ढिंग टांग : इं-धन की बात..! (एक राजकीय पत्रव्यवहार…) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : इं-धन की बात..! (एक राजकीय पत्रव्यवहार…)

ढिंग टांग : इं-धन की बात..! (एक राजकीय पत्रव्यवहार…)

प्र ति. आदरणीय दादासाहेब ऊर्फ धाकले धनी यांसी, सा. न.

मी एक प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचा देशभक्त कार्यकर्ता आहे. आपला थोडासा परिचयदेखील आहे. मला वकिलीचेही ज्ञान आहे आणि मी थोडेफार (सुरात) गातोदखील! मला अर्थशास्त्रातलेही थोडेफार कळते. (काही टीकाकार ’फार थोडे’ असे म्हणतात, पण ते खरे नाही.) एकूणच मला कुणाहीपेक्षा थोडे जास्तच कळते. (म्हणूनच) मी या राज्याचा पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहू शकलो. (आपल्या कृपेने) पुढे बहात्तर तासासाठी ‘पुन्हा आलो’देखील होतो. पण…पण ते आता जाऊ दे.

सध्या महाराष्ट्रात इंधनावरुन वातावरण तापले आहे. ते आणखी तापत जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यावर थंड पाण्याचा शिडकावा तुम्हीच मारु शकता. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत. पत्र लिहिण्यास कारण एवढेच की (तुमच्या) राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलादी इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करुन महाराष्ट्राच्या जनतेस दिलासा द्यावा, असे वाटते. प. पू. प. आ. मा. नमोजी यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने मध्यंतरी इंधनाची दरवाढ यशस्वीपणे रोखून उलट इंधनदर अचानक कमी केले. मा. नमोजी यांना वंदन असो!

इंधन दरकपात एवढी अचानकपणे घडली की, काही जणांना हर्षवायूमुळे प्राणांतिक धक्का बसला. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ (नाव सांगणार नाही!) टीव्हीवर बातम्या ऐकता ऐकता कोसळले. घरात महागडा कांदाही नव्हता. त्यामुळे काही तास ते बेशुद्धच होते. जाग आल्यावर त्यांनी ‘राज्य सरकारने व्हॅट हटवण्यापूर्वी चारेक दिवस तरी आधी कल्पना द्यावी’ अशी मागणी केली.

एकेकाळी इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतेच बैलगाडी मोर्चे, सायकल मोर्चे, धरणे आंदोलने, कचकचीत भाषणे आदी उपक्रम करत होते. बैलगाडी मोडेपर्यंत ही वेळ आली! लोकांच्या शिव्याशाप खात आमच्या पक्षाचे लोक निमूटपणे सारी सरबत्ती सहन करीत होते. परंतु, आता चित्र नेमके उलट दिसते आहे. राज्य सरकार व्हॅट कमी करायला तयार नसल्याने भाजपवाले आंदोलन करु लागले आहेत, आणि बैलगाडी आणि सायकल मोर्चेवाले गडप झाले आहेत. कांग्रेसचे नानासाहेब पटोले तर हल्ली बैलगाडीचे नाव काढले तरी मोटारीची काच वर करुन भर्रदिशी निघून जातात. कालाय तस्मै नम: म्हणायचे, दुसरे काय?

तरी व्हॅट कमी करुन पेट्रोल-डिझेलच्या किंमती राज्यात (आणखी) कमी कराव्यात, ही कळकळीची विनंती करण्यासाठीच हा पत्रप्रपंच. हे पत्र मी खरे तर ‘मातोश्री’वर पाठवणार होतो; पण ते माझी पत्रे वाचीत नाहीत, असा अनुभव आहे. तुम्हीच काहीतरी करा! कळावे.

आपला औटघटकेचा मित्र. फडणवीसनाना.

……………..

नानासाहेब यांसी, नमस्कार. मला पत्र लिहिण्याचे काही कारण नव्हते. मी पेट्रोल बनवत नाही, आणि त्यावर करही लावत नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, असे तुम्ही म्हणता, पण तिजोरीत काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? दोन्ही बाजूंनी वाजवली तरी पोकळ डमरुसारखी वाजते!! इंधनावरला कर कमी केला जाणार नाही. इंधन झाले तेवढे स्वस्त खूप झाले! नानासाहेब पटोले ‘मी पुन्हा बैलगाडी मोर्चा काढू का?’ असे विचारत होते. त्यांनाही मी ‘तुमची मर्जी’ असेच उत्तर दिले होते. तुम्हालाही तेच देतो. बाकी काय लिहू? शाईसुध्दा महाग झाली आहे!

आपला. दादासाहेब बारामतीकर. (धाकले धनी)

loading image
go to top