मुंबई, पुण्यात जोरदार पाऊस; मराठवाडा मात्र हवालदिल

दयानंद माने
Friday, 5 July 2019

जून महिना संपला तरी मराठवाड्यात सर्वदूर असा समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाचे आगमन लांबल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीची अशी अवस्था असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर होणार आहे. 

नेहमीपेक्षा खूप उशिरा दाखल झालेला मॉन्सून अखेर मुंबई आणि कोकणावर अक्षरशः बरसला. केरळमध्ये एक जूनला नित्यनेमाने येणारा मॉन्सून यंदा आठ जूनला, तर महाराष्ट्रात सात जूनला येणारा मॉन्सून पंधरा जूनच्यादरम्यान येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि मॉन्सून महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई व कोकणात यायला जूनची 20-21 तारीख उजाडली. उर्वरित महाराष्ट्रावर मात्र तो अजूनही रुसलेला आहे. त्यातच यंदाचा पाऊस साधारण असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे मराठवाडा, विदर्भातील सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले. जून महिना संपला तरी मराठवाड्यात सर्वदूर असा समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

जूनमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 131 मि.मी., जालना 138 मि.मी., परभणी 126 मि.मी., हिंगोली 168 मि.मी., नांदेड 168 मि.मी., बीड 128 मि.मी., लातूर 145 मि.मी., तर उस्मानाबाद जिल्ह्यात 163 मि.मी. पाऊस पडला आहे. म्हणजे वार्षिक सरासरीच्या केवळ दहा टक्के पाऊस मराठवाड्यात आतापर्यंत झाला आहे. 

खरिपाच्या पेरण्या धोक्‍यात 
पावसाअभावी एकूणच मराठवाड्यातील स्थिती भयावह वाटावी अशी आहे. पावसाचे आगमन लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्रासारखे हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्याने 'आर्द्रा'वर अपेक्षा होत्या. मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा असलेले हे नक्षत्रही अनेक ठिकाणी कोरडे गेले, तर काही ठिकाणी रिमझिम बरसले. या रिमझिमीवर व पुढील काळातील पावसावर आशा ठेवून काही भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. प्रमुख पिकांपैकी असलेल्या मूग व उडीद या पेरणीचा काळ सात जुलैपर्यंतच असतो.

तसेच कापूस व सोयाबीनची लागवड जुलैपर्यंतच करता येणार आहे. मात्र या तारखा जवळ येत असल्याने व पुरेसा पाऊस न झाल्याने सबंध मराठवाड्यात खरिपाच्या पेरण्याच धोक्‍यात आल्या आहेत. जून सरला तेव्हा अवघ्या मराठवाड्यातील केवळ 21 तालुक्‍यांत पेरणीयोग्य पाऊस झाला होता. शेतकऱ्यांनी आपल्या भागात किमान 75 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, अशी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सूचना केली आहे. मात्र असा पाऊस फार कमी तालुक्‍यांत पडला आहे. 

नांदेड जिल्ह्यावर दुहेरी संकट 
शेतीची अशी अवस्था असताना मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर होणार आहे. यंदा उन्हाळ्यात 47 अंशांपर्यंतचे तापमान सहन केलेल्या मराठवाड्याने कडक पाणीटंचाईला तोंड दिले आहे. तब्बल साडेतीन हजारांवर टॅंकरद्वारे यंदा पाणीपुरवठा करावा लागला. आता ही संख्या घटून तीन हजारांवर आली आहे. मराठवाड्यातील सर्व नद्या व धरणे कोरडी पडली असताना नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक जुलैला उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात पाणी नसले तरी केंद्रीय जल आयोगाच्या निर्णयानुसार दरवर्षी हे करावे लागते. त्यामुळे यापुढे पावसाचे पडलेले सर्व पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्यामुळे नांदेड जिल्हा व पर्यायाने मराठवाड्यावर दुहेरी संकट ओढवणार आहे. 

औरंगाबाद, लातूर, नांदेड व मराठवाड्यातील सर्वच शहरे, गावे, 
वाड्यावस्त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न आताच गंभीर अवस्थेत पोचला आहे. पुढच्या काळात पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरविली, तर अनेक प्रश्‍न उभे राहणार आहेत. राज्याच्या अन्य भागांत उपलब्ध होणारे जादा पाणी दुष्काळग्रस्त भागाला पोचविण्यासाठी शाश्‍वत अशी पाणी योजना तातडीने अमलात आणावी लागेल. ही परिस्थिती हाताळण्यासाठी ठाम राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about drinking water and Monsoon situation in Marathwada written by Dayanand Mane