सारांश : गड, किल्ल्यांवरील इतिहास जिवंत व्हावा!

शशिकांत ओक (निवृत्त विंग कमांडर)
Saturday, 15 June 2019

गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे.

गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे.

भारतीय इतिहासातील राजकारण व राज्य कारभारात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राजघराण्यातील संघर्ष आणि सत्तांतर यांमधील घटनांत गड आणि किल्ले यांचा संदर्भ महत्त्वाचा असतो. ते इतिहासाच्या नोंदीतून प्रत्ययास येते. काळाच्या ओघात गड, किल्ले, जलाशय, विहिरी, बुरूज, खंदक, स्तंभ, दगडी तोफा, ढाल-तलवारी, हत्ती, घोडे, रथ, अंबाऱ्यांची उपयुक्तता कमी झाली किंवा पूर्णपणे संपुष्टात आली. कालांतराने ते सर्व दुर्लक्षित राहिलेल्या साधन सामग्रीमुळे आपली ऐतिहासिकता गमावून बसले आहेत. वास्तविक गड किंवा किल्ला हे सैन्याचे अविभाज्य घटक आहेत; परंतु सध्या सर्व किल्ले, गड, त्यावरील शस्त्रसंभार, यांच्यापासून भारतीय सेना दले संपूर्णपणे तुटलेली आहेत. पर्यटकांना मौजमजा करून मुद्दाम किंवा नकळत आपण अनेक ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड होते आहे, याची जाणीव नसते.

पर्यटकांना इतिहासातील घटना व गड किंवा वास्तूंची ओळख करून देणारे कुठे कुठे फलक असतात, ते वाचायला फार लोक जाताना दिसत नाहीत. सध्या गड आणि अन्य स्थळे "पिकनिक'ची ठिकाणी झाली आहेत. म्हणून त्यांना ऐतिहासिक पर्यटनस्थळांत रूपांतर करण्यासाठी आपणास काय करता येईल? या सर्वांवर मात करण्यासाठी काही उपाय आहेत का?

मला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, ते असे :- 

1) गड आणि किल्ले हे सैनिकी पर्यटनस्थळे म्हणून विकसित करायला हवीत. पडलेल्या बुरुजाच्या किंवा तटबंद्या दुरुस्त करून पुन्हा त्याच दिमाखात बनवून वास्तूंची शान मिळवता येईल; परंतु सध्याच्या पुरातत्त्व विभागातील कार्यपद्धती आणि त्यांच्याकडील तुटपुंज्या आर्थिक तरतुदी व मनुष्यबळ वगैरे बाबी लक्षात घेऊन असे बांधकाम शक्‍य होईल असे नाही; परंतु संगणकाच्या मदतीने या वास्तूंची त्रिमितीय पद्धतीने काल्पनिक निर्मिती करायला हवी. ती माहिती वास्तूपाशी इतिहासातील एक एक घटना जिवंत करून त्या त्या गड किंवा किल्ल्यांची महती गाता येईल.

2) गड-किल्ल्यांवर अनेक ठिकाणी तोफा काही तोफगोळे, इतरत्र कुठेही पडलेल्या अवस्थेत दिसतात; पण ती शस्त्रे कशी वापरायची किंवा युद्धात वापरली जात होती, याचे प्रात्यक्षिक द्यायला लागणारी यंत्रणा व साधनसामग्री नसते. जर या साधनांचा वापर करून त्यांच्या उपयुक्ततेची चाचणी सैनिकी तळांवर केली गेली आणि त्याच्या चित्रफिती तयार करून पर्यटकांना माफक दरात दाखवायची व्यवस्था केली तर इतिहास खऱ्या अर्थाने जिवंत होईल.

3) सध्या पर्यटकांना सोईस्कर पाणी व भोजनाची, चटक-पटक खाण्यासाठी अनेक स्टॉल, हॉटेल कार्यरत आहेत. मात्र जर तशी सोय नसेल तर? ज्या वेळी या वास्तू ऐतिहासिक काळातील माणसांनी, गरजेच्या वस्तूमुळे गजबजलेल्या असतील, तेव्हा तिथल्या लोकांना पाणीपुरवठा योजना, धान्य साठवण, मलनिस्सारण व्यवस्था कशी करण्यात येत असे? याचे वर्णन व प्रात्यक्षिक सैन्य दलातील सध्याच्या परिस्थितीत कसे होते, ते कसे बदलत गेले, यांच्या चित्रफिती तयार करण्यात याव्यात.

4) युद्ध साहित्य मुख्यतः तोफा, दारूगोळा व हातघाईवर कामाला येणाऱ्यात तलवारी-ढाली, अन्य धारदार शस्त्र कुठे बनवली जायची? समजा त्या काळात खडे 10 लाख सैन्य होते, तर त्यांना प्रत्येकी कमीत कमी 4-5 तलवारी लागतात असे धरून 50 लाख तलवारी व ढाली यांचे कारखाने कुठे कुठे होते. त्याला लागणाऱ्या धातूच्या खाणी कुठे होत्या? आहेत? त्यांवर नियंत्रण करायला लढाया झाल्या का? ही सर्व माहिती उपलब्ध व्हायला हवी.

5) तंबू, तात्पुरते बांधकाम व सैनिकी शस्त्रे, त्यांच्या दिमतीचे हत्ती, घोडे, उंट व अन्य जनावरे यांचे त्या वेळी अनन्यसाधारण महत्त्व होते. त्याची नीट कल्पना अभ्यासकांना, पर्यटकांना आणि सर्वसामान्य जिज्ञासूंना करून द्यायला हवी.

6) टपाल आणि निरोप घेण्या-देण्याची व्यवस्था, लेखी करार पत्रव्यवहार, शेतसारा भरायची व त्यांच्या नोंदणीची सोय या सर्व विविध संकल्पनांवर अनेक छोट्या-छोट्या शॉर्ट फिल्म काढायला व त्यांच्या माफक दरात दाखवायला ठेवून वस्तूंची देखभाल करायला लागणाऱ्या धनाचा विनियोग करता येईल.

7) जाणता राजा हे भव्य नेत्रदीपक नाट्य मंच प्रत्येक वेळी करणे शक्‍य होईल असे नाही; परंतु या नाट्यमय अनुभवाची सोय गडांवर किंवा वस्तुसंग्रहालये आणि अनेक शिवप्रेमी संस्थांना उपलब्ध करून देण्यात याव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Fort Situation written by Shashikant Oak