कला, उद्योगाचे आश्रयस्थान : औंध संस्थान

लोकशाहीची आणि ग्रामस्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या औंध संस्थानच्या स्थापनेस यावर्षी ३२५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजाहितदक्ष संस्थान म्हणून याचा लौकिक आहे.
 Aundh Institute
Aundh Institutesakal

- आनंद परांजपे

लोकशाहीची आणि ग्रामस्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या औंध संस्थानच्या स्थापनेस यावर्षी ३२५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजाहितदक्ष संस्थान म्हणून याचा लौकिक आहे. अनेकविध कला, उद्योगाला प्रोत्साहन, आश्रय देणाऱ्या या संस्थानविषयी जनतेत आपुलकी आजही आहे.

औंधचे अधिपती भगवानराव पंतप्रतिनिधी यांनी आपल्या काळात मराठी साहित्य, कला चित्रकला, आरोग्य, व्यायाम, क्रीडा, शिक्षण, उद्योग आणि लोकशाही संवर्धन या क्षेत्रात ऐतिहासिक असे काम केले आहे. किर्लोस्कर, ओगले, चितळे हे उद्योग समूह यांची बीजे औंध संस्थानमध्ये अंकुरली. स्वतः भगवानराव पंतप्रतिनिधी प्रजेमध्ये मिळून मिसळून राहत. त्यांनी आपल्या संस्थानामध्ये भारतात सर्वप्रथम ग्रामपंचायतीची स्थापना केली आणि निवडणुका घेतल्या.

भगवानराव यांनी १९३५मध्ये इंदूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात ते रमले. ग्रंथलेखनास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे औंध येथे शिक्षण घेतलेले ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, साने गुरुजी, शंकरराव खरात, ना. सं. इनामदार, मधुकर पाठक (चित्रपट क्षेत्रातील) यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले.

औंध संस्थानात अनेक मान्यवर चित्रकार, शिल्पकार यांनी आपली कला सादर केली आहे. औंधचे संग्रहालय या सर्व सांस्कृतिक वारशाचे स्मारक आहे. अनेक दशके औंध येथे संगीत महोत्सव होत आहे. समृद्ध, समाजहितकारक वारसा असणाऱ्या राजाने राजेपण कधीच मिरवले नाही.

सच्चा गांधीवादी, प्रजेमध्ये मिसळणारा राजा महाराष्ट्रात होऊन गेला, हे आता कदाचित पटणार नाही. कला, साहित्य, कीर्तन, व्यायाम, उद्योग या सर्वांना एकाचवेळी आश्रय देणारा राजा होता. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आठ वर्षे आधीच या राजाने संस्थानचा कारभार जनतेच्या हातात दिला.

केवळ फक्त ७२ खेड्यांच्या या संस्थानाने इतिहासाच्या पानांवर वेगळा ठसा निर्माण केलाच. त्याहून प्रयोगशील संस्थान म्हणून ते कायमस्वरूपाची नोंद आहे. पंतप्रतिनिधींची मूळ गादी पूर्वी कऱ्हाड इथे होती. परंतु कऱ्हाड इंग्रजांकडे गेल्यावर १८५४मध्ये प्रतिनिधींची गादी औंधला आली. औंध संस्थानची रचना काहीशी वेगळी आहे.

राजधानी औंधला असली तरी बाकीची गावे आजच्या सांगली, सातारा, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यात विभागलेली होती. भगवानराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८मध्येच आपल्या संस्थानचा कारभार लोकांच्या हातून चालवला पाहिजे असे मत व्यक्त केले आणि त्याची अंमलबजावणीही केली.

लोकशाहीचा प्रयोग

महात्मा गांधीजींच्या स्वराज्य आणि ग्रामराज्य संकल्पनेने ते १९३४ पासूनच भारावून गेले होते. भगवानराव पंतप्रतिनिधी महात्मा गांधीना भेटायला गेले. लोकांच्या सद्सदविवेक बुद्धीचा विश्वस्त आणि आद्य सेवक म्हणून राजाला तनखा जरूर मिळाला पाहिजे; परंतु त्याबद्दल आग्रह किंवा तो हक्क आहे, असे मानू नये, असे गांधीजींनी भगवानराव यांना सांगितले.

त्यानुसार भगवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासाठी मॉरिस फिडमन यांनी राज्यघटनेच्या मसुदा तयार केला. त्यानुसार लोकशाहीचा प्रयोग औंध संस्थानात राबवला गेला. त्यालाच ‘औंध एक्सपेरिमेंट’ असे म्हटले गेले. याच नावाने हा प्रयोग देशभर प्रसिद्ध झाला.

औंधच्या राजाने आपली सत्ता लोकांच्या हाती सोपविण्याचे ठरवले आणि लोकांचे राज्य घोषित करण्याच्या कार्यक्रमात राजे रयतेला उद्देशून म्हणाले, ‘‘आता राज्य तुमचे. अधिकार, पैसा सुधारणा तुम्हीच तुमच्या हाताने करणार. लोकशाहीचा हा प्रयोग पाहण्यासाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनीही औंधला भेट दिली होती.

भगवानराव पंतप्रतिनिधी हे बाळासाहेब या नावानेही ओळखले जात. साहित्य, शास्त्र, उद्योग, कला, व्यायाम यांची त्यांना आवड होती आणि त्यापैकी अनेक गोष्टीमध्ये ते पारंगतही होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली होती. ते १८९७ ते १९०१ या कालावधीमध्ये संस्थानचे सरचिटणीस झाले. या काळात त्यांनी संस्थानावरचे सर्व कर्ज फेडून टाकले. ते १९०९मध्ये संस्थानच्या गादीवर आले. त्यांचे १९५१मध्ये निधन झाले.

व्यायाम आणि सूर्य नमस्काराचे ते विशेष प्रसारक होते. त्यांना कुस्ती, जोर व बैठकांचा छंद होता. दररोज ३०० सूर्यनमस्कार ते घालायचे.आपल्या संस्थानमधील मुलं शिकून मोठी व्हावीत यासाठी भगवानरावांनी भरपूर प्रयत्न केले. संस्थानमध्ये १९१६ पासून सक्तीच्या शाळा सुरू करण्यात आल्या.

मुलींची शाळा, रात्रशाळा, गुन्हेगारांची शाळा, प्रौढांची शाळा, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठीही शिक्षणाचे प्रयत्न केले. उद्योगात वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आश्रय देणे यावर भगवानरावांचा भर होता. किर्लोस्कर उद्योगाचे रोपटे याच संस्थानात रुजले. त्यांनी १९३०मध्ये औंध संस्थानात आशिया खंडातील पहिला ग्लायडिंग त्यांनी काढला.

गुन्हेगारांना आपली चूक सुधारण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क असावा अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांनी १९३९मध्ये स्वतंत्रपूर नावाची कैद्यांची खुली वसाहत सुरू केली. या खुल्या तुरुंगाबद्दल भारतभर नव्हे तर जगभर बोलले जाते. असा या समाजसुधारक मुलखावेगळ्या राजाला मानाचा मुजरा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com