esakal | ...तुला देतो पैसा!
sakal

बोलून बातमी शोधा

...तुला देतो पैसा!

ज्या भागात पावसाने दडी मारली आहे, तेथील शेतकऱ्यांवर कधी नव्हे इतकी वाईट वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

...तुला देतो पैसा!

sakal_logo
By
अभय दिवाणजी

महाराष्ट्र माझा :  पश्‍चिम महाराष्ट्र
ज्या भागात पावसाने दडी मारली आहे, तेथील शेतकऱ्यांवर कधी नव्हे इतकी वाईट वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. कृत्रिम पावसासाठी उपयुक्त ढगांचे संशोधन सुरू असून, त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. 

लहानपणी शाळेत असताना ‘ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा’ हे बालगीत गाताना भविष्यात खरोखरच पैसा दिल्याशिवाय पाऊस पडणार नाही, हे सांगूनही कोणास खरे वाटले नसते. परंतु, अलीकडील काळात मात्र तसेच झाले आहे. अत्यंत बेभरवशाच्या पावसावर अवलंबून असलेली शेती मोठ्या अडचणीत सापडली आहे. लहरी पर्जन्यमानाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. यावर मात म्हणून केंद्राच्या भूवैज्ञानिक मंत्रालयाच्या वतीने २५ शास्त्रज्ञांच्या पथकाद्वारे दोन वर्षांपासून कृत्रिम पावसासाठी उपयुक्त ढगांचे संशोधन सुरू आहे. ‘आयआयटीएम’ ही पुण्यातील संस्था यासाठी कार्यरत आहे. सोलापूरपासून दोनशे किलोमीटरच्या परिघात हा प्रयोग सध्या सुरू आहे. 

नैसर्गिक आपत्ती, नेहमीचाच भीषण दुष्काळ, त्यावर होणारा खर्च, त्यातून होणारे नुकसान यापेक्षा कृत्रिम पावसाद्वारे निसर्गावर मात करून सर्व बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भविष्यातील आपत्तीवरही मात करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. या ‘क्‍लाउड सीडिंग’द्वारे होणाऱ्या संशोधनातून शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांचेही हित साधले जाईल. ‘कॅपेक्‍स ४’ या नावाने मे २०१७ पासून या प्रयोगाला सुरवात झाली आहे. पावसाचे निरीक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी मंडलनिहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. सध्या ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी या संदर्भातील अभ्यासावर काही निरीक्षणे नोंदली गेली. परंतु, या प्रयोगाचा गतवर्षी फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. गेल्या वर्षी जवळपास ८३ नमुने गोळा केले गेले. यंदाही जवळपास १५० नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. जगभरातील जवळपास ५६ देशांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत.  

पावसासाठी आवश्‍यक ढगांवर संशोधन  
गेल्या तीन वर्षांपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातील बळिराजा दुष्काळाशी सामना करीत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर कधी नव्हे इतकी वाईट वेळ आली आहे. एखाद्या जिल्ह्यात तुफानी पाऊस, तर दुसऱ्या जिल्ह्यात केवळ ढगांचे दर्शन अशी स्थिती असते. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी यंत्रणा उभी केली गेली आहे. त्याचा अभ्यास सुरू असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सोलापूरच्या परिघातील ढगांच्या अभ्यासासाठी दोन विमाने कार्यरत आहेत. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात यासाठी ‘सी बॅंड’चे रडार बसविण्यात आले आहे. ही विमाने उडाली की आता कृत्रिम पाऊस पडणार, अशी अटकळ बांधली जात आहे. परंतु, पाऊस पडेल की नाही हे माहिती नाही, पावसासाठी आवश्‍यक असे ढग येतात की नाही याचे संशोधन सुरू असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्यातरी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अनुकूल ढग आले आहेत काय, याचे निरीक्षण होत आहे. गेली सलग दोन वर्षे पावसाअभावी पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे उत्पन्न म्हणावे तसे मिळाले नाही, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोलमडून पडला आहे. एखाद्या नक्षत्रात हमखास पाऊस येईल, अशी शाश्‍वती नसल्याने बळिराजावर मोठे संकट येते. किरकोळ स्वरूपात सुरवातीला पडलेल्या पावसामुळे केलेली पेरणी वाया जाऊन पुन्हा दुबार, तिबार पेरा करावा लागत आहे. अनेक वेळा नंतर पावसाने हुलकावणी दिल्याचेच दिसते. त्यातून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पावसाच्या असमतोलपणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून ‘क्‍लाउड सीडिंग’च्या प्रयोगावर भर देण्यात येऊ लागला आहे. ‘क्‍लाउड सीडिंग’मध्ये एका छोट्या विमानाद्वारे सिल्व्हर आयोडाईडसारखे रासायनिक घटक ढगांमध्ये सोडले जातात. यामुळे ढगांमध्ये असलेले पाण्याचे सूक्ष्म कण एकत्र होतात. त्यांचे आकारमान वाढल्याने ते जड होतात व पावसाच्या रूपाने खाली पडतात. ‘क्‍लाउड सीडिंग’ हे तंत्रज्ञान पाऊस पडण्यासाठी ढगांमध्ये अनुकूल वातावरण तयार करते. परदेशात असा प्रयोग मोठ्या प्रमाणावर होत असतो. गारांच्या पावसाने नुकसान होऊ नये म्हणून अमेरिकेने हे तंत्रज्ञान वापरात आणले आहे. शेतीसाठीच्या पाण्यासाठी अमेरिका, चीन, रशिया या मोठ्या देशांबरोबर फिलिपीन्ससारख्या छोट्या देशांमध्येही ‘क्‍लाउड सीडिंग’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकरी आणि देशवासीयांना त्याचा लाभ होईल.

loading image