राज्याराज्यांत- केरळ  : कारभाराची रड, तरीही मार्क्‍सवादी वरचढ

अजयकुमार
Tuesday, 19 January 2021

राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाला जे यश मिळाले, त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला असल्यास नवल नाही. अर्थातच निवडणुकीवर डोळा ठेवून डाव्या आघाडीचे सरकार निर्णय घेत आहे.

राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाला जे यश मिळाले, त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला असल्यास नवल नाही. अर्थातच निवडणुकीवर डोळा ठेवून डाव्या आघाडीचे सरकार निर्णय घेत आहे. लवकरच सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर नसेल, असे राज्याचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी तसे आधीच सांगून टाकले आहे. पेन्शन आणि अन्य काही सवलतींची खैरात करून ते राज्यातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केरळमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीचा घटक आहे. परंतु आता त्या पक्षात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीत जायचे का, याविषयी खल सुरू आहे. मात्र या प्रस्तावावर पक्षात एकमत नाही.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
पिनराई विजयन् यांचे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या छायेतील सरकार आहे. सत्ताधारी गोटांतील अनेक बडे नेते गैरव्यवहारांमध्ये गुंतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचाच हात असल्याचा गंभीर आरोपही झाला आहे. सभापती श्रीमाकृष्णन यांचेही नाव या प्रकरणात घेतले जात आहे. खुद्द मुख्यमंत्री विजयन् यांच्यावरील लवलिन भ्रष्टाचाराचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ‘परकी चलन नियमन कायद्या’च्या (फेरा) उल्लंघन प्रकरणी उद्योगमंत्री ई. पी. जयराजन आणि उच्च शिक्षणमंत्री के. टी. जलील यांची सीमाशुल्क विभागाने चौकशी केली आहे. या दोन्ही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर बेनामी व्यवहारांचा संशय आहे. त्यांच्याशी संबंधित ‘ओरालुंकल सोसायटी’ या कंपनीला बहुतेक सरकारी कंत्राटे देण्यात आली आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जनता नाराज, तरीही...
भ्रष्टाचाराच्या या आरोपांमुळे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष बचावात्मक पवित्र्यात गेला आहे. माकपचे चिटणीस आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य बिनेश कोडियेरी यांचा मुलगा अंमली पदार्थांच्या प्रकरणात बंगळूरच्या तुरुंगात आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेणाऱ्या माकपचा दांभिकपणा या सर्व घटनांमुळे उघड होत आहे. जमीन गैरव्यवहाराची प्रकरणे लक्षात घेता या गैरव्यवहारांची व्याप्ती हजारो कोटी रुपयांची आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण राज्यात आहे. अनेक कामगार संघटना या पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे कोणतीही सरकारी पदांवरील नेमणूक त्यांच्यापैकीच लोकांना मिळते. 

विजयन् यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महापूर, ‘निपाह’ हा कोरोनासारखा संसर्गजन्य रोग आणि आता कोरोना अशा अनेक आपत्ती एका पाठोपाठ एक आल्या. बर्ड फ्ल्यूनेही आता धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे आधीच सरकारच्या कारभारावर नाराज असलेली सर्वसामान्य जनता आता आणखीनच संतप्त झाल्याचे जाणवत आहे. पण असे असूनही विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी होण्याचा विश्‍वास मुख्यमंत्री विजयन् व्यक्त करीत आहेत. भाजपच्या विरोधात मुस्लिम व ख्रिश्‍चन मतांचे एकवटीकरण झाल्याने स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत माकप तरून गेली. आतादेखील त्यांची भिस्त या मतांवरच असल्याचे दिसते. विशेषतः मुस्लिम मतपेढीचा विचार केला जातो आहे. विजयन्‌ यांच्या आत्मविश्‍वासाचे दुसरे कारण म्हणजे हतबल विरोधक काँग्रेस पक्ष. मुळापल्ली रामचंदन्‌ हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी संवाद, पक्षाचा विस्तार या सर्वच आघाड्यांवर त्यांची निष्क्रियता दिसून आली आहे. अंतर्गत गटबाजीने त्या पक्षाला ग्रासलेले आहे. अशी स्थिती असल्याने राज्य कारभारात ठळक अपयश येऊनही ध्रुवीकरण आपल्या पथ्यावर कसे पडेल आणि अल्पसंख्य मते आपल्याच पारड्यात कशी पडतील, याचा विचार करून मुख्यमंत्री विजयन् सत्तेवर कायम राहण्याच्या धडपडीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajaykumar Writes about markswadi communist party politics