केवळ चांगले मन असून भागत नाही, त्याचा चांगल्या रीतीने वापर कसा होतो, ते महत्त्वाचे. — रेने देकार्त.प्रख्यात तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांचे War doesn`t determine who is right- only who is left हे मार्मिक वचन पुन्हा एकदा आठवल्याशिवाय राहात नाही. युद्धातून कोण खरे किंवा बरोबर हे ठरत नाहीच, फक्त कोण ‘उरले’ एवढेच कळते. सध्याच्या अमेरिका, इस्राईल विरुद्ध इराण या युद्धात तर ते जास्तच प्रस्तुत वाटते, याचे कारण जागतिक महासत्ता या युद्धात नेमकी का उतरली, याविषयीच संभ्रम आहे. हे युद्ध सुरू होऊन महिना झाला तरी या त्यामागचे नेमके राजकीय उद्दिष्ट काय, हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. रोज उलटसुलट विधाने करून ते संभ्रमात भर घालताहेत. कधी ते याला युद्ध म्हणतात, कधी फक्त संघर्ष, तर कधी केवळ लष्करी कारवाई. .कोविडच्या संकटातून हळुहळू सावरू पाहणाऱ्या जगाला या युद्धाने पुन्हा मागे नेले असून देशोदेशीच्या अर्थव्यवस्था आणि ऊर्जासुरक्षा त्याने धोक्यात आणली आहे. मानवी जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत असून या सर्वंकष विनाशातून काय साधले जाणार आहे? काही संवेदनशील आणि सुजाण नागरिकांना या प्रश्नाने छळले असेल तर नवल नाही. खुद्द अमेरिकेत व युरोपातील अनेक देशांत नागरिक रस्त्यावर येऊन ही भावना व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे इस्राईलमध्येही लोक सरकारच्या आणि युद्धाच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. त्याची दखल युद्धमग्न सत्ताधीश घेणार की नाही, असा प्रश्न आहे. सारे जग अपेक्षेने पाहात आहे ते अमेरिकेकडे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही तेथील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आहे. पण हा ‘ग्रेटनेस’ मिळविणार कसा? स्वैर विनाश आणि विध्वंस घडवून? अमेरिकेचे मोठेपण हे केवळ तिच्या डॉलरकेंद्री आर्थिक प्रभुत्वामध्ये कधीच नव्हते. बहुसांस्कृतिक आयाम असलेल्या अन् विविधतेने नटलेल्या या वसाहतीला आर्थिक वैभव मिळाले ते स्थलांतरितांमुळे, अमेरिकी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा गजर करत समतेच्या मूल्याचा आग्रह धरला होता. आज ती मूल्ये जाणणारी सुजाण जनता ट्रम्प यांना ‘‘तुम्ही राजे नाहीत, त्यामुळे मनमानीपणे निर्णय घेऊ शकत नाही,’’ असे सांगण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे..‘नो किंग्ज...’ हे आंदोलन देशोदेशीच्या नागरिकांच्या मनातील खदखद मांडते. ते सत्ताधीशांना त्यांची मर्यादा दाखवून देत घटनात्मक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करते. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस आणि ह्युस्टन आदी शहरांत लाखो लोक रस्त्यांवर उतरले. न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअर, वॉशिंग्टनमध्ये ‘लिंकन मेमोरिअल’ अन् ‘नॅशनल मॉल’चा परिसर गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत होता. ‘‘ट्रम्प यांच्याप्रमाणे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेड्या ठोका,’’अशी मागणी हे आंदोलक करत होते. याआधीही अनेकदा अमेरिकेत अशा प्रकारची आंदोलने झाली होती. याखेपेस या आंदोलनाचे केंद्र होते ते मिनेसोटा हे राज्य. मिनियापॉलिसच्या रस्त्यांवरही फेडरल एजंट्सनी केलेल्या गोळीबारामध्ये एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. खरे तर इस्राईलच्या साथीने इराणवर हल्ला करून ट्रम्प पुरते फसले आहेत. हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी अमेरिकी काँग्रेसलाही विश्वासात घेतले नव्हते. आयातशुल्काच्या बाबतीत तेथील सर्वोच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिल्यानंतरही ट्रम्प यांनी आडवळणाने खेळी करण्याचा प्रयत्न केला. आपण देश आणि राज्यघटनेपेक्षाही मोठे आहोत, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न यातून दिसतो. त्यामुळेच ‘‘सत्तेचा गैरवापर थांबा, ऱाज्यघटना जपा, कायद्याचे राज्य वाचवा आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घ्या’’, आदी मागण्या करत जनतेने आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे.’’.खरेतर चार- पाच वर्षांपासून अमेरिकेमध्ये हा असंतोष खदखदत आहे; पण ट्रम्प नेहमी डाव्यांच्या कारस्थानाचा ‘लाल शिक्का’ मारून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र त्यांना स्वतःचे तोंड लपविता येणार नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे निदर्शक म्हणजे त्यांचे ‘होमग्राउंड’ असलेल्या ‘पाम बीच डिस्ट्रिक्ट’च्या ‘स्पेशल स्टेट हाउस इलेक्शन’मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमिली ग्रेगोरी या विजयी झाल्या आहेत. ट्रम्प यांना हा मोठा धक्का मानला जातो. इतरही अनेक पोटनिवडणुकांत त्यांना धक्का बसला आहे. लोकप्रियता निर्देशांकाचा आलेखही खालावतो आहे. तरीदेखील लोकभावनांची दखल घेणे, त्यानुसार कारभारात बदल करणे वगैरे ट्रम्प यांच्या कारभारशैलीत बसत नाही. ते विजयाचा डंका पिटत आहेत. पण त्या आवाजाने लोकभावना दडपता येणार नाही. युद्ध करण्यात नव्हे थांबविण्यात ‘ग्रेटनेस’ आहे, हे महासत्तेच्या विद्यमान अध्यक्षांच्या गावीही नाही. त्यांना हे कोण समजावून सांगणार? तरीदेखील शांततेसाठी उमटत असलेला स्वर महत्त्वाचा आहे. तो आणखी बुलंद व्हायला हवा..युद्ध करण्यात नव्हे, तर टाळण्यात किंवा थांबविण्यात ‘ग्रेटनेस’ आहे, हे महासत्तेच्या विद्यमान अध्यक्षांना कोण समजावून सांगणार? युद्धविरोधी निदर्शनांची दखल ते घेतील, असे नाही. तरीही हा आवाज सर्वदूर उमटायलाच हवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.