उद्योजकता आणि सामाजिक भान

उद्योजकता आणि सामाजिक भान

उद्योजकता जोपासताना सामाजिक भानही राखणाऱ्यांचे स्थान समाजात वेगळे असते. अशाच काहीशा वेगळ्या चौकटीत बसणाऱ्या ‘बायोकॉन’च्या संस्थापक-अध्यक्ष किरण मुझुमदार-शॉ यांना यंदा ‘अर्न्स्ट अँड यंग (इवाय) वर्ल्ड आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर २०२०’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती आणि कोटक महिंद्रा बॅंकेचे उदय कोटक यांच्यानंतर असा बहुमान मिळविणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय.

‘बायोकॉन’ या जैवऔषधी (बायो फार्मा) कंपनीच्या स्थापनेच्या रूपाने त्यांनी ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी...’चा प्रत्यय दिला आहे. एका सर्वसामान्य महिलेने दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगली तर काय होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून किरण मुझुमदार-शॉ यांच्याकडे पाहता येते. १९७५ मध्ये पदवीधर झालेल्या किरण यांना बिअर उद्योगक्षेत्रात ब्रूमेकर व्हायचे होते, पण या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ही इच्छा मागे ठेवली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत त्यांनी उद्योजकतेचे बीज रोवले.

बंगळूरमध्ये जागा भाड्याने घेऊन अवघ्या दोन सहकाऱ्यांसह जैवउत्प्रेरकांच्या (बायो एन्झाईम्स) कामाला त्यांनी सुरुवात केली. भांडवल होते अवघे ५०० डॉलर! ध्येयाने प्रेरित झालेल्या किरण यांनी पुढे अनेक अडचणींवर मात करून कंपनीचा पाया मजबूत करण्याबरोबरच तिला प्रगतीच्या मार्गावर नेऊन ठेवले. आज पाच अब्ज डॉलरची ही कंपनी १२० देशांत पंख पसरून आहे. सामाजिक कर्तव्य जपण्याचे भान त्यांनी ठेवले आणि त्यातूनच बायोकॉन फाउंडेशनची स्थापना केली. दुर्बल घटकांना आरोग्यसेवा देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय. २०१४ मध्ये शेअर बाजारात नोंदणी झालेल्या ‘बायोकॉन’ने पहिल्याच दिवशी एक अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आणि साऱ्यांचेच लक्ष वेधले. आज ही कंपनी अनेक पटींनी वाढत जाऊन आशियातील सर्वांत मोठी जैवऔषधी कंपनी ठरली आहे. त्यामागे अर्थातच किरण यांचे अथक प्रयत्न, दूरदृष्टी आणि ध्येयप्रेरित स्वभाव यांचा वाटा मोठा आहे, हे निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com