वेळ दवडू नये.

(लेखक शाहिरीचे अभ्यासक आणि चित्रपटनिर्माते आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashit sabale write youthtalk article in editorial