esakal | भाष्य : ‘न्यू नॉर्मल’मधील माध्यमांचा चेहरा  
sakal

बोलून बातमी शोधा

media

‘कोरोना’ नंतरच्या काळात माध्यमांचा चेहरामोहरा कसा असेल याचा नेमका अंदाज बांधून मनुष्यबळ, सर्जनशीलता आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची हा यक्षप्रश्न येत्या काळात माध्यम जगाला सोडवावा लागेल.

भाष्य : ‘न्यू नॉर्मल’मधील माध्यमांचा चेहरा  

sakal_logo
By
डॉ. केशव साठये

‘कोरोना’मुळे निर्माण झालेली परिस्थिती ही माध्यम क्षेत्रातील व्यवस्थापन, माध्यमकर्मी, ग्राहक आणि जाहिरातदार या सर्वांचीच कसोटी पाहणारी असली तरी ती कायम राहणार नाही. कालांतराने त्यात अनुकूल बदल होतील याचे भान ठेवायला हवे. बदललेल्या परिस्थितीची दखल घेऊनच माध्यम विश्वाला पुढील वाटचाल करावी लागेल.

गुगल कंपनी पुढील पाच- सात वर्षांत भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आणि ‘जिओ’ने ‘५ जी’ तंत्रज्ञानाची केलेली घोषणा हा निश्‍चितच योगायोग नाही. जागतिक पातळीवर काम करणारे व्यावसायिक असा निर्णय घेतात, तेव्हा त्यामागे पुढच्या दहा वर्षांचे समाजचित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असते. या दोन्ही घटनांचा थेट परिणाम माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यम जगावर होणार हे निश्‍चित. क्‍लाऊड टेक्‍नॉलॉजीचा वापर, इंटरनेटचा वाढता वेग ही याची वैशिष्ट्ये ठरतील. शिक्षण, प्रबोधन, करमणूक यांचा नवा अवतार यातून समोर येण्याची दाट शक्‍यता आहे. ‘कोरोना’ नंतरच्या काळात माध्यमांचा चेहरामोहरा कसा असेल याचा नेमका अंदाज बांधून मनुष्यबळ, सर्जनशीलता आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची हा यक्षप्रश्न येत्या काळात माध्यम जगाला सोडवावा लागेल. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्राधान्याने विचारात घ्यावी लागेल, ती म्हणजे गेल्या काही काळात प्रेक्षक, वाचक यांच्या बदललेल्या सवयी. हीच सवय आता माध्यम आणि विपणन क्षेत्राला कलाटणी देणारी ठरू शकते. ‘कोरोना’काळ संपल्यानंतर या बदललेल्या सवयीला पूर्वपदावर कसे आणायचे याला प्राधान्य द्यावे लागेल. प्रेक्षक/वाचक संशोधन हा विपणनाचा मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले चार -पाच महिने सुरू असलेल्या साथीच्या थैमानाने माध्यम व्यवसायाचे कंबरडे मोडले आहेच आणि हा आणीबाणीचा काळ आणखी किती महिने चालणार याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेही नाही. पण बदललेल्या परिस्थितीची दखल घेऊन माध्यम विश्वाला पुढील वाटचाल करावी लागणार हे निश्‍चित. यात जमेची बाब म्हणजे याचा मोठा परिणाम झाला आहे, तो कावळ्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यम क्षेत्राला. केवळ भांडवल आहे म्हणून व्यवसायात उतरलेल्यांना कौशल्यशून्य कारभाराचे मोठे फटके बसायला सुरुवात झाली आहे. ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. प्रेक्षक आणि वाचकांसाठी हा मोठा लाभ आहे. कारण जलपर्णी काढल्याशिवाय नितळ पाणी दिसत नाही, ते आता दिसू लागेल. जी माध्यमे आपल्या कार्यसंस्कृतीवर आणि उच्च व्यावसायिक मूल्यांवर मार्गक्रमण करत आहेत, त्यांच्यासमोरही आव्हाने नाहीत असे नाही. मुख्य आव्हान आहे ते जाहिरातींचे. टीव्ही माध्यमात ३० टक्के जाहिरातींचा ओघ कमी झाला असून, गेल्या वर्षीपेक्षा ३६ टक्‍क्‍यांची घट सध्याच्या कालावधीत नोंदली गेली आहे. नियमित जाहिरात करणाऱ्या ३५ टक्के कंपन्यांची अनुपस्थिती हा काळजीचा विषय आहे. लॉकडाउनमुळे टीव्ही माध्यमाकडे नागरिकांचा ओढ वाढताना दिसला. पंचवीस ते चाळीस टक्के प्रेक्षकांमध्ये वाढ झालेली दिसली, पण जाहिरातदार मात्र फारसा प्रतिसाद देत नाहीत असे दिसले. म्हणजे ‘टीआरपी’ हा मुद्दा ‘कोरोना’ने निष्प्रभ केल्याचे दिसते. माध्यमातल्या अशा अनेक ‘अंधश्रद्धा’ या निमित्ताने हळूहळू संपुष्टात येताहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सर्वसाधारणपणे सर्व माध्यमांमध्ये ५० ते ६० टक्के जाहिरातींचे उत्पन्न कमी झाले आहे. या माध्यमांना आता नव्या युक्‍त्या- प्रयुक्‍त्या करून तोटा होणार नाही अशी व्यूहरचना करावी लागत आहे. त्याचा परिणाम दर्जावर, आशयसंपन्नतेवर पडणार नाही ही कसरतही करावी लागत आहे. आपला वाचक /प्रेक्षक टिकवणे हा यातला कळीचा मुद्दा असेल. कारण आर्थिक संकटामुळे वाचक हा ग्राहकाच्या भूमिकेत गेला आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीतून आलेला चोखंदळपणा आणि शेलकी निवड हा यात महत्त्वाचा निकष ठरू शकतो. गर्दीचे ठिकाण, चित्रपट, नाट्यगृहांमध्ये जाण्यास प्रेक्षकांची मानसिकता तयार होण्यास बराच कालावधी लागू शकतो. प्रेक्षकांचा, ग्राहकांचा वर्षानुवर्षे केलेला अभ्यास आता माध्यम संशोधन संस्थांना पुन्हा करावा लागेल. भीती, शंका, सुरक्षेला प्राधान्य, मानसिक ताणताणाव नियोजन अशा अनेक बाबींवर काम करून बदलत्या माध्यम पर्यावरणाचे प्रारूप तयार करावे लागेल. ‘नेटफ्लिक्‍स’, ‘अमेझॉन प्राईम’,‘हॉट स्टार’ यासारख्या संकेतस्थळांना सध्या मोठी मागणी दिसते. पण त्यासाठी आवश्‍यक तो आशय पुरवठा, निर्मिती यांच्यावरील बंधनांचे काय करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विशेषतः चित्रपट, मालिका क्षेत्रात अंतराचे, कलाकार संख्येचे, वयोगटाचे अनेक प्रतिबंध असल्यामुळे होणारी निर्मिती कितपत प्रभावी असेल याबद्दलही साशंकता वाटते. हे ‘न्यू नॉर्मल’ म्हणावे एवढे नॉर्मल राहणार नाही हे निश्‍चित. ‘डिजिटल इंडिया’ हा माध्यम क्षेत्राचा पुढचा महत्त्वाचा पल्ला आहे, हे मान्य करूनही करमणूक क्षेत्रातील नाटक, चित्रपटगृहातील चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम ऑफलाइन माध्यम व्यवहार आजही जनमानसात आपले वैशिष्ट्य टिकवून आहेत. ते अधिक लोकाभिमुख कसे करता येतील, त्यामधील त्रुटी कमी करून त्यांचे आकर्षण कसे टिकवून ठेवता येईल यावर माध्यमकर्मी मंडळींना काम करावे लागेल. यावरचा प्रभावी उपाय असा दिसतो की प्रसारमाध्यमांना पुढील काळात जाहिरातींच्या उत्पन्नाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ‘पे वॉल’सारखे प्रयोग पाश्‍चात्य देशांत सुरू आहेत. वर्गणीदार हाच उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असला पाहिजे, जाहिराती नाही हे या मागचे धोरण आहे. हेच धोरण वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या यांच्या बाबतीतही वापरता येईल. दर्जेदार आशय हाच माध्यम विश्वाचा कणा असायला हवा ही भावना आता सार्वात्रिक होण्याची गरज आहे. फुकट मिळणारे किंवा अल्प किंमतीत मिळणारे बहुतेक सत्वहीन असते याचा अनुभव सर्वच क्षेत्रांत येतो, माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मोफत हवे ही मानसिकता बदलून मूठ सैल करण्याची तयारी आता सर्वांनीच करायला हवी. 

या क्षेत्रासाठी २००२ ते २०१३ हा कालावधी जागतिक मंदीचा ठरला. यापुढील काळ हा अधिक अक्राळविक्राळ स्वरूपात समोर उभा ठाकणार आहे. माध्यमकर्मींच्या नोकऱ्यांमधील सुरक्षितता हा मुद्दाही ‘कोरोना’नंतरच्या काळातही महत्त्वाचा ठरेल. राष्ट्रीय पातळीवर एक हजाराहून अधिक अर्धवेळ/पूर्ण वेळ पत्रकारांचा रोजगार गेल्या १२- १५ महिन्यांत गेला. काहींच्या नोकऱ्या वाचल्या, पण पगारात कपात झाली आहे. द वॉल्ट डिस्ने कंपनीसारख्या मातब्बर संस्थेनेही स्वेच्छा वेतनकपातीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे. जगभरात थोड्या- फार फरकाने हीच परिस्थिती आहे. या खडतर वाटेवरून मार्ग काढत माध्यम विश्वाला पुढे जायचे आहे.  सध्या निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही माध्यम क्षेत्रातील व्यवस्थापन, माध्यमकर्मी, ग्राहक आणि जाहिरातदार या सर्वांचीच कसोटी पाहणारी असली, तरी ती कायम राहणार नाही. कालांतराने त्यात अनुकूल बदल होतील याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. विशेषतः आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांनी समोर दिसणाऱ्या तात्कालिक विदारक चित्राकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याची गरज आहे. कपात, आमूलाग्र धोरण बदल, मनुष्यबळाकडे नकारात्मकतेने पाहणे हा त्यावरचा उपाय नाही. कार्यक्षम आणि सर्जनशील मनुष्यबळ ही माध्यम जगाची सर्वात मोठी संपत्ती असते. तिला प्रशिक्षित करणे, कामाचा अनुभव देणे यात केलेली गुंतवणूक माध्यम संस्थांनी विचारात घेतली पाहिजे आणि ‘कोरोना’नंतरचे माध्यम जग अधिक संवादी, सकारात्मक, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण असेल याची ग्वाही दिली पाहिजे.

loading image