सप्लिमेंट्‌सचा अतिरेक नकोच! 

अभिषेक ढवाण 
गुरुवार, 30 जुलै 2020

सध्याचा ‘कोरोना’ महामारीच्या परिस्थितीत सर्वच जण आरोग्याबाबत दक्ष असल्याने असे होणे साहजिक आहे. व्हिटॅमिन आणि सप्लिमेंटसाठी डॉक्‍टरची चिट्ठी लागत नसल्याने ते कोणीही खरेदी करू शकतात.

‘कोरोना’च्या काळात, मल्टीव्हिटॅमिनचे सेवन आणि रोगप्रतिकारशक्ती उच्च ठेवण्याचा ट्रेंड झाला आहे. आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवणे आणि त्यास योग्य पोषण प्रदान करणे चुकीचे नाही, मात्र त्याबद्दल योग्य ज्ञान न घेता त्याचे सेवन प्रमाणाबाहेर करणे अयोग्य आहे. 

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणते व्हिटॅमिन आणि सप्लिमेंट घ्यावे,  या विषयीच्या समाजमाध्यमांवरील संदेशांवर लोक लगेच विश्वास ठेवतात व अनेक जण ते विकत आणून खातातही. सध्याचा ‘कोरोना’ महामारीच्या परिस्थितीत सर्वच जण आरोग्याबाबत दक्ष असल्याने असे होणे साहजिक आहे. व्हिटॅमिन आणि सप्लिमेंटसाठी डॉक्‍टरची चिट्ठी लागत नसल्याने ते कोणीही खरेदी करू शकतात. मात्र, ते वैद्यकीय सल्ला न घेता घेणे चुकीचे कसे आहे, हे एका उदाहरणातून समजून घेऊ. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

रक्त तपासणी आवश्‍यक 
समजा तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’चे सेवन करायचे आहे. आता शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्‍यक पातळी आहे ३० नॅनोग्राम्स/मिलिलिटर ते ८० नॅनोग्राम्स/मिलिलिटर. समजा तुमच्या शरीरात आधीपासूनच ६५ नॅनोग्रॅम्स/मिलिलिटर पातळी आहे आणि ‘व्हिटॅमिन डी’चे सप्लिमेंट्‌स रक्ततपासणी न करता घेतल्यास काही आठवड्यांतच ती पातळी धोकादायक होईल. यालाच ‘हायपर व्हिटॅमिनोसिस डी’ म्हणतात व ही गंभीर समस्या आहे. 

अतिसेवन घातक
‘व्हिटॅमिन बी’ व त्याच्या प्रकारांचे अतिसेवन झाल्यास काही बिघडत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, उदा. ‘व्हिटॅमिन बी ६’चे अतिसेवन प्रदीर्घ काळासाठी केल्यास ते ‘सेन्सररी न्यूरोपॅथी’चे मूळ ठरू शकते. 

सध्या सर्रास अधिक खाल्ले जाणारे खनिज म्हणजे झिंक. वैद्यकीय उपचार सोडल्यास प्रौढ व्यक्तीला दिवसाला ८ ते १४ मिलिग्रॅम झिंक लागते. त्याचे प्रमाण अधिक झाल्यास शरीरातील तांबे आणि लोहाचे शोषण कमी होऊन इतर अनेक त्रास उद्‌भवू शकतात. आपल्या शरीराला कोणतेही व्हिटॅमिन किंवा खनिज ठरवून दिलेल्या एका ठराविक वैद्यकीय पातळीत लागते. मात्र, ते प्रमाणापेक्षा कमी सेवन केल्यास त्या संदर्भात कमतरतेचे आजार होतात व जास्त सेवन केल्यास विषाक्तपणाची (टॉक्‍सिसिटी) लक्षणे दिसतात. असे होणे कमतरतेपेक्षा अधिक घातक ठरू शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय सल्ला आवश्‍यकच
कोणतेही व्हिटॅमिन किंवा सप्लिमेंट घेण्याआधी  वैद्यकीय सल्ला अवश्‍य घ्या. 
शक्‍य असल्यास रक्ततपासणी करूनच निर्णय घ्या. 
आवश्‍यक घटक नैसर्गिक अन्नातून मिळतील याची खात्री करा.
आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती ही एक दिवसाची मेहनत नसून, ती रोजची प्रक्रिया आहे. 
नियमित सकस आहार, व्यायाम आणि चांगली जीवनशैली या बाबी सप्लिमेंट्‌स इतक्‍याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्व विचार करूनच व्हिटॅमिन आणि सप्लिमेंट घ्यावीत.

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek dhavan article about Excess of supplements

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: