तरसांच्या शोधात... 

taras
taras

तरस हा काहीसा दुर्लक्षित प्राणी. फारसे संशोधन न झाल्याने तरसांविषयी जास्त माहिती नाही. पुण्यातील उत्साही वन्यजीव अभ्यासकांनी मयूरेश्वर अभयारण्यात तरसांचा अभ्यास केला. तरसांचे जीवन, प्रजनन आदींसह त्यांच्या अस्तित्वापुढील आव्हानेही त्यांनी आपल्या ‘हायना डायरी’त मांडली. जैवविविधतेसाठी सर्वच प्राण्यांचे अस्तित्व महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला. 

डिसेंबर २००९च्या हिवाळ्यातील रात्र. पुण्यापासून ७२ किलोमीटरवरील मयूरेश्वर अभयारण्याच्या दिशेने आम्ही निघालो. त्यावेळी आम्ही लांडग्यांच्या कळपाचे नियमितपणे निरीक्षण करत होतो. मयूरेश्वरला सूर्योदयापूर्वी पोचल्यावर तेथील एका छोट्या टेकडीवर ठाण मांडले. उगवत्या सूर्यामुळे परिसराचे विहंगम दृश्‍य दिसत होते. तितक्‍यात मोकळ्या जमिनीवर काहीतरी हालचाल दिसली. एक पट्टेदार तरस न घाबरता उभे होते. थोड्या वेळाने ते निघून गेले. खरे तर तरस हा निशाचर प्राणी क्वचितच दिसतो. त्यामुळे आमच्यासाठी हा आश्‍चर्याचा धक्का होता. त्यानंतर आम्ही लांडग्यांबरोबरच तरसांचेही निरीक्षण करण्याचे ठरवले. 

 लांडग्यांचा शोध घेताना ‘गावाजवळ वाघ दिसला’, असे गावकऱ्यांकडून अनेकदा ऐकले. या भागात वाघ नसल्याचे आम्हाला माहीत होते. गावकऱ्यांना पट्टेदार वाघाऐवजी पट्टेदार तरसाचे दर्शन झाले असावे. त्यानंतर २०११ व २०१२ मध्ये तरस पाहिल्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी या परिसराला वारंवार भेटी दिल्या. एकदा गुरे जात असलेल्या वाटेवर तरसाच्या खुणा दिसल्या. त्या पाणवठ्यापर्यंत जात होत्या. पुढे कित्येक दिवस, रात्री या पाणवठ्यावर लक्ष ठेवले. अखेर फेब्रुवारी २०१२ मध्ये सकाळी उजव्या कानावर छोटीशी खाच असलेली तरसाची मादी पाणवठ्यावर आली. तहान भागविल्यानंतर ती खडकाळ दिसणाऱ्या झुडपांच्या जंगलाकडे गेली. आम्ही पुढील काही दिवस पाणवठ्यावर तिचे निरीक्षण करत होतो. ती रोज पटकन पाणी पिऊन झुडपांत अदृश्‍य व्हायची. पण एकदा आम्ही नशीबवान ठरलो आणि या मादीमुळे तरसांची गुहा सापडली. 

‘तरसांचा राजा’  
 गुहेच्या ठिकाणी मादीचा शोध घेतला. ती गुहेबाहेर एरवी, तसेच सूर्यास्तानंतरही अधिक वेळ घालवत असल्याचे लक्षात आले. एक़े दिवशी एक तरस गुहेजवळ येत असल्याचे दिसले. जवळ आल्यावर तो मोठा नर असल्याचे समजले. थोड्याच वेळात मादीही आली. दोघांनीही विशिष्ट आवाजाच्या माध्यमातून एकमेकांची खात्री पटवली. अखेरीस, दोघे वेगवेगळ्या गुहांकडे गेले. मोठ्या आकारामुळे नराचे ‘तरसांचा राजा’ असे आम्ही नामकरण केले. दोघांची जोडी जमली आणि आता गावकऱ्यांनी दोन वाघ दिसत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. कडक उन्हाळ्यात दोघेही पाणवठ्यावर नियमितपणे जात. त्यामुळे, त्यांचा मागोवा घेणे सोपे होते. एकदा नेहमीपेक्षा आमच्या अधिक जवळ येत मादीने आश्‍चर्याचा धक्का दिला. तिला आमच्या अस्तित्वाची कल्पना होती, मात्र ती आम्हाला फारसे गृहीत न धरता लांब राहात होती. संध्याकाळी छायाचित्रे पाहताना यावर प्रकाश पडला. 

पिल्लांची देखभाल
ती एक स्तनदा माता होती. पिल्लांमुळे ती गुहेजवळ अधिक सावध होती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवसापासून पुरेसे अंतर ठेवूनच तरस कुटुंबीयांवर दुर्बिणीतून नजर ठेवू लागलो. आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच पिल्लांचेही दर्शन झाले. दुर्गम भागातील ही जागा वसतिस्थानासाठी तरसांनी काळजीपूर्वक निवडली होती. तिथे पिल्ले मुक्तपणे बागडू शकत होती. त्यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ती आई-वडिलांसोबत राहिली. नंतर हळूहळू स्वत:हून फिरू लागली. काही दिवस ती घरापासून दूर असायची. मात्र, घरी पुन्हा परतायची. जानेवारी २०१३ मध्ये मात्र ती पूर्णपणे स्वावलंबी झाली. त्याच वर्षी आम्ही तरसांच्या गुहेतील जीवनाचा सविस्तर अभ्यास करण्याचे ठरविले. गुहांच्या जवळच त्यांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने व्यवस्था केली. नियमितपणे मागोवा घेतला, तरी तरसांचे दर्शन दुर्मीळ होत गेले. मार्चमध्ये ते पूर्ण बंद झाले. आम्ही मोठ्या आशेने शोध घेतला. तरसांच्या खुणा आढळल्या, मात्र, दर्शन झाले नाही. एकदा तरसाची मादी गवताळ ठिपक्‍यावर दिसली. तिच्या तोंडात महिनाभराचे पिल्लू होते. ती हळूहळू गुहेकडे गेली. आम्ही तिला एकामागोमाग एक पिल्ले आणताना पाहिले. तिने वसतिस्थान बदलले होते. तरस व इतर मांसाहारी प्राण्यांकडून वापरलेल्या जगण्यासाठीच्या प्राचीन रणनीतीचे आम्ही साक्षीदार ठरलो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये गावाच्या मुख्य रस्त्याजवळ गावकऱ्यांना पिल्लांसह तरसाचे दर्शन झाले. आश्‍चर्य म्हणजे गावाच्या मुख्य रस्त्याजवळच तीन पिल्लांचे वसतिस्थान आढळले. थोड्याच वेळात पिल्लांची आईही प्रकटली. पूर्वी दिसलेलीच ही मादी होती. तिच्या उजव्या कानावरच्या खाचेवरून आम्ही ओळखले. पिल्लांना स्तन्यपान केल्यानंतर ती आधीच्या वसतिस्थानाकडे गेली. ती रोज सकाळी गुहेत येऊन पिल्लांना स्तन्यपान करायची. दुसऱ्या गुहेमध्ये ती नरासोबत असायची. मादीला दुसऱ्या प्रसुतीत दोन पिल्ले झाली, तर पहिल्यावेळी एकच. प्रथम एकच पिल्लू झाल्यामुळे तिने ‘सेकंड चान्स’ घेतला का, असा प्रश्न पडला. आम्हाला तरसांच्या प्रजनन पद्धतीविषयी खूपच कमी माहिती मिळाली. याबाबत अधिक सखोल संशोधनाची गरज आहे. 

खाण्यापिण्याच्या सवयी 
तरसांच्या या प्रदेशाला आम्ही अनेकदा भेट दिली. तेव्हा त्यांची इतरही वसतिस्थाने आढळली. या परिसरात तरसांची संख्या चांगली होती. एवढे तरस प्रामुख्याने मानवी वर्चस्व असलेल्या भूभागावर आपली भूक कशी भागवत होते, याची उत्सुकता होती. आम्ही त्यांच्या वसतिस्थानांचे जवळून निरीक्षण केले. प्रत्येक ठिकाणी कोंबड्यांची पिसे आढळली. आम्ही कुक्कुटपालकांशी बोललो. कत्तलीपूर्वीच वीस टक्के कोंबड्या मरतात. त्यांचे अवशेष गावाबाहेर टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून तरस, लांडग्यांची भूक भागत होती. तरस इतर मृत जनावरे व कुत्रीही खात होते.  तरसांचे निरीक्षण करताना आमच्या मनात संमिश्र भावना होत्या. त्यांच्या भविष्याची काळजी होती. पुणे परिसरातील तरसांपुढे तर अनेक आव्हाने आहेत. 

वसतिस्थान गमावणे 
हे सर्वांत प्रमुख आव्हान आहे. सध्या शेतांमध्ये तरसांनी आसरा घेतलाय. खासगी शेतजमिनीबरोबरच जंगल व सरकारी जमिनी पाळीव प्राण्यांच्या कुरणासाठी राखून ठेवण्यात येत आहेत. दिवसेंदिवस शेती अवघड होतेय. त्यामुळे ती रिअल इस्टेट विकसकांना विकली जातेय. या जमिनीवर टाउनशिप उभ्या राहत आहेत. त्यातून गवताळ प्रदेशातील सर्वच प्राण्यांचे वसतिस्थान नष्ट होतेय. 

अपघात आणि शिकार 
रस्त्यावरील अपघात, शिकारींचा धोकाही वाढतोय. या परिसरात नवीन असणाऱ्या तरसांना भरधाव वाहनांचा अधिक धोका आहे. या व्यतिरिक्त शिकारीचा धोकाही आहे. तरसाचे कातडे वाघाच्या कातड्यासारखे दिसत असल्याने त्यांची शिकार केली जाते. तरसांचे अवयव औषधी असल्याचा गैरसमजही काही जमातींमध्ये आहे. काहीवेळा साळिंदरच्या गुहेत तरसाची मादी प्रसूत होते. साळिंदरचे मांस चविष्ट समजले जाते. त्यातून काहीवेळा तरसाच्या पिल्लांची शिकार केली जाते. पोल्ट्रीमधील रसायनांचा तरसांवर विपरीत परिणाम होतोय. देश आकर्षक, मोहक प्राण्यांवर लक्ष केंद्रित करतोय. या पार्श्वभूमीवर आमची ही ‘तरस डायरी’ (हायना डायरी) वन्यप्रेमींना जैवविविधतेची जाणीव करून देईल, अशी आशा आहे. या प्रदेशात थोडे संरक्षण दिले, तर त्याचा तरसांसह इतर प्रजातींनाही मोठा फायदा होईल. 

 (अनुवाद ः मयूर जितकर)
(लेखक गवताळ प्रदेश आणि लांडग्यांचे वर्तन या विषयाचे अभ्यासक आहेत.)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com