अंतराळ वेधाच्या अनंत संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajey Lele write Infinite opportunity in Space research war in space

एकविसावे शतक हे अंतराळ संशोधन आणि त्यातील प्रगतीचे राहणार आहे. परग्रहांचा केवळ वेध घेणेच नव्हे तर चंद्र, मंगळ यांच्यावर वस्तीस्थाने निर्माण करणे, परग्रहावर खनिजांच्या खाणी करून ते पृथ्वीवर आणणे यांच्यापासून ते अगदी अंतराळात युद्धाचे प्रसंग असे काहीही घडू शकते.

अंतराळ वेधाच्या अनंत संधी

एकविसावे शतक हे अंतराळ संशोधन आणि त्यातील प्रगतीचे राहणार आहे. परग्रहांचा केवळ वेध घेणेच नव्हे तर चंद्र, मंगळ यांच्यावर वस्तीस्थाने निर्माण करणे, परग्रहावर खनिजांच्या खाणी करून ते पृथ्वीवर आणणे यांच्यापासून ते अगदी अंतराळात युद्धाचे प्रसंग असे काहीही घडू शकते.

अंतराळ संशोधन ही अतिशय वेगाने विकसीत होत असलेली विद्याशाखा आहे. शेकडो शतकांपासून माणसाने रात्रभर आकाशाचे निरीक्षण करत, ग्रह, ताऱ्यांच्या रचनेचा वेध घेत अवकाशाचे आकलन करून घेतले आहे. माणसाने अवकाश विषयक असलेल्या ज्ञानाचा वापर करून रात्रीच्या वेळी जहाजांतून प्रवास करण्याचे कसब अवगत केले आहे. खगोलशास्त्र आणि उपग्रह प्रक्षेपण (रॉकेट) विज्ञान यांचा विकास होत गेला. आपण त्यात भरारी घेतली. आता तर आपण ग्रह, तारे यांचे वेध घेण्यासाठी मोहिमा देखील सुरू केल्या आहेत.

अलीकडेच, माणसाची अंतराळाचा वेध घेण्याची लालसा १९५७ मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघराज्याने (आजचे रशिया) स्पुतनिक नावाचा उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर अधिक गतिमान झाली. त्या पाठोपाठच, १२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत महासंघाचे अंतराळवीर युरी गागारीन हे अवकाशात जाणारे पहिले मानव ठरले. त्या प्रगतीवर मानाचा तुरा रोवला गेला तो १९६९ मध्ये; अमेरिकेच्या अंतराळवीरांच्या पथकाने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर. आजच्या घडीला अंतराळ क्षेत्रात आपण मानवाने गगनभरारी घेतलेली आहे. आज अंतराळातील अनेक बाबींवर आपले पृथ्वीवरचे जीवनमान विविध बाबतीत अवलंबून आहे. आपण अंतराळात सोडलेल्या उपग्रहांवरच आपले आजचे चलनवलन प्रामुख्याने विसंबून आहे. अंतराळ क्षेत्रातील विकास आणि संशोधन या आघाड्यांवर आपण घेतलेल्या झेपेमुळेच पृथ्वीतलावरील जीवनमान उंचावण्यास, ते अधिक सुकर करण्यास आपल्याला मदत झालेली आहे.

उपग्रहांवर वस्तीचे स्वप्न

असं म्हणता येईल की, नील आर्मस्ट्रॉंग या अमेरिकी अंतराळवीराने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले आणि इतर ग्रहांवर मानवी वस्ती करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. गेल्या सहा-सात दशकात अंतराळ विषयक वाटचालीत प्रामुख्याने भर दिला गेला तो दूरसंचार, दळणवळण, नेव्हिगेशन, हवामान बदल, हवामान विषयक संशोधन यावरच. गेली सुमारे दोन दशके तर सातत्याने मानवाचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) वावर आणि वास्तव्य राहिले आहे. यात रशिया, अमेरिका, चीन यांचा सहभाग मोठा राहिला आहे. त्याच्याच जोडीला इतर उपग्रहांकरता यंत्रमानवाच्या सहभागाच्या मोहिमा राबविल्या गेल्या आहेत. गेल्या दशकभरात अंतराळ क्षेत्रात खूप वेगवान संशोधन, मोहिमा आणि घडामोडी घडल्या आहेत. स्पेस-एक्स या खासगी अंतराळ यानासह इतरांचा अंतराळातील वावर वाढलेला दिसतो आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी, २००८ मध्ये ‘अंतराळ संशोधनातील भवितव्य आणि वाटचाल’ या विषयी अत्यंत विचारप्रवण आणि स्पष्टता देणारा निबंध लिहिलेला होता. त्यांनी पृथ्वी-चंद्र-मंगळ यांच्या विकसीत अर्थकारणावर भाष्य केलेले होते. आज व्यापकपणे अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपीय महासंघ (ईयू) डॉ. कलाम यांनी सांगितलेल्या मार्गाने जात आहेत. डॉ. कलाम यांना असं वाटत होतं की, एकविसाव्या शतकात अंतराळ उद्योगातील क्रांतीद्वारे माणूस अंतराळात जोरदार मुसंडी मारेल. आज जगात अंतराळ संशोधन, प्रणाली विकसन, त्यासाठीचे तंत्रज्ञान आणि आराखडा आणि त्यांच्या अनुषंगाने विस्तारीत होणारे अर्थकारण पाहता, त्यांनी व्यक्त केलेला अंदाज सत्यात उतरत असताना दिसत आहे. चीन आणि रशिया यांचा चंद्र संशोधन स्थानक कार्यक्रम आणि अमेरिकेचा आर्तेमीज कार्यक्रम यांच्यातून त्याचे प्रत्यंतर येत आहे. चंद्र आणि मंगळ यांच्यावर सन २०४०-२०५० दरम्यान मानवी वसाहतींसाठी हे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अशी आशा धरता येईल की, आगामी काही दशके माणसाकडून इतर उपग्रहांवर वस्तीस्थाने करण्यावरच भर दिला जाईल.

अंतराळात स्पर्धा

राजकीय, लष्करी, सामाजिक आणि आर्थिक अशा अनेकविध बाबतीत आगामी काही दशके अंतराळ हीच पृष्ठभूमी राहू शकते. अंतराळ आधारित इंटरनेट हे वेगाने वास्तववादी ठरू शकेल, नजिकच्या काळात त्याबाबत झपाट्याने संशोधन होऊ शकते. विविध सरकारे आणि खासगी उद्योग यांच्या सहकार्यातून, समन्वयातून मंगळ आणि चंद्र यांच्यावर वसाहती करण्यासाठी आवश्यक संशोधन आणि अनुषंगिक बाबी यांच्यावर आगामी काही दशके भर राहू शकतो. अमेरिका आणि चीन यांच्यात माणसाला चंद्रावर नेण्यासाठी स्पर्धाच लागलेली आहे. पहिल्यांदा कोण पोहोचणार हे काळच सांगेल. तथापि, चीन याबाबतीत अतिशय शिस्तबद्धपणे प्रगती साधत असून, चीन या स्पर्धेत अमेरिकेला मागे टाकू शकतो, याचीच शक्यता अधिक दिसत आहे. अंतराळाला गवसणी घालणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ही महत्त्वाची बाब आहे. तथापि, सध्याच्या युक्रेन युद्धाने त्याला खीळ बसलेली आहे. चीन आपल्या अंतराळ कार्यक्रमात प्रगती साधत विस्तार करेल, असे सध्या तरी दिसते. भारत स्वतःचे अंतराळ स्थानक करू शकेल. तसेच भविष्यात शुक्र मोहीम राबवू शकतो.

संयुक्त राष्ट्रांकडून नियमन हवे

पृथ्वीपलीकडील जीवाच्या अस्तित्वाला समजून, जाणून घेण्यासाठी माणूस प्रदीर्घ काळ प्रयत्न करत आला आहे. ही जिज्ञासा अशीच कायम राहू शकते. माणसाला इतर उपग्रहांवर असलेल्या धातूच्या खनिजांच्या खाणींचा शोध घेऊन, ते खनिज भूतलावर आणायचे आहे. अंतराळातील सौरऊर्जा हादेखील आगामी काळात जगाच्या दृष्टीने विकसीत करण्याचे क्षेत्र राहील. आगामी काळात भूतलावरील जीवाश्म इंधन संपुष्टात येणार आहे, हे वास्तव आहे. अशा काळात अंतराळ सौरऊर्जा हाच आशेचा किरण राहील. विविध आकाशगंगांचा वेध घेण्यासाठी अत्याधुनिक, शक्तीशाली दुर्बिणी देखील अंतराळात सोडल्या जातील.

दु्र्दैवाने, अंतराळ युद्ध हेदेखील वेगाने येणारे वास्तव असेल. स्वाभाविकतः अंतराळ तंत्रज्ञान हे दुहेरी वापराचे साधन आहे. अंतराळ कचरा निर्मूलन तंत्रज्ञान, अंतराळ पर्यटन, स्पेस सिच्युएशनल अवेरनेस (एसएसए) तंत्रज्ञान, कक्षेत असतानाच उपग्रहांची देखभाल, दुरूस्ती, उपग्रहांची व्यापक साखळी अशा अनेक बाबींवर संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर कठोर नियमन आणि व्यवस्थापन गरजेचे आहे. अंतराळाचा वेध घेण्यासाठी आजच्या घडीला खूप मोठमोठ्या योजना तयार केलेल्या आहेत. त्यांच्या कार्यवाहीत मोठी प्रगती होत असून, आगामी ३०-५० वर्षांत त्यांनी मोठी भरारी घेतलेली असेल. माणसाने ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि उपग्रहांवर वसाहती करण्याचे स्वप्न बघायला हरकत नाही.

(लेखक संरक्षण विश्लेषक आहेत.)

Web Title: Ajey Lele Write Infinite Opportunity In Space Research War In Space

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top