भाष्य : युद्ध संपता संपेना...

‘हमास’ने इस्राईलमध्ये दहशतवादी हल्ला केला, त्याला शंभर दिवस झाले आहेत. जगात दोन ठिकाणी युद्धे सुरू असून ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
israel people
israel peoplesakal

‘हमास’ने इस्राईलमध्ये दहशतवादी हल्ला केला, त्याला शंभर दिवस झाले आहेत. जगात दोन ठिकाणी युद्धे सुरू असून ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट पश्चिम आशियात तर त्याची व्याप्ती वाढत आहे. असे का घडत असावे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे तर निरीक्षक आणि तज्ज्ञांनाही पडला आहे.

अमेरिका आणि ब्रिटनच्या नौदलांनी लाल समुद्रामध्ये नुकताच येमेनच्या हौती बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. इराणचे पाठबळ असलेल्या या बंडखोरांच्या गटाकडून लाल समुद्रामधून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर वारंवार हल्ले केले जात आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि ब्रिटनने हे हवाई हल्ले केले. या हौथी नबंडखोरांचे ‘हमास’शी लागेबांधे आहेत.

त्यामुळे इस्राईलने गाझापट्टीमध्ये ‘हमास’विरोधात सुरू केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून लाल समुद्रात इस्राईलशी संबंधित जहाजांवर हल्ला करत असल्याचा दावा हौथी बंडखोरांनी केला आहे. त्याचप्रमाणे हौथी बंडखोर इस्राईलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्लेही करत आहेत. तर दुसरीकडे ‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना इस्राईलचे लष्कर ठार करत आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्राईल आणि ‘हमास’मध्ये सुरू झालेला हा संघर्ष प्रादेशिक संघर्षाचे स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, सुमारे दोन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध नजीकच्या काळात तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

‘आधुनिक काळातील युद्ध ही अल्प कालावधीची असतील,’ असा सिद्धांत शीतयुद्धानंतर मांडण्यात आला होता. मात्र ही दोन्ही युद्धे या सिद्धांताला छेद देताना दिसताहेत. युद्धाबाबत विश्लेषण करणाऱ्या कोणत्याही तज्ज्ञांना, रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहील याबाबत अंदाज लावता आला नव्हता. हीच गोष्ट इस्राईल-हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबतही लागू होते.

इस्राईलकडून ‘हमास’वर करण्यात आलेले हवाई हल्ले आणि जमिनीवरून करण्यात आलेल्या लष्करी कारवाईनंतरसुद्धा, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘हमास’वर दबाव निर्माण करण्यात इस्राईलला यश आलेले नाही. जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तचर संस्थांमध्ये अग्रस्थानी असलेल्या इस्राईलच्या गुप्तचर संस्थेलादेखील, ‘हमास’ने ओलीस ठेवलेले नागरिक नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा लावता आलेला नाही.

विशेष म्हणजे गाझा पट्टीचा भाग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत छोटा असूनदेखील हे ओलीस नेमके कोठे आहेत हे शोधता आलेले नाही. कोणतेही अधिकृत पाठबळ नसलेली ‘हमास’ ही दहशतवादी संघटना किती तयारीने या युद्धात उतरली आहे, हेच यावरून दिसते. सध्या, युद्धबंदी किंवा पॅलेस्टाईनला मान्यता यांसारख्या कोणत्याही सल्ल्यावर विचार करण्याची इस्राईलची मःनस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, ही दोन्ही युद्धे लवकर थांबतील असे वाटत नाही.

अरब राष्ट्रांमध्ये १९९१ मध्ये ‘ऑपरेशन डेझर्ट’ अंतर्गत कुवेतला स्वतंत्र करण्यासाठी इराकविरोधातील युद्ध पाच आठवडे सुरू राहिले. अमेरिकेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यदलाने अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई केली.

अफगाणिस्तानातून तालिबानची राजवट संपवून तेथे लोकशाही आणण्यासाठी सुमारे २० वर्षे अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. परंतु अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी १५ ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तान सोडल्यानंतर ‘तालिबान’ने पुन्हा अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतली.

युक्रेन-रशिया युद्धामध्येही, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमीर झेलेंस्की हेदेखील युक्रेन सोडून पळून जातील, असे ब्लादिमीर पुतीन यांना वाटत होते. तसे काही होण्याची चिन्हे नाहीत. २००० मध्ये नागोर्नो - काराबाख येथे अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात झालेला वांशिक आणि प्रादेशिक संघर्ष, ज्याला ‘ड्रोन युद्ध’ असेही म्हणतात, तो ४४ दिवस सुरू होता. या सर्व युद्धांचे स्वरूप पाहूनच भविष्यातील युद्धे अल्पकालीन असतील, असे निरीक्षकांचे, अभ्यासकांचे मत झाले होते. ते या दोन्ही युद्धांत पूर्णतः चुकीचे ठरले आहे.

इतके दिवस युद्धविषयक घडामोडींच्या अभ्यासकांना असे वाटत होते की युद्ध सुरू असलेल्या राष्ट्रांपैकी जे राष्ट्रात तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आहे ते राष्ट्र कायमच युद्धात वरचढ ठरणार आणि त्यामुळे युद्ध समाप्त होणार. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा युद्धतंत्र आणि युद्धाबाबतचे धोरण नीट समजावून घेणे अधिक आवश्यक आहे. कोणत्याही राष्ट्राची संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाबाबतची उद्दिष्टे अथवा ध्येय स्पष्ट असणे आवश्यक आहे.

युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धात तांत्रिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास या युद्धात वरचढ ठरण्यासाठी रशियाकडे पुरेसे सामर्थ्य आहे. रशियाने युद्धाची पूर्वतयारीही बऱ्याच आधीपासून सुरू केली होती. परंतु युद्धात आघाडी घेण्याची रम्य स्वप्ने पाहत असताना, ‘नाटो’ सैन्य युद्धात सहभागी झाले नाही तरी त्यांच्याकडून या युद्धात युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रपुरवठा केला जाऊ शकतो ही शक्यता विचारात घेण्यास रशियाचे नेतृत्व कमी पडले.

रशियाने ही चूक आता सुधारल्याचे दिसत आहे आणि हे युद्ध लांबविण्यासही प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. रशियाने त्यांची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याचा आणि ऊर्जा वाचवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर रशियाकडून त्यांच्या हवाई दलाचाही पूर्ण क्षमतेने वापर केला जात नाहीये. याचे कारण म्हणजे अमेरिका आणि नाटो फौजांनी थेट या युद्धात सहभाग घेऊ नये, याची काळजी रशियाकडून घेतली जात आहे.

युक्रेनला आतून खिळखिळे करण्याचे धोरण रशियाने आता स्वीकारल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इस्राईलने मात्र ‘हमास’चा संपूर्ण नायनाट करायचा संकल्प करून सर्व बाजूंनी कारवाई सुरू ठेवण्याचे धोरण आखले असल्याचे स्पष्ट होत आहे.

या दोन्ही युद्धातील एक समान दुवा म्हणजे युक्रेन आणि इस्राईलला अमेरिकेकडून पाठबळ मिळत आहे. आज मध्य आशियामध्ये जी युद्धाची आग धुमसत आहे त्याला मध्य आशियाबाबतचे अमेरिकेचे धोरण कारणीभूत आहे. मध्य आशियामध्ये अमेरिकेला हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात इराण मात्र काही अंशी यशस्वी ठरला आहे.

थेटपणे अमेरिकेशी संघर्ष करत नसला तरी हिजबुल्ला, हमास, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादी संघटना यांना इराण पाठबळ देत आहे. आज जरी अमेरिका पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करत असली तरीदेखील या प्रदेशात इराणपेक्षा इस्राईलचे वर्चस्व निर्माण झालेले पाहण्यातच अमेरिकेला अधिक आनंद आहे. शीतयुद्धाच्या काळातील घडामोडींचा अभ्यास करता, अमेरिका आणि सोव्हिएत हे कोणत्याही संघर्षात थेट सहभागी झाले नाहीत हे स्पष्ट होते.

या दोघांनीही कायम छुप्या पद्धतीने लष्करी संघर्षात हस्तक्षेप केला आहे. आज युक्रेन आणि गाझा (त्याचप्रमाणे सीरिया येथेही) येथे सुरू असलेल्या संघर्षाची सूत्रे ही अमेरिकेकडे असून त्यांच्या स्वतःच्या सैन्याचा रक्तपात न होऊ देता ही छुपी युद्धे सुरू आहेत. अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने बायडेन हे कोणत्याच युद्धात अमेरिकी सैन्याला थेट सहभागी होऊ देणार नाहीत.

कारण आधीच त्यांना, युक्रेनला लष्करी मदत केल्यामुळे अमेरिकी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच आता ते हमास संघर्षाचे कारण पुढे करून मध्य आशियातील लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेने मदत करणे कसे आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत आहेत.

अमेरिकी राजकारणातील ज्यूंचे वर्चस्व याचा संदर्भ इथे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. या छुप्या युद्धासाठी इस्राईल आणि युक्रेनचे सैन्य अमेरिका वापरत आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही दोन्ही युद्धे किती काळ लांबणार हे अमेरिकेला या दोन्ही युद्धातून नेमके काय साध्य करायचे आहे यावर आणि युद्धासाठी अमेरिका आर्थिक व लष्करी साहित्याची मदत किती काळ करू शकते, यावर

अवलंबून आहे.

(अनुवाद ः रोहित वांळिंबे)

(लेखक सामरिक धोरणांचे विश्लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com