सारांश : आज आचार्य अत्रे असते तर..?

Aacharya Atre
Aacharya Atre

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आज (13 जून) आपल्यातून जाऊन पन्नास वर्षे झाली. तरीही, जेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनात ढोंगबाजी, खोटेपणा जाणवतो; तेव्हा तेव्हा अनेक जण "आज आचार्य अत्रे असते तर?' असे उद्‌गार काढतात. विनोदाचा अस्त्र म्हणून प्रभावी वापर करणाऱ्या अत्रे यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्से. 

झाले बहु होतील बहु; पण आचार्य अत्रे यांच्यासम तेच. मराठी विनोदाचा पाया रचणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरू होते. श्रीपाद कृष्णांनी पाया घातला. त्यांच्या शिष्याने चौथरा उभा केला. चिं. वि. जोशी, दत्तू बांदेकर, गंगाधर गाडगीळ, रमेश मंत्री, सुभाष भेंडे, जयंत दळवी आदींनी विनोद मंदिराचा गाभारा उभारला. पु. ल. देशपांडे यांनी विनोद मंदिराचा कळस उभारला आणि अत्रे म्हणजे विनोद मंदिराच्या कळसावरील फडकती पताका होय. 

विनोद हा आचार्य अत्रे यांचा स्थायीभाव. प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ, कल्पनानिष्ठ; विरोधाभासातून निर्माण होणारा विनोद, कलाटणी किंवा कडेलोटी विनोद आदी अनेक प्रकारांची मुक्त उधळण ते करीत. "कळ्यांचे निःश्‍वास' या मालतीताई बेडेकरांच्या पुस्तकावर "विविध वृत्ता'ने खटला भरला होता. त्यासंदर्भात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ऍम्फी थिएटरमध्ये विद्यार्थ्यांसमोर आचार्य अत्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अत्रे यांनी व्याख्यानास सुरवात केली आणि "सभ्य गृहस्थ हो!' असे म्हटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्याने "ओऽऽओ' असा जोरदार आवाज टाकला. त्यावर अत्रे म्हणाले, "तुम्हाला नाही; मी सभ्य गृहस्थांना उद्देशून बोललो होतो.' या प्रत्युत्तराने एकच हशा पिकला. मोठ्याने ओरडणारा श्रोता खजील झाला.

धिप्पाड शरीरयष्टीचे अत्रे एकदा पुण्याच्या पर्वतीवर पायऱ्या चढून चालले होते. थोड्याच वेळात त्यांना दम लागला आणि ते धापा टाकू लागले. हे पाहून एका 75 वयीन ज्येष्ठाने त्यांना डिचवले, "अहो, काय हे अत्रे; एवढ्यात दमलात? मी चारवेळा पायऱ्या चढून उतरतोय. अजूनही दोन वेळा चढून दाखवीन. काय द्याल मला?' त्यांचा आगाऊपणा झटकन उतरवीत अत्रे उत्तरले, ""देईन ना खांदा!'' 

स. का. पाटील संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक. त्यांची चेष्टा करण्याची एकही संधी आचार्य अत्रे सोडत नसत. स. का. पाटलांनी मुंबई मराठी जनतेला मिळणार नाही, अशी गर्जना केली होती. त्यामुळे अत्रे यांचा त्यांच्यावर राग होता. एका सभेत बोलताना, "दोन चांगल्या गोष्टींत एखादी वाईट गोष्टही घडते,' असे सांगून अत्रे म्हणाले, ""13 ऑगस्टला माझा जन्म झाला. म्हणजे 13 ऑगस्टला विनोद जन्माला आला. 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. या दोन चांगल्या गोष्टी झाल्या. पण, 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले..!'' 

एकदा एका सभेत तीनशे-चारशे पांढऱ्या टोप्या घातलेले खादीधारी कॉंग्रेसजन आचार्यांच्या सभेला आले. भाषणात व्यत्यय आणण्याचाच त्यांचा इरादा होता. त्यांनी प्रश्‍नांचे चिठोरे आचार्यांना देऊन, "या प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय आम्ही तुमची सभा होऊ देणार नाही,' असे सांगितले. अत्रे म्हणाले, "बरे आणा तुमचे प्रश्‍न.'

प्रश्‍न पुढीलप्रमाणे : 

1. तुम्ही दारू पिता की नाही?

2. तुमचे वनमालेशी प्रेमसंबंध होते की नाही?

3. तुम्ही असे का केले?

अत्रे शांतपणे म्हणाले, "ठीक आहे. तुमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय मी सभा सुरू करणार नाही. 
1. तुमचा पहिला प्रश्‍न : मी दारू पितो की नाही? "होय, मी दारू पितो!'' 
2. तुमचे वनमाला यांच्याशी प्रेमसंबंध होते की नाही? "होय, माझे प्रेमसंबंध होते.'' 
लोकांना वाटले आचार्य अत्रे हरले. त्यांनी कबुली दिली. माघार घेतली. सभा निःशब्द. सर्वांच्या नजरा अत्रे यांच्यावर खिळलेल्या. आता अत्रे काय बोलणार, याकडे सगळ्यांचे कान. त्यांनी मोठा पॉज घेतला... अन्‌ मग म्हणाले, "होय, पण त्या वेळी मी कॉंग्रेसमध्ये होतो ना...'' त्याबरोबर सभेमध्ये प्रचंड हशा पिकला. सभा दणक्‍यात पार पडली. विरोधासाठी आलेले कधी निघून ते कळलेही नाही. 

बेळगाव महाराष्ट्राचे की कर्नाटकचे, हा वाद जोरात होता. निजलिंगप्पा म्हणाले, "बेळगाव असेल महाराष्ट्राचे; पण वाढविले आम्ही, म्हणजे कर्नाटकने.' त्याचा समाचार घेताना अत्रे म्हणाले, "पूर्वी गावागावांत भिंतीवर डोंगरे बालामृताच्या पाट्या सबंध भिंतीवर रंगवीत असत. आया आपल्या बाळाला डोंगरे बालामृत पाजीत. तरी डोंगरे म्हणत नसत, की आम्ही बाळाला वाढविले. त्याचे बाळसे आम्हीच धरले...' या दणकेबाज प्रत्युत्तराने सभेला आलेल्यांची हसून मुरकुंडी वळे. साऱ्या महाराष्ट्राला हसायला ज्या आचार्य अत्रे यांनी शिकविले; त्या आचार्य अत्रे यांच्यावर अश्‍लीलतेचा आरोप केला जातो. तसे असेल, तर सध्याच्या काळातील विनोदाला आपण काय म्हणाल? अत्रे यांनी ज्या बुद्धिप्रधान माध्यमातून विनोद केले, ते माध्यम कधीही अश्‍लील नव्हते. 

आचार्य अत्रे स्वतः हसत जगले, आपल्याला हसविले. हसता हसताच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपण मात्र रडलो आणि दैनंदिन आयुष्याच्या धबडग्यात अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर म्हणत राहिलो, 'आज आचार्य अत्रे असते तर..?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com