Boris Johnson
Boris Johnson

भाष्य : अमेरिकेपुढे हुजुरांची हुजरेगिरी

देशाचा नेता कसा असू नये, ही यादी दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यातले शिरोमणी. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी या महिनाअखेर येऊ घातलेले बोरिस जॉन्सन हे त्यापैकी एक. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटन ही एकमेव महासत्ता होती. महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि ब्रिटनच्या साम्राज्याच्या विलयाला प्रारंभ झाला. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या नव्या महासत्ता उदयाला आल्या.

जागतिक राजकारणात आपले स्थान टिकावे म्हणून ब्रिटनने अमेरिकेच्या वळचणीला जाणे पसंत केले. अमेरिकेत रोनाल्ड रेगन आणि ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर सत्तेत असतानाचे संबंध मधुचंद्राच्या पातळीवरचे होते. पहिल्या आखाती युद्धात जॉर्ज बुश यांच्या मागे टोनी ब्लेअर फरफटत गेले. तेव्हापासून ब्रिटनची आंतरराष्ट्रीय राजकारणातली पत आणि विश्‍वासार्हता कमी होत गेली. अठ्ठावीस सदस्यांच्या युरोपीय महासंघात जर्मनी आणि फ्रान्सचा दबदबा वाढत गेला, तसे ब्रिटनमध्ये विसंगत सूर बळकट होत गेले. त्या शिडात हवा भरून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी बोरिस जॉन्सन, निगेल फराज यांसारखे दुय्यम दर्जाचे राजकारणी मैदानात उतरले.

अमेरिकेत ट्रम्प यांनी अस्मितावादावर अध्यक्षीय प्रचार मोहीम हाती घेतली होती. त्यांचे अनुकरण करीत युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या मोहिमेला जॉन्सन वगैरेंनी वेग दिला. त्यातून जून 2016 मध्ये "ब्रेक्‍झिट'वर जनमत कौल घेण्यात आला. कौल निसटता आल्याने ब्रिटिश समाजातील दुही स्पष्ट झाली. त्यानंतरच्या तीन वर्षांत "ब्रेक्‍झिट'ची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. "ब्रेक्‍झिट'ने पहिला बळी जनमत कौल घेणाऱ्या पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा घेतला. त्यानंतर थेरेसा मे यांचा "ब्रेक्‍झिट' मसुदा संसदेने तीन वेळा फेटाळला. स्पष्ट बहुमत नसलेल्या सत्तारूढ हुजूर पक्षात मतैक्‍य राहिले नाही.

परिणामी, थेरेसा मे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. "ब्रेक्‍झिट'च्या मुद्‌द्‌यावर जो काही घोळ घातला गेला, त्यामुळे युरोपीय महासंघातच नाही, तर अवघ्या जगात ब्रिटनची बेअब्रू झाली. या मानहानीस बोरिस जॉन्सन आणि निगेल फराज प्रामुख्याने जबाबदार आहेत. युरोपीय महासंघाशी काडीमोड झाल्यानंतर ब्रिटनला अमेरिकेचा आधार अनिवार्य होता. परंतु, ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत सर किम डॅरॉक यांचा ई-मेल प्रकाशात आल्यानंतर ट्रम्प बिथरले. ट्रम्प यांनी थेरेसा मे आणि डॅरॉक यांच्यावर केवळ तोंडसुखच घेतले नाही, तर डॅरॉक यांना राजीनामा देण्यास भाग पडले आणि थेरेसा मे यांनाही नाचक्की सहन करावी लागली. लहरी ट्रम्प यांच्यावर विसंबण्यातील धोके जॉन्सन आणि फराज यांच्या लक्षात आले असतील. 

राजदूताच्या ई-मेल प्रकरणाचे उपकथानक आता पंतप्रधानपदाच्या स्पर्धेपेक्षा अधिक चर्चेत आले आहे. ट्रम्प यांच्या लहरी व खुनशी स्वभावाने त्यांचे अनेक मंत्री व अधिकाऱ्यांप्रमाणेच ब्रिटिश राजदूताचाही बळी घेतला आहे. राजदूत हा दोन देशांतील प्राथमिक पातळीवरील संवादाचे माध्यम असतो. नियुक्त असलेल्या देशातील राजकीय व अन्य क्षेत्रांतील घडामोडींवर लक्ष ठेवून आपल्या सरकारला विश्‍लेषणात्मक अहवाल देणे, हे त्याचे काम असते.

ट्रम्प यांच्या स्वभावातील दोष, त्यांच्या कार्यशैलीतील त्रुटींवर बोट ठेवणारा ब्रिटनच्या राजदूतांचा अहवाल फुटला. ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाचे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण ट्रम्प यांना सहन झाले नाही. या घटनेमुळे, पंतप्रधानपदी येऊ घातलेले जॉन्सन आणि ट्रम्प यांचे चाहते निगेल फराज यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आपल्या राजदूताची पाठराखण करायची की ट्रम्प यांची मर्जी राखायची, ही चिंता डॅरॉक यांच्या राजीनाम्याने दूर झाली असली, तरी भविष्यात अमेरिकेवर किती भरवसा ठेवायचा, याचा त्यांना विचार करावा लागेल. 

ट्रम्प आणि जॉन्सन (वय 55) यांच्यात थेट नाही, तरी काही प्रमाणात साम्य आहे. जॉन्सन यांचा जन्म न्यूयॉर्कचा. 2008 ते 2016 या आठ वर्षांत लंडनचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द चमकोगिरीसाठीच प्रसिद्ध होती. त्याआधी त्यांनी "टाइम्स', "टेलिग्राफ', "स्पेक्‍टॅटर' आदी वृत्तपत्रांत काम केले होते. त्यांचे पणजोबा तुर्की पत्रकार होते. व्यावसायिक अप्रामाणिकपणामुळे जॉन्सन यांची "टाइम्स'मधून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यांची पात्रता, चारित्र्य यांविषयी संशय आहे. राजकारणात प्रामाणिकपणा, सातत्य, निष्ठा, गांभीर्य हे गुण नेत्याला महनीय बनवतात. हुजूर पक्षात त्यांच्यासारखा निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला दुसरा नेता नाही.

युरोपीय संसदेच्या निवडणुकीत हुजूर, मजूर या प्रमुख पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकणाऱ्या आणि ट्रम्प यांचा भक्त असलेल्या निगेल फराज यांना ब्रिटनमध्ये सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांच्या ब्रेक्‍झिट पार्टीचे आव्हान मोडून काढण्यासाठी जॉन्सन हेच उपयुक्त ठरतील, अशी हुजूर पक्षातील कार्यकर्त्यांची भूमिका आहे. हुजूर पक्षाचे देशभरातील एक लाख 60 हजार पगारी सदस्य पक्षाचा नेता व भावी पंतप्रधान निवडणार आहेत. जॉन्सन यांनी त्यांच्यात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण केलेला दिसतो. 

अमेरिकेत ट्रम्प यांनी "स्टार पॉवर'च्या बळावर पारंपरिक राजकारण्यांवर मात केली. जॉन्सन यांच्यातही ती क्षमता आहे. मात्र जॉन्सन यांची विश्‍वासार्हता शंकास्पद आहे. अनेक भानगडीत ते अडकले होते. त्यांची उच्चभ्रू शैली सर्वसामान्य कष्टकरी वर्गात विश्‍वास निर्माण करू शकत नाही. लंडनचे महापौर असताना महानगरीय उदारमतवादी लोकांवर ते प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यांच्या अनुयायांना ते "रॉक स्टार' वाटत असले, तरी समाजातील मोठ्या घटकात त्यांच्याविषयी अविश्‍वास व घृणा आहे. "ब्रेक्‍झिट'च्या प्रचार मोहिमेत जॉन्सन यांनी खोटारडेपणा केल्याने युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांत त्यांच्याविषयी संशय व तिरस्कार आहे. "ब्रेक्‍झिट'साठी एकतीस ऑक्‍टोबर 2019 ही अंतिम मुदत असल्याने करार होवो अथवा न होवो, ब्रिटनला बाहेर काढूच असा त्यांचा निर्धार आहे. मात्र त्याचा देशाची अर्थव्यवस्था, सुरक्षाविषयक सहकार्य यावर कोणते परिणाम होतील, याची त्यांना चिंता दिसत नाही. 

डेव्हिड कॅमेरून यांच्यानंतर थेरेसा मे यांनी आत्मविश्‍वासाने सुरवात केली. परंतु नंतर त्या "ब्रेक्‍झिट'चे चक्रव्यूह भेदू शकल्या नाहीत. त्यातून केवळ सत्तारूढ हुजूर पक्षच नाही, तर अवघे ब्रिटन दुभंगले. जॉन्सन यांच्याविषयी स्कॉटलंडमध्ये तिरस्काराचीच भावना आहे. परंतु त्यांच्या अंध अनुयायांना स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड फुटले आणि हुजूर पक्ष रसातळाला गेला तरी जॉन्सन यांनाच पंतप्रधान म्हणून बघायचे आहे. थेरेसा मे "ब्रेक्‍झिट'च्या समर्थक नव्हत्या. परंतु पंतप्रधानपदी आल्यानंतर देशहितासाठी त्या झटल्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे आलेल्या नऊ इच्छुकांची संख्या देशाहितापेक्षा सत्ताआकांक्षेने झपाटल्याचेच स्पष्ट करते.

जॉन्सन यांच्याकडे जीवनाविषयक कोणतेही तत्त्वज्ञान नाही. त्यांच्यात वैचारिक अधिष्ठानाचा अभाव आहे. कामचलाऊ, दिखाऊ तंत्रात ते तरबेज आहेत. "ब्रेक्‍झिट'मुळे देशातील ध्रुवीकरणाचे धोके टाळण्याची, देश एकसंध ठेवण्याची कोणतीही कल्पना त्यांना मांडता आलेली नाही. युरोपीय महासंघाला झुकवू असा आव आणणाऱ्या या नेत्याची तडजोडीचा "ब्रेक्‍झिट'चा प्रस्ताव प्रतिनिधिगृहाच्या गळी उतरविताना कसोटी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com