भाष्य : तंत्रज्ञानावर विसंबला त्याचा...

उपग्रहतंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, दूरसंवेदक अशी इस्राईलची हेरगिरी यंत्रणा बहुअस्त्रधारिणी आहे.
Israel Cyber technology
Israel Cyber technologySakal

उपग्रहतंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, दूरसंवेदक अशी इस्राईलची हेरगिरी यंत्रणा बहुअस्त्रधारिणी आहे. असे असूनही त्या यंत्रणेला ‘हमास’च्या युद्धतयारीचा सुगावा लागू नये, हे आश्चर्याचेच आहे. तंत्रज्ञानावरचे अवाजवी अवलंबित्व हे या अपयशाचे कारण आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

युद्धातले थरारक नाट्य ज्यात ओतप्रोत भरलेले असते, ते क्षेत्र म्हणजे हेरगिरीचे. अनेक कथा-कादंबऱ्यांमधून हा विषय विविध प्रकारे आपल्यासमोर येत असतो. विज्ञानाच्या वेगवान प्रगतीने जे नवे तंत्रज्ञान आले आहे, त्यामुळे तर गुप्तचर यंत्रणांच्या कामाचे सारे परिमाणच बदलून गेले आहे.

या अतिशय अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा अंगीकार करणारे राष्ट्र म्हणूनच इस्राईल ओळखले जाते. त्यामुळेच `हमास’च्या दहशतवादी हल्ल्याची माहिती या यंत्रणांना कळू नये, याचे सर्वदूर आश्चर्य व्यक्त होत आहे. पन्नास वर्षांपूर्वी ‘योम किप्पूर युद्ध’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरब-इस्राईल युद्धातही इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणा हल्ल्याची पूर्वकल्पना मिळविण्यात अपयशी ठरल्या होत्या.

पन्नास वर्षांनंतरही नेमके तसेच घडावे, हा एक विलक्षण योगायोग. त्यावेळी म्हणजे १९७३ मध्ये अमेरिकेने उपग्रहामार्फत मिळालेली महत्त्वाची माहिती न दिल्याने इस्राईलने नाराजी व्यक्त केली होती. याच टप्प्यावर या देशाने ठरवले की कोणावर अवलंबून न राहता आपण आपला अवकाश संशोधन कार्यक्रम हाती घ्यायचा. १९८८ पासून गुप्त माहिती मिळवण्यासाठी उपग्रहांचा वापर करायला इस्राईलने सुरवात केली.

ऑफेक मालिकेतील ‘ऑफेक-१३’ हा उपग्रह २९ मार्च २०२३ ला हेरगिरी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. ‘सिंथेटिक ॲपरेचर रडार’ हा दूरसंवेदक त्यात बसविलेला आहे. त्यामुळे कोणत्याही हवामानाच्या प्रकारात दिवसा व रात्रीही माहिती तो देऊ शकतो. कमीत कमी वेळात माहिती देण्याची या उपग्रहाची क्षमता आहे.

उपग्रहतंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, दूरसंवेदक अशी इस्राईलची हेरगिरी यंत्रणा बहुअस्त्रधारिणी आहे. असे असूनही त्या यंत्रणेला ‘हमास’च्या युद्धतयारीचा सुगावा लागू नये, हे आश्चर्याचेच आहे. तंत्रज्ञानावरचे अवाजवी अवलंबित्व हे या अपयशाचे कारण आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही प्रकारे उत्तर देता येईल. ‘हो’ यासाठी की हा अगदी साधा तर्क आहे.

इस्राईलची गाझाबरोबरच्या सीमेवरील तटबंदी भक्कम आहे. तंत्रज्ञानाने युक्त अशा या अत्याधुनिक सीमाकुंपणाला भेदून ‘हमास’चे सशस्त्र दहशतवादी आत घुसले. त्यामुळे ते पुरेसे संरक्षक नाही, हे दिसून आले. हे हल्लेखोर पुरेशा तयारीनिशी, योजनेनिशी आले होते. जमिनीवरून, समुद्रावरून आणि हवेतूनही त्यांनी घुसखोरी केली. केव्हा, कुठे, कसे जायचे याचा आराखडा तयार होता.

तिथे घुसून कोणाला पकडून ओलीस ठेवायचे, याचीही हल्लेखोरांची निश्चित अशी योजना होती. ती त्यांनी नुसती आखलीच असे नव्हे तर पारही पाडली. असे जर होत असेल तर त्या महागड्या हेरगिरी यंत्रणेवर कोट्यवधी डॉलर खर्च करण्याने काय साधले, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. त्यामुळेच तंत्रज्ञानावरचे अवाजवी विसंबून राहणे इस्राईलच्या अंगलट आले आहे, असे दिसते.

तथापि वर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे ‘नाही’ असे उत्तरही आहे. याचे कारण केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे हेरगिरीचा, गुप्त माहिती मिळविण्याचा हेतू साध्‍य होतो, असे नाही, हे इस्राईलला चांगलेच ठाऊक आहे. विशेषतः योजना आखताना जर शत्रूने विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केलाच नाही, तर इस्राईलच्या ‘रडार’वर कोणत्याच माहितीची नोंद होणे शक्य नाही. फोन टॅपिंग उपकरणांपासून ते उपग्रहांपर्यंत सर्व यंत्रणा अशावेळी कुचकामी ठरतात!

गुप्तहेरगिरीतील मानवी कौशल्य हे सर्वात महत्त्वाचे, हा धडा या निमित्ताने मिळाला. परंतु ही मानवी हेरगिरीदेखील इथे अपयशी ठरलेली दिसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जमा करणे, तो हव्या त्या ठिकाणी हलविणे, त्यासाठीच्या सर्व आनुषंगिक व्यवस्था उभ्या करणे हे सोपे काम नाही.

ते कोणाच्या डोळ्यावर आल्याशिवाय कसे राहील? त्यामुळेच इस्राईलचे अपयश ठळकपणे नजरेत भरते. यापूर्वीचे इस्राईल विरुद्ध `हमास’ या संघर्षाचे स्वरूप पाहिले तर ‘हमास’ प्रामुख्याने छोटी क्षेपणास्त्रे डागत असे. परंतु इस्राईलकडे अद्ययावत क्षेपणास्ररोधी यंत्रणा असल्याने त्यातील ९५ टक्के क्षेपणास्त्रे वाया जात. त्यावर उपाय म्हणून अगदी कमीत कमी तंत्रज्ञान वापरून हल्ला करण्याची रणनीती हमासने आखल्याचे दिसते.

फारफार तर आपल्यावर रॉकेटहल्ले होतील, पण देशाच्या भूमीवर शत्रू घुसेल, असे इस्राईलला वाटले नव्हते. जमिनीवरचा कोणताही हल्ला परतवून लावण्यास आपले सैन्यच समर्थ आहे, या समजुतीत इस्राईल राहिला. जेरुसलेमसारख्या ठिकाणी सीमेवर फेशिअल रेकग्निशन, (चेहेऱ्यावरून ओळखण्याचे तंत्र) कॅमेरे आदी उपकरणांच्या सहाय्याने पहारा केला जात होता.

स्मार्ट सिटी टेक्नॉलॉजीवर देश प्रामुख्याने अवलंबून होता. विविध तपासनाक्यांवर हेच चित्र होते. गाझालगतच्या सीमेवरील पहाराही अशाच रीतीने तंत्रज्ञानाधिष्ठित होता. पुरेसा मनुष्यबळासह सैन्याचा अहोरात्र खडा पहारा असता तर हल्लेखोरांना घुसणे अवघड गेले असते.

हमासने आपली संपूर्ण रणनीती आखताना इस्रायली लष्कर, गुप्तचर यांच्या डोळ्यावर येणार नाही, याची दक्षता घेतली. जुन्या, पारंपरिक मार्गांने हल्ला करण्याची योजना त्यांनी आखली. वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वेगवेगळी पथके तयार केली. ज्या ज्या यंत्रणांमार्फत इस्राईलला माहिती कळण्याची शक्यता आहे, त्यांना वळसा घालून जाण्याची ‘हमास’ने तयारी केली गेली. त्यासाठी बरेच महिने अभ्यास करावा लागला असणार, हे उघड आहे.

इस्राईल नेमकी कोणती उपकरणे, कोणते तंत्रज्ञान वापरत आहे, याची तपशीलवार आणि तांत्रिक माहिती त्यांनी मिळवली असणार. त्याआधारे स्वतः ‘एनक्रिप्टेड’ तंत्रज्ञान वापरून त्यांनी इस्रायली व्यवस्थांना हूल दिली.

आता इस्राईल जे प्रतिहल्ले करीत आहे, ते हमासच्या तळांवर. या तळांची माहिती इस्राईलला पूर्णपणे होती, असे या माऱ्यावरून लक्षात येते. मात्र या तळांवर इस्राईलने सततची देखरेख ठेवली नव्हती. दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या राष्ट्र-राज्यांना या हल्ल्याने अनेक प्रकारचे धडे दिले आहेत. राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला यत्किंचितही गाफीलपणा परवडणारा नाही, हा पहिला धडा. तंत्रज्ञान हे संरक्षणाचे केवळ एक साधन आहे.

ते सर्वस्व नव्हे.रष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तरी माणसाची जागा यंत्र घेऊ शकत नाहीत. यंत्रे काही प्रकारीच माहिती पुरवू शकतात. तिचे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने विश्लेषण करणे, त्यातून योग्य तो ‘संदेश’ घेणे हे नेतृत्वाचे काम असते. ‘हमास’च्या ताज्या हल्ल्यात तर असे दिसते की यंत्रे काहीच सांगत नव्हती!

खरे तर या न सांगण्यातूनच इस्रायली सैन्याला प्रश्न पडायला हवा होता; तो म्हणजे ‘व्हाय ऑल इज क्वाएट ॲट द गाझा फ्रंट?’ त्या ‘शांतते’चा अर्थ जाणण्यात ते कमी पडले आणि एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरले.

(लेखक सामरिक व्यूहनीतीचे विश्लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com