मन मंदिरा... : लहान मुले नि भावनिक समतोल

मन मंदिरा... : लहान मुले नि भावनिक समतोल

लहानपण हा महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यात मुलांचा बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास व्हायला हवा. म्हणजे पौगंड, तारुण्य व प्रौढावस्थेतील समस्या टाळता येतील. ज्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या कणखर असतात त्यांच्यात विपरीत प्रसंगाला तोंड देण्याची, शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता असते. या व्यक्ती अस्वस्थ होत नाहीत असं नाही, पण त्या तत्काळ सावरू शकतात. या व्यक्ती समाधानी, आनंदी असतात. नवीन गोष्टी शिकायला, तसेच परिस्थितीनुसार स्वत:त बदल घडवायला त्या तयार असतात. इतर व्यक्तींशी जुळवून घेऊ शकतात. ही सर्व कौशल्ये आपण मुलांमध्ये निर्माण करू शकतो, ज्यायोगे ती कणखरपणे उभी राहू शकतील. 

शाळेतले ताणताणाव, गृहपाठ, परीक्षेचे दडपण, सहाध्यायी मित्रांचा ताण इत्यादी बाबतीत मुलांना मदतीची गरज असते. काही मुलांना, पालकांविषयी, तसेच घरगुती समस्यांविषयी बोलायचं असतं. त्यातल्या काही समस्या गंभीर असतात. या सगळ्यांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांची वागणूक, मूड, झोप, भूक, शैक्षणिक प्रगती, तसेच समाजात मिसळणे इत्यादींवर परिणाम दिसू लागतो. गेले काही दिवस मुले रडवेली, तणावपूर्ण, अस्वस्थ झाली आहेत. अशा वेळीा आपल्या समजावण्याने परिस्थिती बदलत नाही, असे जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

पुढील लक्षणे आढळल्यास मदत घ्या 

  •  अचानक परीक्षेत कमी मिळायला लागणे.
  • क्षुल्लक कारणावरून रडणे, निराश होणे. शाळेत शिकवलेले न समजणे, स्वत:च्या तंद्रीत राहणे, न्यूनगंड वाटणे, दिवास्वप्नात रमण्याची सवय.
  •  मोबाईल व कॉम्प्युटर गेम्सच्या आधीन होणे.
  •  बोलायला शिकणे, भाषेचे ज्ञान इत्यादी गोष्टी शिकायला वेळ लागणे.
  •  सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न.
  • अति चिडणे, राग राग करणे, अति खाणे किंवा कमी खाणे, खोटे बोलणे, अंथरुणात मूत्रविसर्जनाची सवय.
  •  एकटे राहणे, समूहात मिसळणे टाळणे.
  •  इतर मुलांना त्रास देणे किंवा त्यांचा त्रास मुकाटपणे सहन करीत राहणे.
  •   पूर्वी ज्या गोष्टी आवडायच्या त्यातला रस संपणे.
  •  अति प्रमाणात झोप किंवा कमी झोप.
  •   ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष शाळेत सततची अनुपस्थिती.
  •   डॉक्‍टरांनी काही झाले नसल्याचा निर्वाळा देऊनही पोटदुखी, डोकेदुखी वगैरेची तक्रार करणे.
  •   आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे नैराश्‍य.
  •   कुटुंबातील मृत्यू व ते वास्तव स्वीकारताना त्रास होणे.
  •  बॉम्बस्फोट, दंगली, अत्याचार वगैरेसारख्या सामाजिक घटना व ‘कोरोना’सारख्या साथींविषयी मनात निर्माण होणारी भीती.

मुलांसाठी वेगवेगळ्या उपचारपद्धती आहेत. Cognitive Behavioural थेरपीसारख्या आणि इतर थेरपीमध्ये नकारात्मक विचारांचे, सकारात्मक आणि परिणामकारक विचारपद्धतीत रूपांतर करायला शिकवले जाते. ताण नियोजनाच्या पद्धती, स्वस्थ होण्याचे प्रशिक्षण, श्वासावर आधारित ध्यानाच्या पद्धती, परिस्थितीला तोंड देण्याची कौशल्ये, आत्मविश्वास परत मिळवण्याची तंत्रे यांचाही उपयोग होतो. सकारात्मक स्वयंसूचनांचा उपयोग होतो.

पालकांसाठी सूचना

  • मुलांसमोर वादविवाद टाळावेत. मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांचे म्हणणे, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती अस्वस्थ असतील, समस्याग्रस्त असतील तेव्हा त्यांना मायेने जवळ घ्या.
  • स्वत: मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे मुलांसमोर आदर्श निर्माण होईल.
  • भोवताली घडणा-या सामाजिक दुर्घटनांविषयी (बलात्कार, बॉम्बस्फोट, दहशतवाद इ.), ‘कोरोना’सारख्या साथींविषयी मुलांना सौम्य शब्दांत समजावून सांगा. त्याविषयी त्यांच्या मनात अवास्तव भीती निर्माण होणार नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.
  • अयोग्य वर्तनाबद्दल मुलांसाठी काही शिस्तीचे नियम, तसेच वागणुकीची पथ्ये तज्ज्ञांच्या साह्याने ठरवून घ्या.
  • समस्यांच्या निराकरणाबरोबरच मुलांचा आत्मविश्वास, एकाग्रता व एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठीही तज्ज्ञ मदत करू शकतात. लहान मुलांसाठी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची त्यांची तयारी आपण करून घेऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com