दांडगाईकडून नरमाईकडे...

अजेय लेले
शुक्रवार, 4 मे 2018

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच भेट घेतली. अविवेकी वर्तणुकीची ‘सीमा’ ओलांडणाऱ्या किम यांच्या या कृतीने सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्तरेचे हे ऐतिहासिक दक्षिणायन कोरियन द्वीपकल्पाला युद्धग्रस्ततेकडून शांततेकडे नेणारे ठरेल काय, हा खरा प्रश्‍न आहे.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच भेट घेतली. अविवेकी वर्तणुकीची ‘सीमा’ ओलांडणाऱ्या किम यांच्या या कृतीने सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्तरेचे हे ऐतिहासिक दक्षिणायन कोरियन द्वीपकल्पाला युद्धग्रस्ततेकडून शांततेकडे नेणारे ठरेल काय, हा खरा प्रश्‍न आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. विशेषत: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या अतिरेकी अण्वस्त्रप्रेमामुळे दोन्ही देश कधीही युद्धाच्या खाईत ओढले जाण्याची भीती होती. एकंदरीतच, या टोकाच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर किम यांनी दोन्ही देशांदरम्यानची सीमा ओलांडत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच गळाभेट घेतली. ही शांतताभेट संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच कोरियन द्वीपकल्प अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते. अशा परिस्थितीत द्वीपकल्पात कायमस्वरूपी शांतता नांदण्यासाठी खरेखुरे प्रयत्न केले जातील, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. त्यातही, उत्तर कोरियाकडून तर ही अपेक्षा नव्हतीच. मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे स्वप्न सत्यात उतरले. जागतिक राजकारणात अविचारी, उद्धट, हेकेखोर अशी प्रतिमा असलेल्या किम यांच्या या कृतीने संबंध जग आश्‍चर्यचकित झाले. द्वीपकल्पात युद्ध न होण्यासाठी त्यांनी मून जे इन यांच्या समवेत संयुक्त जाहीरनामाही प्रसिद्ध केला. त्याचबरोबर, उभयतांनी द्वीपकल्पात आण्विक निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा निश्‍चयही केला आहे.

दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सीमेवरील गावांना विभागणाऱ्या लष्करी सीमारेषेवर केलेल्या ऐतिहासिक हस्तांदोलनामुळे तणाव निवळला. त्यानंतर झालेल्या चर्चेच्या फेऱ्या पाहता शत्रुत्वाला मूठमाती देण्याचा उत्तर कोरियाचा हेतू प्रामाणिक वाटतो. भूतकाळाच्या कटू स्मृती विसरत नव्याने सुरवात करण्याची त्या देशाची इच्छा आहे. दोन्ही देशांचे नागरिक समान इतिहास, संस्कृती आणि रक्ताच्या धाग्याने एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच त्यांचे परस्परांशी दृढ संबंध असल्याचे दिसते. दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या भेटीचे यश व्यावहारिक शहाणपण, दृष्टिकोनातील खुलेपणा आणि एकमेकांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्याच्या इच्छेत दडले आहे.  अवघ्या काही महिन्यांमध्ये या भेटीचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन कौतुकास पात्र ठरतात. उत्तर कोरियाची आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे हे ध्यानात येताच, त्यांनी ताबडतोब योग्य पाऊल उचलले. खरेतर, इन यांनी उत्तर कोरियाकडे नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला होता. उत्तर कोरियाबरोबरच्या तणावपूर्ण घडामोडींतही ते आपल्या या निर्णयावर ठाम राहिले.  

काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान कुठल्याही क्षणी युद्धाचा वणवा भडकेल, अशी स्थिती होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आगीत तेल ओतत युद्धखोरीची भाषा सुरू केली होती. पण इन यांनी आपल्या परवानगीशिवाय युद्ध सुरू होणार नसल्याचे जाहीर करत युद्धाचा पेटू पाहणारा वणवा विझवला. आपल्या मतावर ठाम राहण्याचा दुराग्रह बाळगणारे ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे या जागतिक नेत्यांच्या मांदियाळीत इन यांचे वेगळेपण म्हणूनच उठून दिसते. जागतिक राजकारणात त्यांचा ‘रिअल स्टेट्‌समन’ म्हणून उदय झाला आहे.  इन यांचे कितीही कौतुक केले तरी किम जोंग उन यांच्या साक्षात्कार झाल्यासारख्या भूमिकेने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. संभाव्य अणुयुद्धाच्या धक्‍क्‍यापेक्षा हा धक्का कित्येकपट सुखद म्हणावा लागेल. टम्प यांच्याकडून ‘लिटल रॉकेट मॅन’ असा उल्लेख होणारे किम यांना संपूर्ण जग वेडा, आक्रमक आणि जुलमी सत्ताधीश म्हणून ओळखते. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीशी त्यांचा कसलाच संबंध नाही. एखाद्या देशाचा प्रमुख म्हणून त्यांनी चीनचा एकमेव दौरा केला आहे. मात्र दक्षिण कोरियाच्या दौऱ्यातील विविध उपक्रमांत त्यांचा वावर सहज होता. दक्षिण कोरियाच्या ‘पीस हाउस’मधील अतिथी पुस्तिकेत उत्तर कोरियाचा हा सर्वोच्च नेता लिहितो...
‘शांततेच्या युगाच्या आरंभातून नव्या इतिहासाला आता सुरवात झाली आहे.’  त्यांनी इन यांना उत्तर कोरियाच्या भेटीचे आमंत्रणही दिले. येत्या काही आठवड्यांत ट्रम्प यांच्याबरोबर होणाऱ्या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली. उत्तर व दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांच्या या यशस्वी भेटीचा जगावर कितपत प्रभाव पडेल, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. लहरी, तऱ्हेवाईक उत्तर कोरियाला विश्‍वासार्ह मानावे काय, असाही प्रश्‍न आहे. भूतकाळात डोकावले, तर हा देश एखाद्या तेल लावलेल्या पैलवानासारखा, प्रतिस्पर्ध्याच्या हातातून निसटत असल्याचे निदर्शनास येते. यापूर्वी, २००० आणि २००७ मध्ये दोन्ही देशांचे मनोमीलन घडविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. उत्तर कोरियाच्या नेतृत्वाची आश्‍वासनांना हरताळ फासण्याची वृत्तीही जुनी आहे. या वेळी, उत्तर कोरियाची भूमिका वेगळी असेल काय? जगालाही समेटाची ही संधी स्वीकारण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. यापूर्वीच्या प्रसंगात उत्तर कोरियाचे नेतृत्व वेगळे होते. त्या तुलनेत किम जोंग उन यांची आंतरराष्ट्रीय सहकार्याची भूमिका अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाही. अर्थात, ते वास्तववादी भूमिका घेतील, हीच अपेक्षा. आपले कुठलेही अविचारी वर्तन उर्वरित जगाकडून सहन केले जाणार नाही, हे किम यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते या वेळी तरी अपेक्षाभंग करणार नाहीत, असे वाटते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आपल्याप्रमाणेच तऱ्हेवाईक असल्याचेही त्यांनी ओळखले असावे. या सर्व पार्श्‍वभूमीवर त्यांच्या अण्वस्त्रसामर्थ्याला काही मर्यादा पडतात. उत्तर कोरियावरचे कठोर निर्बंध आणि लोकप्रियतेला लागलेली उतरती कळा, यामुळेच त्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला असावा.

किम यांचा दक्षिण कोरिया दौरा ही तर सुरवात आहे. ट्रम्प यांच्याबरोबरच्या आगामी भेटीत त्यांची खरी कसोटी लागेल. एकीकडे संपूर्ण आण्विक निःशस्त्रीकरणातून कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याची गरज असली, तरी दुसरीकडे त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग वेगळा आहे. उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरणाची नेमकी प्रक्रिया पुरेशी स्पष्ट करायला हवी. या संदर्भात उत्तर कोरियाची सुरवातीची पावले आशेला खतपाणी घालणारी आहेत. या देशाने आपले आण्विक चाचणीचे ठिकाण नष्ट करण्याचे आश्‍वासन दिले असून, अमेरिकेसह इतर देशांनाही निरीक्षक पाठवून या घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.  ट्रम्प आणि किम यांची प्रस्तावित भेट लवकरच सिंगापूर किंवा मंगोलियात होणे, अपेक्षित आहे. या भेटीची कार्यक्रमपत्रिका, तसेच संभाव्य फलनिष्पत्ती ठरविण्यासाठी दोन्ही बाजूंना खूप पूर्वतयारी करावी लागेल. त्याचबरोबर या संदर्भातील घडामोडींबाबत दक्षिण कोरिया, चीन, रशिया आणि जपान या देशांनाही त्यांनी कल्पना द्यायला हवी. अंतिमत: इतिहासाने ट्रम्प आणि किम यांना नवे, सकारात्मक वळण घेण्याची संधी दिली आहे. कोरियन द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता या दोन्ही नेत्यांच्याच खांद्यावर असेल.
(अनुवाद ः मयूर जितकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajey lele write korea article in editorial