शिवसेनेचे 'आदित्याय नम:'

Aditya_Thackeray
Aditya_Thackeray

तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी ठाकरे कुलोत्पन्न आदित्य हेच आपले भविष्य असल्याचा साक्षात्कार शिवसैनिकांना झाला आहे.

सौम्य स्वभावाचे, मुंबईतील उच्चभ्रू पण सुसंस्कृत झेव्हियर्स महाविदयालयात शिकलेले, आधुनिक, मध्यरात्रीही जीवनाची गतीमानता थांबवता येत नसते असा आग्रह धरणारे, नाक्‍यानाक्‍यावर जिम स्थापनेसाठी धडपडणारे आदित्य मोठे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेनेतल्या तमाम माताभगिनींनी अभिष्टचिंतन करताना आपण आता धुरा सांभाळाचे आर्जव केले आहे. पूर्वी ठाकरे कुटुंब सत्तेबाहेर राही, रिमोट कंट्रोल हातात ठेवी. आता असे तळ्याच्या काठावर पाणी राखत न बसता थेट आत उतरण्याची भाषा आहे. आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल असा दुर्दम्य आशावाद सामनाचे संपादक संजय राउत यांनी जाहीरपणे व्यक्‍त केला आहे. हा तसे पाहिले तर सेनेचा अंतर्गत मामला आहे.

तशीही शिवसेना ठाकरे घराण्याने जन्माला घातलेली, जोजवलेली, वाढवलेली संघटना. गावागावात ती फोफावली. मग त्यातून मराठी माणसाच्या हक्‍काची बात क(मा)रणाऱ्या हिंदुत्ववादी राजकीय पक्षाचा जन्म झाला. घराणेशाही भारतीय राजकारणाला नवी नाही. राजकारण्यांच्या मुलांकडे वारसाहक्‍काने सत्ता सोपवण्याचे काम भारतीय लोकशाही इमाने इतबारे पार पाडते. जगन रेडडी, नवीन पटनाईक, चिराग पासवान, स्टालिन, सुगत प्रकाश आंबेडकर, ममता बॅनर्जींचा भाचा नावांची यादी मोठी. घराणेशाही चिरायू ठेवण्याचे आन्हीक भारतीय मतदार पार पाडत असतो, नामदाराला नाकारुन चहावाला पंतप्रधानपदावर होण्याचा बदल प्रत्यक्षात आला आहे खरा, पण तरीही भारतीय लोकशाही क्षमाशील आहे, परंपरावादीही आहे. नेहरू-गांधी घराणे कॉंग्रेसमध्ये अन्य नेते असतानाही केंद्रस्थानी येत गेले. मग घराणेशाहीचे राजकारण भारतात बऱ्याच कुटुंबांनी चोखाळले. सख्खे-चुलत असे पाठभेदही झाले.

चुलते राज यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आदित्य यांचा जन्मदिन. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राज यांच्या निवासस्थानी जिथे गर्दी होते तिथे सत्तेचे हत्ती झुलत असणाऱ्या मातोश्रीवर नेते कार्यकर्ते गेले तर नवल ते काय? वाढदिवसाच्या यानिमित्ताने झाडून सगळे मंत्री आदित्य साहेबांना भेटायला गेले. पूर्वी नियंत्रण हाती ठेवत बाळासाहेब ठाकरेंनी प्रारंभी मनोहर जोशी अन् नंतर आक्रमक नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद सोपवले होते. आता काळ बदलला आहे. कमळाबाई कारभारीण आहे. नाते बदलल्याने उंबरठा ओलांडून आम्ही मोठे भाऊ असा गजर कमळ करते आहे ते ही आवाज न करता. अशा परिस्थितीत सेनेचे मनसबदार मोठ्या भावाच्या दरबारात गर्दी असल्याने वांद्रयात रमताहेत अन् त्याच वेळी आदित्याय नम:चे सूर्यनमस्कार घालताहेत. प्रश्‍न आहे तो आदित्य रवी मी म्हणण्याचे कसब बाळगतात का हा? पिताश्री उद्धव ठाकरेंनी आदित्यांच्या पितामहांनी बाळासाहेबांनी सोपवलेला पक्ष राखून ठेवला.

कर्तृत्ववान भावाच्या सभांनी ते ना विचलित झाले ना मोदींच्या झंझावातात उन्मळून पडले. भाजपलाटेत स्वत:चे अस्तित्व त्यांनी पडते घेऊन टिकवले. केंव्हा दोन पावले मागे पडायचे हे समजणे कला आहे. ती वडिलांनी साधली, मात्र कधीतरी पुन्हा आक्रमणाचे पवित्रा घ्यावा लागतो, त्यासाठी तयारी करावी लागते. रियाज आवश्‍यक असतो. आदित्य हे गुण बाळगतात का? सेनेच्या भविष्यासाठी ते महत्वाचे आहे. भारत हा तरूणांचा देश आहे. आजच्या मतदाराचे सरासरी वय महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही आदित्यच्या वयाशी बरोबरी साधणारे आहे. सभ्य तरूण म्हणून ही आदित्य यांची प्रतिमा. ते आदित्य संवाद नावाचा जो कार्यक्रम करतात त्यातही तशाच पदधतीने सामोरे येतात. तुलनाच करायची झाली तर राहुल गांधी तसेच आहेत. जवाहरलाल नेहरूंपासून निर्माण झालेली त्यांची परंपरा तर आदित्य यांची प्रबोधनकारांपासूनची. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्मतात त्यांच्या नशिबी संघर्ष येत नाही.

नेतृत्वाला धार चढत नाही. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या बातम्या जनुकीय वारशामुळे पसरतात, पण तेवढे पुरेसे नसते. त्या पलिकडे जावे लागते, झेप मोठी असावी लागते. दहावीच्या मुलांसाठी अतिरिक्‍त वर्ग काढा ही वरवरची मागणी. मराठी मुलांचे, मराठी समुदायाचे भले व्हावे, ते जागतिक स्पर्धेत टिकावेत याचे भान बाळगावे लागते. बाळासाहेबांनी ते मर्यादेत का होईना बाळगले अन तत्कालीन अमराठी आक्रमणावर कोरडे ओढत सेना निर्माण केली. आता काळ बदलला आहे. या घडीचे प्रश्‍न वेगळे आहेत.

रोजगार, गुंतवणूक, पर्यावरण, दुष्काळ या प्रश्‍नांची व्याप्ती विक्राळ आहे. वस्तुस्थिती पाहिली, तर शिवसेना ना मुंबईतील खड्डे बुजवू शकतेय, ना पुलाखाली हकनाक मरणारे जीव वाचवू शकतेय. भाजपला हिंदूत्व नाळ असलेला पक्ष प्रतिस्पर्धी म्हणून नको असल्याने शिवसेनेचे फावते आहे, ते स्पर्धेत उतरले तर काय होऊ शकते याची चुणूक मुंबईपालिका निकालांनी दाखवली आहेच. सेनेला भाजपचा उपग्रह न बनवता आदित्य यांना नावाप्रमाणे राजकारण आपल्याभोवती फिरवता येईल? नाही तर सैनिकांना तेजसाय नम: म्हणण्याची तयारी करावी लागेल. उत्तर काळ देईलच, तोवर मृदू स्वभावाच्या आदित्य यांना शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com