Natya Sammelan : नाट्य चळवळीसाठी संमेलने आवश्‍यकच

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित शतक महोत्सवी अर्थात शंभराव्या नाट्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
Natya Sammelan
Natya SammelanSakal

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित शतक महोत्सवी अर्थात शंभराव्या नाट्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. या संमेलनात मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. यानिमित्ताने गज्वी यांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी घेतलेली मुलाखत.

प्रश्न ः नाट्य चळवळीमध्ये नाट्य संमेलनाची नेमकी भूमिका काय? ही संमेलने होणे का महत्त्वाचे असते?

उत्तर : नाट्य संमेलनाच्या आयोजनाचा हेतू साधा आणि सरळ आहे. वर्षभर सगळे कलाकार विविध ठिकाणी नाटकांचे प्रयोग करतात, दौरे करतात. यातून सगळ्या कलाकारांनी वर्षभरात एकदा एकत्र येण्यासाठी चांगले निमित्त कोणते, तर ते संमेलन होय.

यानिमित्ताने एकत्र आल्यावर आपल्याला सांघिकपणे काय वेगळे करता येईल, पुढचे टप्पे काय असतील, रंगभूमीची दिशा कशी असावी, आशय-विषयाच्या दृष्टिने अधिक चांगले काय करता येईल, याबाबत विचारमंथन होते.

कलाकारांची परस्परांतील ओळख अधिक दृढ होण्यास मदत होते. शिवाय संमेलनातून केवळ नाटकच नव्हे, तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी बाबींवरही ऊहापोह होतो. संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून समकालीन प्रश्नांचा वेध घेतला जातो, त्यातून कधी सरकारचे कानही टोचले जातात. त्यामुळे एकूण नाट्य चळवळीला आकार देण्यासाठी संमेलने कळीची असतात.

नागपूर येथे २०१९ मध्ये ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. त्यानंतर जवळपास पाच वर्षांनी पुढील संमेलन होत असल्याने तुम्हाला दीर्घकाळ संमेलनाध्यक्षपद भूषवता आले. या काळात काय साध्य करता आले, असे वाटते?

: नाट्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी ज्या गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या, त्यातील बहुतेक सगळ्या गोष्टी साध्य झाल्या आहेत. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन केले, नाटकाशी संबंधित विविध उपक्रमांना उपस्थित राहिलो. या काळात नाट्य परिषदेच्या विविध शाखांसह दहा नाट्यलेखनाच्या कार्यशाळा घेतल्या.

मराठी नाटक अद्यापही मराठी परिसराच्या बाहेर फारसे जात नाही, अन्य भाषांमध्ये त्याचे फारसे अनुवाद होत नाहीत. आपल्या लेखनात काही दोष आहेत. त्यात व्यामिश्रता नसते, मोठ्या प्रश्नांसंदर्भात भाष्य नसते. हे दोष दूर करून नवे सकस नाटक लिहिले जावे,

हा या कार्यशाळांमागचा उद्देश होता. याचा परिणाम लगेच दिसणार नाही, त्यासाठी काही काळ जावा लागेल. मात्र, या कार्यशाळा यशस्वी झाल्या आणि त्या दृष्टीने प्रवास सुरू झाला आहे, याचे समाधान आहे.

ः नागपूर येथील भाषणात आपण काही मान्यवर रंगकर्मी अजूनही संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत, याकडे लक्ष वेधले होते. ज्यामध्ये डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाचाही समावेश होता. आता शतक महोत्सवी संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. पटेल भूषवणार आहेत. याकडे आपण कसे पाहता?

: नाट्यक्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या कलाकाराची दखल घेत त्याच्या कार्याचा सन्मान करणे, हा नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदामागील उद्देश असतो. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी ती व्यक्ती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सदस्य असावी, अशी परिषदेची अपेक्षा आहे.

त्यामुळे नागपूरच्या भाषणात मी अमोल पालेकर, सतीश आळेकर, गो. पु. देशपांडे यांसारखे अनेक मान्यवर रंगकर्मी संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असे म्हटले होते. या भाषणाचा परिणाम म्हणून किंवा अन्य काही कारणांनी, पण डॉ. जब्बार पटेल यांना संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले, ही अतिशय चांगली सुरुवात आहे.

यांमुळे परिषदेच्या विचारांचा परीघ विस्तारला आहे, असे म्हणायला हरकत नाही. येत्या काळातही महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, शफाअत खान यांसारख्या मान्यवरांनाही अध्यक्षपद मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार अध्यक्ष झाल्यास ते रंगभूमीला नवी दिशा देण्याचे काम करतील, हे निश्चित.

: आपण अध्यक्षीय भाषणात सामाजिक-राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते. आपली मतेही निर्भिडपणे व्यक्त केली होती. त्याचे परिणाम काय झाले असावेत किंवा त्याचे काय पडसाद उमटले?

: कोणतेही प्रश्न उपस्थित केले, तरी त्याचे बदल लगेच दिसत नाही. ‘शहरी नक्षल’ याबाबत मी बोललो होते. समजा मी नक्षली वाङ्मय वाचत असेन, अभ्यास म्हणून ते साहित्य माझ्याकडे असेल, तरी त्यामुळे मी दोषी ठरत नाही. म्हणजे नक्षल चळवळीशी संबंधित वाङ्मय कोणाकडे सापडले, ही बाब त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी असू नये त्यापलीकडे अन्य काही पुरावे असल्यास नक्कीच योग्य ती कारवाई नक्कीच व्हावी, असा मुद्दा मी मांडला होता.

त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नक्षली वाङ्मय आढळल्यावर अटक होणार असेल तर मलाच पहिल्यांदा अटक होईल, कारण माझ्याकडे देखील ते वाङ्मय आहे. त्यामुळे असे काही होणार नाही,’ असे उत्तर दिले होते. हा परिणाम तात्कालिक होता, मात्र आपल्या भाषणाची दखल घेतली गेली, याची ती खूण होती.

: मराठी रंगभूमीवरील सध्या ठळक जाणवणाऱ्या उणिवा कोणत्या? रंगभूमीसमोर सद्यःस्थितीत कोणती आव्हाने आहेत?

: व्यावसायिक रंगभूमीचा हेतू मनोरंजन हाच असतो. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याची, त्याच विषयांवर भाष्य करणारी नाटके तेथे येत आहेत. पण फाळणी, आणीबाणीचा कालखंड किंवा अगदी अलीकडे आलेले कोरोनाचे अभूतपूर्व संकट, यातील कशावरच दर्जेदार म्हणावे असे नाटक आलेले नाही. समाज प्रबोधनात्मक अशी नाटके होतच नाहीत.

विविध सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न मांडणारी नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये किंवा प्रायोगिक रंगभूमीवर सादर होतात. मात्र, तेथे अनेकदा प्रश्न तेच असतात, केवळ मांडणीत वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण नाटक हे मांडणीसाठी महत्त्वाचे नसते, आशयासाठी अधिक महत्त्वाचे असते.

: आगामी नाट्य संमेलनाने आणि पर्यायाने नाट्य परिषदेने कोणते मुद्दे प्राधान्यक्रमाने हाताळावेत?

उत्तर : वर म्हटल्याप्रमाणे लेखकांची जाणीव विकसित व्हायला हवी. ही जाणीव विकसित करण्याचे कामही नाट्य परिषदेचे आहे. विविध प्रकारच्या नाट्यलेखन कार्यशाळा घेऊन, त्यातून गुणी नाटककार निवडून त्यांना मदत करायला हवी. राज्यातील नाट्य परिषदेच्या अनेक शाखा निधीअभावी बंद पडल्या आहेत.

राज्य सरकारकडून निधी घेऊन या शाखा कार्यरत करण्याचा प्रयत्न हवा. नाटक हे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी निगडितच असते. त्यामुळे आज सर्वसामान्य माणसांना भेडसावणाऱ्या भारनियमनासारख्या विविध मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधणे, हे कलाकार म्हणून आपले कर्तव्यच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com