esakal | राजधानी दिल्ली :  निष्क्रिय श्रेष्ठी अन्‌ अहंकारी नेते 
sakal

बोलून बातमी शोधा

राजधानी दिल्ली :  निष्क्रिय श्रेष्ठी अन्‌ अहंकारी नेते 

सचिन पायलट यांचे प्रकरण संपायचे तेव्हा संपेल. परंतु कॉंग्रेसश्रेष्ठींची निष्क्रियता आणि पडत्या काळातही अहंकारातून पक्षातील ऐक्‍य टिकविण्याबद्दलची बेपर्वाई यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे.

राजधानी दिल्ली :  निष्क्रिय श्रेष्ठी अन्‌ अहंकारी नेते 

sakal_logo
By
अनंत बागाईतकर

कॉंग्रेसची राज्य सरकारे भाजपकडून गिळंकृत होत असताना आणि पक्षाला खिंडार पडत असतानाही कॉंग्रेस "हायकमांड' "ठेविले अनंते'च्या ब्रह्मानंदात मग्न आहे. राजस्थानातील सचिन पायलट यांचे प्रकरण संपायचे तेव्हा संपेल. परंतु कॉंग्रेसश्रेष्ठींची निष्क्रियता आणि पडत्या काळातही अहंकारातून पक्षातील ऐक्‍य टिकविण्याबद्दलची बेपर्वाई यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे. 

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितलेली ही आठवण ! त्यांचे वडील काकासाहेब हे पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. दोघांमध्ये उत्तम संबंध होते. पण काही मुद्‌द्‌यांवरून मतभेद झाले आणि नेहरूंनी काकासाहेबांची बाजू न्याय्य असूनही काहीसा दुर्लक्षिण्याचा पवित्रा घेतला. स्वाभिमानी काकासाहेबांनी तडक मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नेहरूंना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रथम काही मध्यस्थांमार्फत काकासाहेबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आले नाही. मग एक दिवस नेहरू तडक काकासाहेबांच्या बंगल्यावर जाऊन थडकले. शिष्टाचार पाळून काकासाहेबांनी त्यांचे स्वागत केले. चहा आला. मग नेहरूंनी खडा टाकला की ते चहा घेतील, पण त्याआधी काकासाहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. नेहरूंनी राजीनामापत्र बरोबर आणले होते. मानी काकासाहेब राजीनामा मागे घेण्यास तयार होईनात. त्यांनी नेहरूंनाच सांगितले की तुम्ही पंतप्रधान आहात, राजीनाम्याचे काय करायचे त्याचा सर्वाधिकार तुम्हाला आहे. नेहरूंही अडून बसले. परंतु नेहरूंनी चतुराई दाखवली. तेथेच लहानगे विठ्ठलराव खेळत होते. नेहरूंनी "विठ्ठल, इधर आओ' म्हणून त्यांना बोलावले आणि राजीनामापत्र देऊन ते फाडण्यास सांगितले. मग काकासाहेबही विरघळले. पेच संपला ! पण आता कॉंग्रेसमध्ये ना काकासाहेब आहेत, ना नेहरू ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राजस्थानातील वर्तमान पेचप्रसंग आणि अडचणीत आलेले कॉंग्रेसचे सरकार पाहता या प्रसंगाची आठवण येते. या पेचप्रसंगात कॉंग्रेसचे हायकमांड काय करीत होते हे एक अनाकलनीय गूढ आहे. कॉंग्रेस हायकमांड म्हणजे कोण ? सध्या सोनिया, राहुल व प्रियांका हे तीन गांधी हेच कॉंग्रेसचे हायकमांड आहे. बाकीचे नेते "लो-कमांड'मध्ये सामील होतात. या हायकमांडपैकी केवळ प्रियांका गांधी याच बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या संपर्कात होत्या असे समोर आले आहे. परंतु कॉंग्रेस कुटुंबाच्या प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांनी काय केले किंवा अध्यक्षपद सोडल्यानंतरही पक्षाच्या प्रत्येक नेमणुकीमागे हात असलेले राहुल काय करीत होते याची माहिती मिळालेली नाही. कॉंग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांपैकी पी. चिदंबरम यांच्याशी सचिन पायलट बोलले असेही प्रकाशात आले. परंतु अन्य कुणी वरिष्ठ नेत्याने सचिन पायलट यांना समजावण्याचा प्रयत्न केला, असे समोर आलेले नाही. म्हणजेच भाजपच्या "कॉंग्रेसमुक्त भारत' मोहिमेत एकामागून एक कॉंग्रेसची राज्य सरकारे भाजपकडून गिळंकृत होत असताना आणि कॉंग्रेसला खिंडारे पडत असतानाही हे "हायकमांड' "ठेविले अनंते'च्या ब्रह्मानंदात मग्न आहे. अहंकार सोडून देऊन बंडखोरांना चुचकारणे, समजावणे आणि पक्ष शाबूत ठेवण्याची फारशी इच्छा या आत्मसंतुष्ट हायकमांडला दिसत नाही. त्यामुळे कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान यानंतर छत्तीसगडचा नंबर लागला तर आश्‍चर्य वाटायला नको ! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजस्थानातील राजकीय पेचप्रसंगाच्या विश्‍लेषणासाठी फार बुद्धी खर्च करण्याची आवश्‍यकता नाही. अतिमहत्त्वाकांक्षा आणि "स्व-उत्कर्षवादी'(करिअरिस्ट) दृष्टिकोन हे दोन घटक यासाठी कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेले आणि जमिनीशी नाते सांगणारे, तसेच शक्‍यतोवर सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. खालून वर आलेले नेते असल्यामुळे राजकारणातल्या खाचाखोचांची त्यांना पुरेपूर जाण आहे. सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळत होते. 2013 मध्ये गेहलोत यांचे सरकार निवडणूक हरले आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. त्या काळात सचिन पायलट यांनी पाच वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले ही त्यांची जमेची बाजू. 2018मध्ये भाजपचे सरकार हरले. त्यात कॉंग्रेसची मर्दुमकी फार नव्हती. वसुंधराराजे यांची मनमानी आणि भाजपमधूनच त्यांना असलेला प्रचंड विरोध यातून कॉंग्रेसला विजय मिळाला. पायलट यांना वाटू लागले, की हा विजय त्यांच्यामुळेच मिळाला आणि ती हवा त्यांच्या डोक्‍यात गेली. परंतु राजस्थानसारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याइतका वकूब त्यांच्यापाशी नव्हता व विशेषतः आक्रमक भाजपसमोर त्यांचा टिकाव लागणे अशक्‍य होते, हे ओळखूनच अनुभवी व मुरब्बी गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पायलट यांना शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच त्यांचे प्रदेशाध्यक्षपदही कायम ठेवण्यात आले. परंतु अशी दोन सत्ताकेंद्रे असल्यावर संघर्षही अटळ असतो. गेहलोत यांना पायलट नकोसे झाले आणि मतभेद व कुरबुरींनी सुरुवात झाली. पायलट यांनी या बाबी हायकमांडसमोर अनेकवेळा मांडल्या, परंतु हायकमांडने त्यात पुरेसे लक्ष घातले नाही. 

भारतीय राजकारणात तत्त्वनिष्ठा, पक्षनिष्ठा या बाबी आता कालबाह्य झालेल्या आहेत. आता केवळ "स्व-निष्ठा' आणि "स्व-उत्कर्ष' असे व्यक्तिवादी राजकारण झाले आहे. कॉंग्रेसमध्ये वाव आहे, तोपर्यंत लाभ घ्यायचा आणि भाजपमध्ये अधिक लाभ व आणखी काही आकर्षक "पॅकेज' असेल तर भाजपमध्ये प्रवेश करायचा असे प्रकार सुरू झाले आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे असंतुष्ट होते आणि अलगद भाजपवासी झाले. तीच कार्यपद्धती असंतुष्ट सचिन पायलट यांच्यासाठी वापरण्यात आल्याचे पुरावे समोर येत आहेत. पायलट यांनी ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलेले असले, तरी ते भाजपच्या संपर्कात नव्हते याबाबतच्या संशयाची सुई अद्याप त्यांच्याकडेच रोखलेली आहे. त्यामुळेच फारशा आमदारांचे पाठबळ नसताना पायलट यांनी हे वेडे साहस करण्याची आवश्‍यकता नव्हती. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार हे अक्षरशः काठावरच्या बहुमतातील सरकार होते आणि त्यामुळेच शिंदे यांना त्याचा फायदा मिळाला. राजस्थानात तशी स्थिती नाही. राजस्थानात पायलट यांना किमान तीस आमदार फोडावे लागणार होते आणि प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर तेरा- चौदाहून अधिक आमदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पायलट याची अवस्था आता "ना घरका, ना घाटका' अशी अधांतरी झाली आहे. भाजपमध्ये जाणार नसल्याचे जाहीर करून त्यांनी तो रस्ता बंद केला आहे. कॉंग्रेसमध्ये आता राहायचे असेल तर तडजोड करावी लागणार आहे आणि गेहलोत यांनी त्यांच्याकडे असलेल्या टेप्सच्या आधारे पायलट व भाजपमधील "लेनदेन' उघडकीला आणली, तर पायलट यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे पायलट यांनी बंडखोरी केली, पण त्याच्या इच्छित परिणामापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही हे त्यांचे दुर्दैव. येथे त्यांचे वडील राजेश पायलट यांची आठवण येते. तेही कॉंग्रेसमधले एक सततचे बंडखोर नेते म्हणून ओळखले जात. सीताराम केसरी यांच्या विरोधात त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. अनेक मुद्‌द्‌यांवर ते पक्षात विरोधी भूमिका घेत, पण त्यांनी कधी पक्ष सोडण्याची किंवा उघड बंडाची भूमिका घेतली नाही. कारण त्यांना त्यांची राजकीय कुवत पूर्ण माहिती होती. सचिन पायलट येथे चुकले आणि त्यांनी आततायी पाऊल उचलून आपल्या राजकीय कारकिर्दीवर आघात करून घेतला. 

पायलट यांचे प्रकरण संपायचे तेव्हा संपेल. परंतु कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची आत्मतुष्टता, निष्क्रियता आणि पडत्या काळातही अहंकारापोटी स्वतःच्या पक्षातील एकोपा टिकविण्याबद्दलची बेपर्वाई यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे. ही बाब पक्षाच्या भवितव्याबद्दल फारशी आशादायक नाही !