
- अभय टिळक
‘आत्मबोध’ नावाचा आद्य शंकराचार्यांचा एक विलक्षण प्रकरणग्रंथ आहे. आकाराने तो दिसतो मोटकाच; परंतु आहे मात्र उदंड आशयगर्भ. आपल्या या प्रकरणग्रंथामध्ये आचार्यांनी अगदी सुरुवातीलाच एक मोठी गंमत करून ठेवलेली आहे.
‘आत्मबोध’ आपण कोणासाठी सिद्ध करत आहोत, याचा खुलासा आचार्य तिथे करतात. त्यांचे ते सगळेच शब्द मोठे मनोज्ञ आहेत. ज्यांनी कोणी तपाचरणाद्वारे आपले अंत:करण पापमुक्त बनवले असेल, ज्यांच्या मनामध्ये शांतीचे अधिष्ठान दृढ झालेले असेल, ज्यांच्या चित्तामध्ये आसक्तीचा अथवा अभिलाषेचा लवलेशही उरलेला नसेल,
मुक्तीची तीव्र प्रेरणा ज्यांच्या अंतर्विश्वात जागृत झालेली आहे अशा सगळ्यांसाठी ‘स्व’चे स्वरूप समजावून सांगणारा ‘आत्मबोध’ नावाचा हा प्रकरणग्रंथ मी रचला आहे, असे आचार्य तिथे सांगतात.
हे सगळे वाचले की कोणाही जिज्ञासू अभ्यासकाच्या मनावर दडपणच येईल आणि यावे. कारण, जोपर्यंत आपल्या ठायी आचार्यांना अपेक्षित असणारी सारी गुणसंपदा निर्माण होत नाही, तोवर हा प्रकरणग्रंथ वाचण्यास अथवा समजावून घेण्यास आपण पात्रच नाही, अशी एखाद्या जिज्ञासूची धारणा झाल्यास ते स्वाभाविकच ठरते. मग काय करायचे ?
प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये अगदी प्रारंभीच चार गोष्टी नमूद करण्याचा एक लेखनसंकेत अंगीकारला जात असे. त्याला ‘अनुबंध चतुष्टय’ असे म्हणतात. ग्रंथकाराने ज्या विषयाचे विवेचन करण्यासाठी ग्रंथनिर्मितीचा घाट घातलेला आहे तो विषय, त्या विषयाचा उहापोह स्वतंत्र ग्रंथरचनेद्वारे करण्याचे प्रयोजन, त्या ग्रंथाचा अधिकारी व ग्रंथगत प्रतिपादनाशी असलेला अनुबंध आणि ग्रंथाभ्यासाचे फलित अशा चार बाबींचा ‘अनुबंध चतुष्टय’ या संकल्पनेत आहेत.
‘आत्मबोधा’च्या सुरुवातीस, या परंपरेला अनुसरतच, आचार्यांनी ग्रंथाचा अधिकारी कोण गणावा, हे स्पष्ट केलेले आहे. ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाची सखोलता आणि सघनता पचनी पाडून घेण्याची क्षमता अथवा पात्रता ज्याने अभ्यासाने संपादन केलेली आहे, अशा जिज्ञासूंनीच ग्रंथाच्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी सिद्ध व्हावे, इतका साधा संकेत त्याच्या मुळाशी आहे.
आता, ग्रंथाचा अधिकारी होण्यासाठी जी गुणसंपदा ग्रंथकर्त्याला जिज्ञासू वाचकाच्या ठायी अपेक्षित आहे, ती जर त्याच्याठिकाणी नसेल तर मग वाचकाने तो ग्रंथ हातातच घ्यावयाचा नाही का, असा प्रश्न कोणालाही इथे पडावा. ग्रंथाचा अभ्यास केल्याखेरीज पात्रता अंगी बाणणार नाही आणि पात्रता नसेल तर ग्रंथाच्या वाचनाला हातच घालायचा नाही, हे कोडे कसे सुटावे ?
अगदी अशीच गंमत ज्ञानदेवांनीही विलक्षण खुबीने केलेली आहे ‘ज्ञानेश्वरी’च्या पहिल्याच अध्यायात. ‘‘अहो अर्जुनाचिये पांती । परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करू नि संतीं । अवधान द्यावें’’, अशी ज्ञानदेवांची एक मोठी अर्थगर्भ ओवी प्रारंभीच तिथे आहे.
अर्जुनाच्या पंगतीला बसण्याची ज्यांची पात्रता आहे, अथवा, ती योग्यता ज्यांनी कमावलेली आहे अशा संतवृत्तीच्या जिज्ञासूंनी मी काय सांगतो आहे, तिकडे पूर्ण लक्ष द्यावे, असे आर्जव ज्ञानदेव तिथे मांडतात. पाच पंडुपुत्रांपैकी कृष्णदेवाने गीताख्यान प्रगट केले ते एकट्या अर्जुनाच्या पुढ्यातच.
आप्तस्वकियांशी लढायच्या विचाराने पांडवांपैकी एकटा अर्जुनच विचलित झाला, कारण तो मुळातच ऋजू मनाचा होता, हा इथला प्रधान संकेत होय. ज्ञान आणि प्रत्यक्ष शिवशंभूंनाही परास्त करणारा पराक्रम यांच्या जोडीनेच अर्जुनाच्या अंत:करणाची ही विमल ऋजुताच त्याला गीताबोधाची अधिकारी बनवते, हे ज्ञानदेवांना इथे अधोरेखित करायचे आहे.
ज्ञानदेवांचा हा संकेत नीट समजावून घ्यायला हवा. अर्जुनाच्या पंगतीला बसण्याची योग्यता नसणाऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ वाचण्याचा अथवा ऐकण्याचा अधिकार नाही, असा विपरित अर्थ यांतून कोणीच काढू नये. किंबहुना, ‘ज्ञानदेवी’चे वाचन-पारायण केल्यानंतर तरी अर्जुनासारखे आपले मन ऋजू बनावे, हे अपेक्षित आहे ज्ञानदेवांना.
हा गीताबोध वाचून अथवा श्रवण करूनही मनाचा पोत बदलणार नसेल तर, ज्ञानदेव म्हणतात त्यांप्रमाणेे, ‘ऐसें हळुवारपण जरी येईल। तरीच हें उपेगा जाईल । एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकियाबहिरयाची’, अशी अवस्था ठेवलेलीच आहे ! पारायणासाठी ‘ज्ञानेश्वरी’ हाती धारण करताना ज्ञानदेवांचा हा सूक्ष्म सांगावादेखील ओंजळीत यावा, याची दक्षता घेतो का आपण ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.