शंभर टक्के देशी क्षेपणास्त्रावर भर

‘ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड’च्याचे व्यवस्थापकीय संचालक अतुल दिनकर राणे यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.
Atul Rane
Atul RaneSakal
Summary

‘ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड’च्याचे व्यवस्थापकीय संचालक अतुल दिनकर राणे यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.

सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल बनविणाऱ्या ‘ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अतुल दिनकर राणे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.

प्रश्‍न - ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेडची तुमच्या नेतृत्वाखाली वाटचाल कशी असेल?

अतुल राणे - ब्रह्मोस जॉइंट व्हेंचर हा भारतातील सर्वात यशस्वी संरक्षण विकास आणि उत्पादन कार्यक्रमांपैकी एक आहे. ‘ब्राह्मोस’ने दर्जाबाबत जागतिक ओळख निर्माण केली आहे. या प्रतिष्ठित लष्करी-तांत्रिक कार्यक्रमाशी निगडित असणे हा मोठा सन्मान आहे. या जबाबदारीतून भारतीय सशस्त्र दलांना आवश्‍यक आधुनिक शस्त्रास्त्रे, यंत्रणांनी पूर्णपणे सुसज्ज करायचे आहे. त्यानुसार पुढील वाटचाल असेल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली हे ‘मेड इन इंडिया’चे रास्त उदाहरण आहे. त्याच्या निर्मितीत स्वदेशी सामग्री वाढवण्यावर भर आहे. यासाठी देशातील उद्योगांसोबत ब्रह्मोस एअरोस्पेस काम करत आहे. यामुळे कमी वेळेत आणि अत्यंत चांगल्या दर्जाच्या स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीस चालना मिळेल. सशस्त्र दलांमध्ये कार्यान्वित प्रणालींची संख्या वाढविणे, त्या अद्ययावत करणे अशीही कामे केली जातील.

गेल्या काही वर्षांत ‘डीआरडीओ’ने ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेअंतर्गत नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे विकसित केली आहेत. ब्रह्मोस एअरोस्पेस त्याप्रमाणे कोणते प्रकल्प हाती घेणार आहे?

- सध्या ब्राह्मोसची अद्ययावत प्रणाली विकसित करण्यास ब्रह्मोस एअरोस्पेसचे सर्वोच्च प्राधान्य आहे. डीआरडीओ हे ब्रह्मोस एरोस्पेस आणि रशियन भागीदारांसोबत क्षेपणास्त्राच्या प्रगत आणि नव्या डिझाईनवर काम करेल. जे आगामी काळात संरक्षण दलांद्वारे वापरले जातील. यामध्ये अचूक मारा, कार्यक्षमतेवर भर राहील. आधुनिक लष्करी प्लॅटफॉर्मच्या विस्तृत श्रेणीवर अधिकाधिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी लहान आणि हलक्या क्षेपणास्त्राची रचना यावर भर दिला जाणार आहे.

जागतिक स्तरावरील क्षेपणास्त्र कार्यक्रमांच्या तुलनेत भारताची वाटचाल कशी आहे?

- भारत हे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान व्यवहारांसाठी सर्वात आकर्षक गुंतवणूक स्थळांपैकी एक आहे. यावरून भारतातील वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची प्रगती लक्षात येते. ‘अग्नी’सारखी सामरिक क्षेपणास्त्रे, ‘शक्ती’ या उपग्रहविरोधी शस्त्रास्त्राचे प्रात्यक्षिक आणि अत्याधुनिक सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ब्राह्मोस आदी आधुनिक लष्करी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा विकास आणि यशस्वी चाचण्या करून भारताने निवडक राष्ट्रांच्या ‘एलिट क्लब’मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे विकासाची गती कायम राखण्याचे आणि सक्षम प्रणाली विकसित करण्याचे आव्हान असेल.

चीन आणि पाकिस्तानची आव्हाने पाहता स्वदेशी आणि आधुनिक क्षेपणास्त्रे प्रभावी कशी ठरू शकतात?

- क्षेपणास्त्रे शस्त्रास्त्रांच्या सर्वात शक्तिशाली प्रकारांपैकी एक आहेत. ती आधुनिक काळात युद्धनीती व युद्धातील योगदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. दोन आघाड्यांवर एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या शत्रूंचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी व्यूहात्मक युद्धनीती, आधुनिक, स्वदेशी शस्त्रांचा विकास महत्त्वाचा आहे. ते लक्षात घेऊनच भारताचा शक्तिशाली क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबवला जात आहे. कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तरास आपण सज्ज आहोत.

संरक्षण संशोधनाबाबतची सद्यःस्थिती काय आहे?

- भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर भर दिलाय. संरक्षण संशोधनाला चालना दिली आहे. चांगली कामगिरी दिसत आहे. अनेक यशस्वी लष्करी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा विकास केला आहे. मर्यादित कालावधीत परिणामकारक उत्पादनांचा विकास करत नवीन टप्पे साध्य करण्यासाठी, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयत्नांमध्ये सर्व धोरणे, योजना आणि संसाधने प्रभावीपणे चॅनेलाइज करणे आवश्यक आहे. सरकारने या दिशेने अनेक धोरणात्मक उपक्रमांना मंजुरी दिली आहे. यात सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संरक्षण संस्था, शैक्षणिक संस्था सामुदायिकरित्या योगदान देऊ शकतात.

ब्राह्मोस निर्मिती प्रकल्पाला कशी दिशा देणार आहात?

- मी ब्राह्मोसच्या रचना आणि निर्मितीमध्ये भाग घेतला आहे. यासाठी मला ‘डीआरडीओ’ने ब्राह्मोस प्रकल्पाचा व्यवस्थापक केले. मिसाईल ऑनबोर्ड इक्विपमेंट, सॉफ्टवेअर-हार्डवेअर इंटिग्रेशन विथ रशियन सिस्टीम, सिस्टीम स्टडीज आणि नेव्हल शिप अँड आर्मी लाँचरसह सिस्टीम इंटिग्रेशनमध्ये काम केले. माझ्याकडे नौदल आणि सैन्यदलांसाठी विकसित प्रणालींच्या चाचणी मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे कामही होते. ब्राह्मोससारख्या शक्तिशाली शस्त्रामुळे केवळ सशस्त्र दलेच नव्हे तर जागतिक स्तरावर भारताचा लष्करी दर्जाही उंचावला आहे.

संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांचा सहभाग आणि त्यामुळे आयात कमी करणे व निर्यात वाढवणे कसे साध्य होईल?

- भारतीय खासगी उद्योगांनी अल्पावधीत बरेच साध्य केले आहे. त्यांनी ‘डीआरडीओ’च्या स्वदेशी डिझाईनच्या निर्मितीमध्ये भाग घेतला आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम, एमबीटी अर्जुन आणि अगदी ब्राह्मोसही त्याचे उदाहरण आहे. सध्या आमच्याकडे ब्राह्मोसच्या उपप्रणालीच्या उत्पादनावर काम करणारे सुमारे २०० उद्योग भागीदार आहेत. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वदेशीकरण साध्य करण्यासाठी तसेच, संरक्षण निर्यातीला प्रोत्साहनाच्या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाला चालना देत आहोत. यामुळे उद्योगांची देशांतर्गत पुरवठा साखळी तयार होईल.

तुम्ही आतापर्यंत कोणत्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले आहे?

- डिजिटल सिम्युलेशन अभ्यासाद्वारे आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा अभ्यास, ‘आकाश’च्या चाचणीसाठी मॉड्युलर रिअल-टाइम सिम्युलेशन चाचणी बेडसुद्धा विकसित केले आहेत. अग्नी-१ क्षेपणास्त्रासाठी ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर विकसित करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. मी अग्नी ऑनबोर्ड सिस्टम्सच्या चाचणी आणि मूल्यमापनासाठी एकात्मिक चाचणी-बेड सुविधेच्या स्थापनेवरही काम केले. त्यानंतर मी एका प्रकल्पासाठी अभ्यास गटात सहभाग घेतला, जे शेवटी ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून पुढे आले. या प्रकल्पासाठी एव्हीऑनिक्स प्रणालीच्या विकासाचे व्यवस्थापन करण्याचे काम माझ्याकडे होते. सुरवातीच्या वर्षांत ‘डीआरडीओ’च्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाशी निगडित राहिल्यामुळे माझे ज्ञान आणि तांत्रिक कौशल्य विकसित झाले. १९८८मध्ये ‘डीआरडीएल’चे (हैदराबाद) संचालक डॉ. एपीजे अब्दुल कलाम व ‘डीआरडीओ’च्या इतर दिग्गजांनी मला क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात कामासाठी मार्गदर्शन केले. हा जीवनातील सर्वोत्कृष्ट अनुभव आहे.

राज्यातील तरुणांना काय संदेश द्याल?

- महाराष्ट्राने देशाला अनेक दिग्गज व्यक्ती दिल्या आहेत. त्यांचा वारसा आपण अभिमानाने पुढे न्यावा. शिक्षणाचा पाया भक्कम करून तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी दाखवावी. योग्य शिक्षण, वैज्ञानिक ज्ञान, कौशल्ये, नवकल्पना, तांत्रिक कौशल्ये आत्मसात करावीत. देशाच्या विकासात योगदान द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com