चीनच्या ‘बलून’मागे दडलंय काय?

चीनने अमेरिकेच्या दिशेने सोडलेल्या दोन बलूनमुळे (फुगा) खळबळ माजली
two balloons released by China towards America
two balloons released by China towards Americasakal
Summary

चीनने अमेरिकेच्या दिशेने सोडलेल्या दोन बलूनमुळे (फुगा) खळबळ माजली

चीनने अमेरिकेच्या दिशेने सोडलेल्या दोन बलूनमुळे (फुगा) खळबळ माजली आहे. हेरगिरीच्या, गोपनीय माहिती मिळविण्याच्या उद्दिष्टासाठी कमी खर्चातील पर्यायांचा शोध चीन सरकार घेत असण्याची शक्यता दाट आहे; किंवा हेरगिरीसाठीच्या चीनच्या सध्याच्या सर्व यंत्रणांमध्ये एक भर घालण्यासाठी म्हणूनदेखील ‘अवकाशसमीप तंत्रज्ञान’ चीनला उपयुक्त वाटत असणार. तैवानचा पेच अधिकाधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे, याची चीनला चांगलीच कल्पना आहे.

चीनने अमेरिकेच्या दिशेने सोडलेल्या बलूनमुळे (फुगा) खळबळ माजली असून, हेरगिरीसाठीच हे करण्यात आल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲंटनी ब्लिंकेन यांचा द्विपक्षीय चर्चेसाठी आयोजित केलेला नियोजित चीनदौरा रद्द करण्यात आला.

सुरक्षा, तैवानचा प्रश्न, कोविड-१९ व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती आदी विषयांवर दोन्ही नेत्यांत चर्चा होणार होती. चीनने सोडलेले बलुन अमेरिकेने क्षेपणास्त्राच्या साहाय्याने नष्ट केले. ते समुद्रावर येण्याची अमेरिकेने वाट पाहिली, याचे कारण त्यातील सेन्सर नष्ट होऊ द्यायचे नव्हते. ते ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली जाईल. या कारवाईमुळे चीन संतप्त झाला आहे आणि ‘आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ’, असा इशाराही त्या देशाने दिला आहे.

हवामानाची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी सोडलेले हे विमान होते. काही कारणांनी ते भरकटले आणि अमेरिकी हवाई हद्दीत गेले, असे स्पष्टीकरण चीनने केले. परंतु हवामानविषयक माहिती गोळा करण्यासाठी इतर अनेक साधने उपलब्ध होती.

तरीही बलून का सोडले, हा प्रश्नच आहे. अमेरिकी खंडात जिथे बलुन आढळून आले ते ठिकाण मोंटाना आणि मिसौरी येथे आहे. बीजिंग ते मोंटाना हे अंतर नऊ हजार ३०५ किलोमीटर,तर बीजिंग ते मिसौरी हे अंतर १० हजार ८८४ किमी आहे.

या दोन्ही ठिकाणी अमेरिकेचे महत्त्वाचे संरक्षणविषयक तळ आहेत. मोंटाना येथे रडार यंत्रणा व हवाई तळ, तर मिसौरी येथे अमेरिकेचे प्रशिक्षण केंद्र व अमेरिकी हवाई दलाच्या बॉम्बफेकी विमानांचा विभाग आहे.

व्यावसायिक हवाई वाहतूक समुद्रसपाटीपासून ज्या उंचीवरून होते, त्यापेक्षा अधिक उंचीवरून हे बलून उडत होते. या बलुनमुळे कोणाच्याही जीवित वा मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नसल्याची खातरजमा अमेरिकेने केली होती. बलूनच्या साहाय्याने हवामानाचा अंदाज घेणे ही गोष्ट नवीन नाही. पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे.

अगदी आजही हवामानविषयक बलून दररोज वेधशाळांकडून सोडली जातात. त्यावर अत्याधुनिक सेन्सर बसवलेली असतात. समुद्रसपाटीपासून विशिष्ट अंतरावरील वाऱ्याची दिशा, वेग व तापमान यांची माहिती मिळविली जाते. चक्रीवादळाची परिस्थिती उद्भवल्यास या वादळाची दिशा आणि जोर यांचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक असते.

वादळाच्या केंद्रस्थानी जाऊन बलूनमधून सोडण्यात आलेली सेन्सर्स हा सगळा माग घेतात. बलून दोन प्रकारचे असातात. जमिनीला बांधलेले बलुन हे प्रामुख्याने जाहिराती वगैरेंसाठी सोडले जातात.दुसरे न बांधलेले. अर्थातच चीनने सोडलेले बलुन हे न बांधलेले बलून होते. ते अमेरिकी हवाई हद्दीच्या क्षेत्रात स्थिरावतरणाच्या वर (पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२ ते ५० किलोमीटर उंचीवर) सोडण्यात आले ते नेमके कशासाठी, याचे तर्कसंगत स्पष्टीकरण चीनने दिलेले नाही.

व्यावसायिक विमान वाहतुकीतील विमाने पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा ते बारा किलोमीटर एवढ्या उंचीवरून उडतात. लष्करी कारणांसाठी उडणारी विमाने त्यापेक्षा अधिक उंचीवरून जातात. पण हे आवश्यकतेनुसार ठरवले जाते.

समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवरून उडणारी बलुन वाऱ्याचा वेग आणि दिशा यानुसार दोनशे ते अडीचशे किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत भरकटण्याची शक्यता असते. पण चिनी बलुन जिथपर्यंत गेले. ते अंतर हजारो किलोमीटरचे आहे.

प्रश्न निर्माण होतो तो त्यामुळेच. जसजसे बलून उंचीवर जाते, तसतसा हवेचा दाब कमी होत जातो आणि बलून प्रसरण पावते. हे सगळे लक्षात घेता या प्रकरणात चीनची योजना पूर्णपणे भरकटली. अशीही शक्यता आहे, की चीनला अमेरिकी सिद्धतेचा अंदाज घ्यायचा असेल.

परंतु एकूणच जे काही घडले त्यामुळे आजच्या काळातील अवकाशसमीप तंत्रज्ञानाचा ( निअर स्पेस टेक्नॉलॉजी) मुद्दा ऐऱणीवर आला आहे. ज्याची एरवी फारशी चर्चा होत नाही, असे विषय निदान या निमित्ताने चर्चेत आणि अभ्यासात येणे यालाही एक महत्त्व आहे.

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून सामरिक व्यूहरचनेच्या क्षेत्रात अवकाशसमीप तंत्रज्ञानाला खूप महत्त्व प्राप्त झाले. २००३च्या इराक युद्धात अमेरिकेने या तंत्रज्ञानाचे प्रयोग केले, असे मानले जाते. अवकाशसमीप तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन सुरू आहे.

या तंत्रज्ञानाची खर्चात बचत करण्याची शक्यता मोठी आहे. उपग्रहाच्या माध्यमातून जे काही लाभ होतात, ते करून देण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता अफाट आहे. सुरक्षेच्या संदर्भात हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा विचार विविध देशांनी सुरू केला आणि अमेरिकेचे सहकार्य त्यासाठी मिळवले.

अर्थात सुरक्षाविषयक गरजांसाठीच नव्हे तर विविध नागरी सुविधांसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. समुद्रसपाटीपासूनची उंची २०पासून २०० ते ३०० किमी या अंतरापर्यंत असेल तर ‘अवकाशसमीप तंत्रज्ञान’ असे म्हटले जाते.

त्यामुळे या पल्ल्यादरम्यान सोडलेली बलून ही सुरक्षित मानली जातात. सर्वसाधारणपणे वीस किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरून कोणतेही विमान उडत नाही. अगदी कमी भूकक्षेतील उपग्रह म्हटले तरी तो समुद्रसपाटीपासून तीनशे ते चारशे किमी अंतरावर असतो.

त्यामुळे वीस ते तीनशे या दरम्यानचे अंतर बलुन सोडण्यासाठी सुरक्षित असते. मुक्तपणे उडणारे किंवा निर्धारित आणि बांधलेले बलून या कक्षेत सोडणे सुरक्षित मानले जाते. याच पल्ल्यात छोटी आकाशयाने उडतात. स्ट्रॅटेलाईटची संकल्पनाही फार उफयोगी पडते.

अवकाशात स्थिर ठेवला जाणारा उपग्रह दूरसंचारासाठीचे केंद्र म्हणून उपयोगात आणला जाते. जगातील अनेक देश अवकाशसमीप तंत्रज्ञानाचा उपयोग हवामानाची माहिती, हेरगिरी किंवा दूरसंचाराचे साधन या विविध कारणांसाठी करीत आहेत.

कमी भूकक्षेत फिरणारे उपग्रह जे लाभ मिळवून देतात अवकाशसमीप तंत्रज्ञानातूनही मिळू शकतात. अवकाशात उपपग्रह सोडण्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात त्याचे विविध लाभ मिळत असल्याने बचतही मोठी होते. खर्चाचा नेमका अंदाजच करायचा तर असे सांगता येईल की, उपग्रह सोडण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या २५ ते तीस पट कमी खर्च या तंत्रज्ञानात येतो. अवकाशसमीप तंत्रज्ञानाचा वापर करून एकाऐवजी दोन याने सोडली तरीही उपग्रह तंत्रज्ञानाच्या उपयोजनापेक्षा कमी गुंतवणूक करावी लागते.

लष्करी उद्दिष्टांचा विचार केला तरी अशा प्रकारचे ‘कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म’ मागणीनुसार उभे केले जाऊ शकतात. यात साधनसंपत्तीच्या नुकसानीचाही फार मोठा प्रश्न तयार होत नाही. अवकाशसमीप तंत्रज्ञानात चीनने केलेली गुंतवणूक हा भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय असून भारताने या बाबतीत चिकित्सक दृष्टिकोनातून त्याचे विश्लेषण करण्याची गरज आहे. चीनमधील `क्युआंग ची’ या कंपनीने २४ किमीपर्यंत जाणाऱ्या बलूनबरोबर उडण्याचा अनुभव घेण्याचा प्रकल्प हाती घेतला असून त्यात १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याची बातमी २०१६मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही अर्थातच एक व्यापारी योजना होती.

चीनने हे बलून का सोडले, याची दोन कारणे संभवतात. कोविड-१९ मुळे जे काही परिणाम झाले, त्यात आर्थिक फटका हा परिणाम मोठा होता. अशा परिस्थितीत चीनला आपल्या लष्करी खर्चाचा अधिक काटेकोर विचार करणे आवश्यक वाटले असणार. त्यामुळेच हेरगिरीच्या, गोपनीय माहिती मिळविण्याच्या उद्दिष्टासाठी कमी खर्चातील पर्यायांचा शोध चीन सरकार घेत असण्याची शक्यता दाट आहे. दुसरे कारण म्हणजे उपग्रह चोवीस तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. ती गॅप भरून काढण्यासाठी हे पर्यायी तंत्रज्ञान उपयोगी पडू शकते, असाही विचार चीनने केला असू शकतो. एकूणच तैवानचा पेच अधिकाधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे, याची चीनला पूर्ण जाणीव आहे. तो विचार केला तर चीनच्या या खटपटीमागचा विचार समजून घेता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com