अलिप्त होण्यातलं सुख

lonely
lonely
Updated on

लहानपणी गौरी-गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरी शुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ या ‘मी’पणाचा भारी अभिमान वाटे. एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ राहात नसून  ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून राहात. फुलांद्वारे ‘मी’पणादेखील नकळत देवाला अर्पण होत असे.
खरंच, किती क्षणिक असतं, ‘मी’पणाचं सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानानं म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’, ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त आयुष्यदेखील असंच असतं. या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की या ‘माझे’पणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात ‘माझे’पणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तींनादेखील सोडणं जमत नाही.
मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीचं नवीन सुनेने अंगीकारावं अशी तिची मनोमन इच्छा असते.
वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलानं व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करू देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.   आयुष्य जसंजसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू - सुनेचं पटत नाही, बाप लेकांत मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात आणि या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.
आयुष्यात ‘सोडणं ’जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन्‌ व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणीसुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर राहता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही. साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या ‘फेसबुक पोस्ट’ला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हॉट्‌सॲप’ पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीनं अलिप्त होता येईल. 
तसा प्रयत्न करून तर बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील  स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढगदेखील नसतील. रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्यानं बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... अलिप्तपणेच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com