भारताचा बिनचूक लक्ष्यभेद

ajey lele
ajey lele

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, भारताने घाईघाईत कोणतीही कृती न करता, शिस्तबद्ध नियोजन करीत "जैशे महंमद'च्या तळावर भल्या पहाटेच हल्ला चढविला. या हल्ल्यातून भारताने आपली ताकद दाखविली.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेच्या तळावर मोठा हल्ला चढवला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) च्या पथकावर "जैशे महंमद'ने 14 फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. खरंतर, जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये काहीच नवीन नाही. दहशतवादी व जवानांमध्ये नेहमीच चकमकी सुरू असतात. यात आपले शूर जवान दहशतवाद्यांना कंठस्नान घालतात, तसेच जवानांनाही वीरमरण पत्करावे लागते. पुलवामाचा हल्ला मात्र या नेहमीच्या हल्ल्यापेक्षा वेगळा आणि तीव्र होता. गेल्या कित्येक वर्षांत एकाच हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जवान हुतात्मा होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे साहजिकच पाकिस्तान व दहशतवादी संघटनांबद्दल भारताच्या कानाकोपऱ्यात संतापाची लाट पसरली होती. आता खरंच बस झाले, या दहशतवादी हल्ल्याला भारताने अजिबात वेळ न दवडता तत्काळ प्रत्युत्तर दिलेच पाहिजे, अशी लोकभावना सर्वत्र दिसून येत होती. त्यामुळेच, पाकिस्तानला योग्य धडा शिकविण्यासाठी अशा प्रकारची धडक कारवाई खरंतर आवश्‍यक होती. पुलवामातील भीषण हल्ल्यानंतरही पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपल्या भूमीवर सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानविरुद्ध भारतीय नागरिकांमध्ये कमालीची चीड होतीच. अनेक टीव्ही वाहिन्यांनी वातानुकूलित कार्यालयांतून वस्तुस्थिती माहीत करून न घेता तर्कहीन वक्तव्यांतून खतपाणी घातले. सोशल मीडियानेही या वाहिन्यांच्या सुरात सूर मिसळत युद्धाचे वातावरण तापवण्यास हातभारच लावला. एकीकडे अशा प्रकारे वातावरण तापवले जात असताना दुसरीकडे धोरणकर्ते मात्र वेगळ्याच प्रकारचे नियोजन करीत होते. त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांविरुद्धची संतप्त लोकभावना, प्रसारमाध्यमे, तसेच सोशल मीडियाचे कसलेही दडपण घेतले नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या दडपणाला बळी पडून घाईघाईत फारसे नियोजन न करता चुकीचे पाऊल उचलण्याचे टाळले. त्याऐवजी "थांबा आणि वाट पाहा' हे धोरण स्वीकारले. सर्वप्रथम आपले नेमके लक्ष्य ठरविण्यासाठी गुप्तचर संस्थांची मदत घेण्यात आली. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व्यापक लक्ष्य ठेवले नाही, तर मर्यादित स्वरूपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. त्यासाठी, आवश्‍यक ती पूर्वतयारीही केली. हल्ल्यासाठी अचूक वेळही ठरवली. हा हल्ला शत्रूचे जास्तीत जास्त आणि आपले कमीत कमी नुकसान करणारा व्हावा, हाच हेतू या सर्वांमागे होता. त्यानंतर, अर्थातच सर्वशक्तीनिशी प्रत्यक्ष हल्ला चढविण्यात आला. खरंतर पुलवामा हल्ला भारताच्या संयमाची परीक्षा घेणाराच ठरला. मात्र, हल्ल्यानंतरही भारताने 11 दिवस संयम ठेवला. त्यानंतर, 12 व्या दिवशी मात्र भारतीय हवाई दलाने "जैशे महंमद'ला (पाकिस्तानलाही ) सणसणीत प्रत्युत्तर दिले.
भारताच्या या कारवाईचे विश्‍लेषण महत्त्वाचेच. मात्र, ते भावनिकरीत्या न करता वास्तववादी दृष्टिकोनातून करायला हवे. हल्ल्यानंतर परराष्ट्र सचिवांनी अधिकृतरीत्या जारी केलेले पहिले निवेदन भारताची या हल्ल्यामागील भूमिका दर्शविते. त्यांनी हा हल्ला म्हणजे बिगरलष्करी प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे स्पष्टपणे सांगितले. खरंतर, आपल्या देशाचा परिस्थितीला सामोरे जाण्याचा व्यावहारिक दृष्टिकोनच यातून प्रतिबिंबित होतो. "जैशे महंमद'च्या बालाकोट येथील तळालाच विशेषत्वाने या हल्ल्यातून लक्ष्य करण्यात आले, हे या हल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय. "जैशे महंमद'चा हा तळ घनदाट जंगलात असून, नागरी वस्तीपासून दूर आहे. नागरी प्राणहानी टाळण्यासाठी या तळाला लक्ष्य करण्यात आले. "जैशे महंमद'चा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी हा तळ चालवतो. "जैशे महंमद'चे दहशतवादी भारताविरुद्ध आणखी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. त्यामुळे भारतासाठी आणखी वेळ न दवडता या दहशतवादी संघटनेला तत्काळ लक्ष्य करणे आवश्‍यकच होते.

गेल्या 12 दिवसांत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही अचूक पावले उचलली. पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल आपल्याला लष्करी कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे पटवून देण्यात भारत यशस्वी ठरला. एवढेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत मोठ्या प्रतिहल्ल्याचे नियोजन करीत असल्याचे संकेतही दिले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणासांनी पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. त्याचप्रमाणे, या हल्ल्यामागील दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आवाहनही केले. अंतिमत: भारताने अचूक हल्ला करीत पुलवामातील हुतात्मा जवानांना न्याय मिळवून दिलाच. खरंतर भारताने जे काही केले, त्याची गरज होतीच. तुमच्या देशात घुसून धडक कारवाईची क्षमता असल्याचेच पाकिस्तानला भारताने दाखविले. गेल्या काही दशकांपासून पाकिस्तान भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत आहे. यापूर्वी 1948, 1965, 1971 आणि कारगिल संघर्षाच्या सुमारासही भारताने पाकच्या या छुप्या लढाईचा अनुभव घेतलाय. पारंपरिक युद्धात पाकिस्तान जिंकू शकत नाही. आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याने भारत आपल्याविरुद्ध मोठी लष्करी कारवाई करणे टाळेल, अशा प्रकारचा उद्दामपणा अलीकडे पाकिस्तानी नेत्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसत होता. मात्र, पाकिस्तानमध्ये पूर्वनियोजित लक्ष्य अचूकपणे उद्‌ध्वस्त करीत भारतीय हवाई दलाने अखेर आपली क्षमता सिद्ध केलीच.
खरंतर, ही अतिशय सुसंघटित कारवाई होय. तत्त्वत: 1999 मधील कारगिल युद्धादरम्यान हवाई दलाला नियंत्रण रेषेपलीकडेच (एलओसी) रोखण्यात आले होते. यापूर्वी फक्त 1971 मध्येच भारतीय हवाई दल पाकच्या हवाई हद्दीत घुसले होते. त्यानंतर, 26 फेब्रुवारी रोजी डझनभर मिराज 2000 लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढविला. लेझरद्वारे मार्गदर्शित केल्या जाणाऱ्या एक हजार किलोंच्या बॉम्बचा वर्षाव केला. त्यात हे तळ पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले. पाकिस्तानकडे हवाई हल्ल्यापासून बचाव करण्याची चांगली क्षमता आहे, ही महत्त्वाची बाब येथे लक्षात घेण्याजोगी. मात्र, भल्या पहाटेच्या या हल्ल्याबद्दल तो बेसावध राहिल्याचे दिसते. भारतीय हवाई दलाने हल्ल्यापूर्वी त्यांची यंत्रणा ठप्प केली असण्याची शक्‍यताही आहे. त्याचप्रमाणे लक्ष्याचा अचूक वेध घेणारे "प्रिसिजन गाइडेड' किंवा "लेझर गाइडेड म्युनियन्स' प्रत्यक्ष लक्ष्यापासून 100 किमी अंतरावरून डागलेले असू शकते. अलीकडच्या काळात पाकिस्तानचे हवाई दल दुसऱ्यांदा अपयशी ठरले, ही बाबही उल्लेखनीय. यापूर्वी, 2011 मध्ये अमेरिकेचे हवाई दलही पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले होते. अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.

भारताच्या या तंतोतंत अचूक हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया काय असणार, एवढाच प्रश्‍न उरतो. सध्या तरी पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या घुसखोरीला मुझफ्फराबादमध्ये आपण कसे प्रत्युत्तर दिले, याच्या सुरस कथा रंगवून सांगण्यास सुरवात केलीय. यापूर्वीही सर्जिकल स्टाईकनंतर पाकने अशाच प्रकारचा कांगावा केला होता. आगामी दोन-तीन दिवस अमेरिका (आणि चीनसुद्धा) उत्तर कोरिया परिषदेत व्यग्र असल्याची पुरेपूर जाणीव पाकिस्तानला आहे. त्यामुळे, त्यांना रडण्यासाठी खांदाही मिळू शकणार नाही. पाक भारताला तत्काळ उत्तर देईल, अशीही शक्‍यता नाही. त्याचप्रमाणे, आपल्या कमकुवत आर्थिक क्षमतेमुळे आपण भारताविरुद्ध कुठलेही युद्ध पुकारू शकत नाही, याचीही पाकला कल्पना आहे. एरवी शांतताकाळात मित्र असणाऱ्या चीनलाही विविध भूराजकीय परिस्थितीमुळे भारताविरुद्धच्या युद्धात पाकशी हातमिळवणी करणे अवघडच. त्यामुळेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे शांततेची एक संधी देण्याचे आवाहन केले होते. मात्र, अविचारी पाकिस्तान कोणत्याही क्षणी आत्मघातकी कृत्य करू शकतो. त्यामुळे, भारतीय सशस्त्र दले आणि गुप्तचर संस्थांना यापुढे अधिक दक्ष राहावेच लागेल.
(अनुवाद : मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com